Saturday, July 27, 2024
Homeनगररोहयो विहीर घोटाळ्याची व्याप्ती वाढणार!

रोहयो विहीर घोटाळ्याची व्याप्ती वाढणार!

कर्जत तालुक्यातील 2 हजार 155 प्रस्तावाची तपासणी सुरू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रोजगार हमी योजनेत शेतकर्‍यांच्या हिताचे कारण पुढे करत स्वत:चे उखळ पांढरे करणार्‍या अधिकार्‍यांसह एजंट यांच्यामुळे नगर जिल्ह्यातील रोजगार हमी योजना चांगलीच बदनाम झाली आहे. शेतकर्‍यांना आधार देण्याच्या नावाखाली रोहयोतून बोगस विहीरींना मंजूरी दिल्याचे प्रकरणे पाथर्डी आणि जामखेड तालुक्यात समोर आले आहे. हे प्रकरण उघड झाल्यावर अनेकांची बोलती बंद झाली असून आता शेतकरी हिताचे कारण पुढे करत कांगावा सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी पाथर्डी, जामखेड पाठोपाठ कर्जत तालुक्यातील रोजगार हमी योजनांत मंजूरी दिलेल्या आणि प्रत्यक्षात कामे सुरू करण्यात आलेल्या विहीरींचे प्रस्ताव तपासण्याचा निर्णय घेतला आहे. या तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा संशय प्रशासनाने व्यक्त केला असून यामुळे रोहयोतील विहीर प्रकरणाची व्याप्ती वाढणार असल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

गुरूवारी कर्जत तालुक्यात रोहयोतून मंजूर करण्यात आलेल्या 2 हजार 155 तपासणीसाठी नगरला बोलवण्यात आले आहेत. यात 390 विहीरींच्या कामाला सुरूवात करण्यात आली असून उर्वरित ठिकाणी कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत. या सर्व कामाच्या प्रस्तावाची जिल्हा स्तरावर तपासणी सुरू करण्यात आली असून ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी आणि रोहयो विभागातील अधिकारी हे प्रस्ताव तपास आहे. येत्या तीन ते चार दिवसात हे काम पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या प्रकरणात दोषी आढळणार्‍यांवर थेट कडक कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

पाथर्डीतील कामांची चौकशी आवश्यक
पाथर्डी पंचायात समितीमधील रोहयोसह अन्य विभागात गेल्या काही वर्षात राबवण्यात आलेल्या योजना, रस्त्यांची कामे यांची देखील चौकशीची मागणी होत असून याबाबत ठोस माहिती मिळाल्यास प्रशासन चौकशीच्या तयारी आहेत. दरम्यान, पाथर्डीतील विहीरीचे प्रकरण पुढे आल्यावर तालुक्यातील संशय असणार्‍यांची बदली करण्यात आलेली आहे. त्याठिकाणी नवीन अधिकारी आणि कर्मचारी सध्या कार्यरत असल्याने ते मागील प्रकरणावर बोलण्यास नकार देतांना दिसत आहेत.

आयुक्तांचा जामखेड दौरा वादात
जिल्ह्यातील पाथर्डी आणि जामखेड तालुक्यातील रोहयो विहीर प्रकरण महाघोटाळा उघड होण्यापूर्वी रोजगार हमी विभागाने आयुक्त यांनी जामखेड तालुक्यात अनेक ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत. त्यावेळी आयुक्तांच्या निदर्शनास हा प्रकार का आला नाही, याबाबत चुप्पी साधण्यात आली असून यामुळे रोहयो आयुक्तांचा दौराच आता वादात सापडला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या