Sunday, October 13, 2024
Homeनगरतीन वर्षांत रोहयोतून 1200 हेक्टरवर होणार बांबू लागवड

तीन वर्षांत रोहयोतून 1200 हेक्टरवर होणार बांबू लागवड

अमृत महोत्सवी फळझाड व वृक्षलागवड कार्यक्रमास शासनाची मंजुरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या योजनेंतर्गत शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड व वृक्षलागवड कार्यक्रमास शासनाने मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात रोहयोतून 400 हेक्टरवर बांबू लागवड केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी दिली. जिल्ह्यात पुढील तीन वर्षात 1200 हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येणार आहे. त्यापैकी दरवर्षी 400 हेक्टर क्षेत्रावर याप्रमाणे 2024-25, 2025-26 व 2026-27 या आर्थिक वर्षात बांबू लागवड करण्याचे नियोजन केले.

- Advertisement -

या लागवडीसाठी आयोजित बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपवनसंरक्षण सुवर्णा माने, रोहयो उपजिल्हाधिकारी रामदास जगताप, विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण सचिन कंद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कुंदन दंडगव्हाळ, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे व वरिष्ठ भू-वैज्ञानिक भूजल सर्वेक्षण यंत्रणा विभागाचे शास्त्रज्ञ अजिंक्य काटकर, जिल्हा परिषदेचे उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक व उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप सोनकुसळे आदी उपस्थित होते.
या योजनेंतर्गत बांबू लागवडीचा विशेष कार्यक्रम राज्याच्या नियोजन विभागाच्या रोजगार हमी योजना प्रभागाने हाती घेतला आहे.

या बांबू लागवडीतून जलसाठ्यांचे संवर्धन, संरक्षण व ग्रामपंचायती व वैयक्तिक लाभार्थींना वार्षिक उत्पन्नाचे साधन निर्माण करण्याचा प्रयत्न होणार आहे. दरवर्षी 400 हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग प्रत्येकी दरवर्षी 100 हेक्टर, जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभाग दरवर्षी 150 हेक्टर आणि कृषी विभागाय मार्फत दरवर्षी 50 हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचे नियोजन करणार आहे. त्यासाठी सार्वजनिक जागेची निवड, लाभार्थी निवड, बांबू रोपांची उपलब्धता व अन्य नियोजन याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचा सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्याचे रोहयो शाखेचे उपजिल्हाधिकारी जगताप यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या