Monday, May 27, 2024
Homeमुख्य बातम्याRohit Pawar : अजित पवारांवर बोरवणकरांनी केलेल्या आरोपांवर रोहित पवारांचे सूचक विधान;...

Rohit Pawar : अजित पवारांवर बोरवणकरांनी केलेल्या आरोपांवर रोहित पवारांचे सूचक विधान; म्हणाले, सरकारला…

मुंबई | Mumbai

पुण्याच्या (Pune) माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी आपल्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे नाव न घेता येरवड्यातील पोलिस स्टेशनच्या जमिनीच्या लिलावाचा (Auction of land) निर्णय तत्कालीन मंत्री दादा यांनी घेतला होता, असा गंभीर आरोप केला आहे. मीरा बोरवणकर यांनी २०१० मधील प्रकरणाचा उल्लेख या पुस्तकात केला असून अजित पवारांनी विरोध केल्याचंही पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

त्यानंतर आता या घटनेवरून विरोधकांकडून अजित पवारांवर टीका केली जात असून यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी अजित पवारांची चौकशी करावी अशी मागणी केली त्यांनी केली आहे. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार गट यांच्यात आता या प्रकरणावरून चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar : भाजप पाठिंब्यावर अजित पवार मुख्यमंत्री?

यावेळी बोलतांना रोहित पवार म्हणाले की, ज्या अधिकाऱ्यांनी ते पुस्तक लिहीलं आहे, त्या नावाजलेल्या अधिकारी आहेत. पण सरकारला वाटत असेल तर त्याची शहानिशा करावी. पण कोणी कुठली जमीन घेतली, काय भ्रष्टाचार केला, कोणी कुठलं पद मिळवलं, कोण मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री यावर चर्चा करण्यापेक्षा युवकांवर चर्चा करण्याची गरज आहे. उद्या माझ्यावर चौकशी चालू आहे. माझ्यावर विविध स्वायत्त संस्था, पल्युशन बोर्ड, इन्कम टॅक्सची चौकशी चालु आहे. माझ्यावर चालू आहे तर मग सत्तेत असलेल्या व्यक्तीवर चालू करण्यास काय हरकत आहे असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, माजी आयपीएस अधिकारी (IPS officer) मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपासंदर्भात अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. तसेच जमिनीच्या लिलावात त्यांची कोणतीही भूमिका नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. याशिवाय लिलावाच्या निर्णयाला त्याकाळात आपला कडाडून विरोध असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले. तसेच जमिनींचा लिलाव करण्याबाबत जिल्ह्याच्या मंत्र्यांना कोणतेही अधिकार नाहीत. लिलावात सरकारी जमिनी विकता येत नाहीत. महसूल विभागामार्फत जाणाऱ्या विनंतीला मंत्रिमंडळाने मान्यता दिली तरच सरकारी जमिनींचा लिलाव होतो, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

काँग्रेसला नाशकात ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा; शहराला कायम अध्यक्ष नसल्याने नाराजी

बोरवणकर यांनी पुस्तकात नेमकं काय म्हटलं आहे?

मी नुकताच पुण्याच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला होता. एक दिवशी मला पुण्याच्या विभागीय आयुक्तांचा फोन आला आणि पालकमंत्र्यांनी तुम्हाला उद्या सकाळी भेटायला बोलावले असल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीत येरवडा पोलीस स्टेशनच्या जागेबाबत चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयात पोहचले तेव्हा पालकमंत्री येरवड्याचा मोठा नकाशा समोर घेऊन बसले होते. त्यांनी मला पोलीस दलाच्या तीन एकर जागेचा व्यवहार झाला असल्याचे आणि त्यातून पोलीस दलाला मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले.

त्यासाठी पुढचे सोपस्कार तुम्हाला पूर्ण करावे लागतील असे त्यांनी म्हटले. पण माझा ही जागा विकण्याला विरोध होता. येरवड्यासारख्या मोक्याच्या ठिकाणी असलेली जागा खासगी बिल्डरला देण्याऐवजी आपण तिथे पोलीसांसाठी घरे बांधू असं म्हणत मी या व्यवहाराला नम्रपणे आणि ठामरित्या विरोध केला. त्यानंतर मंत्री महोदय चिडले आणि त्यांनी त्यांच्या हातातील कागद टेबलवर फेकून दिले. त्यानंतर मी ही जागा पोलीस दलाच्या ताब्यात असणे कसं फायद्याचे आहे हे तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांना पटवून द्यायचे ठरवले.

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कानावरही हे प्रकरण घालण्यात आले. त्यांनी पोलिसांची जागा खासगी बिल्डरला द्यायला ठाम विरोध दर्शवला. मात्र, अजित पवार ऐकत नव्हते. त्यामुळे मुंबईला आर.आर.पाटील यांच्या कार्यालयात विभागीय आयुक्त दिलीप बंड आणि माझ्या उपस्थितीत बैठक बोलावण्यात आली. हे सगळं सुरु असतानाच शाहिद बालवा याच्यावर ईडीकडून टू जी स्पेक्ट्रम प्रकरणात कारवाई करण्यात आली होती आणि बालवाच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या.

पोलीस कर्मचारी वजीर शेख यांनी आर.आर. पाटील यांच्याकडे बैठकीला जाण्याआधी मुंबईतील ईडीच्या (ED) कार्यालयातून बालवाची कुंडली मिळवली. यावेळी माझ्यासह ती आर.आर. पाटील यांच्यासमोर मांडली. एका घोटाळ्यात आरोपी असलेल्या व्यक्तीसोबत पोलिसांनी व्यवहार करणे चूक ठरेल असं आर.आर. पाटलांचं मत बनलं आणि त्यांनी अजित पवारांनी ठरवलेला हा व्यवहार रद्द केला. त्यावेळी माध्यमांनी या व्यवहारावरून अजित पवार आणि दिलीप बंड यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. मात्र, अजित पवारांचा त्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही आणि खासगी बिल्डरला जागा विकणे फायद्याचेच होते असा दावा दिलीप बंड यांनी केला होता.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

“जो जास्त बोली लावेल त्याच्यासोबत…”; माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकरांच्या ‘मॅडम कमिशनर’ पुस्तकातून अजित पवारांवर गंभीर आरोप

- Advertisment -

ताज्या बातम्या