Friday, September 20, 2024
Homeनगर‘शिर्डी’चा खासदार ठरविताना मोठ्या 170 गावांची भूमिका निर्णायक

‘शिर्डी’चा खासदार ठरविताना मोठ्या 170 गावांची भूमिका निर्णायक

श्रीरामपूर व शिर्डी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक शहरी मतदार

रांजणगाव देशमुख |वार्ताहर|Ranjangav Deshmukh

- Advertisement -

शिर्डी लोकसभा मतदार संघाची निवडणूक अतिशय चुरशीची झाली असून यामध्ये स्थानिक मुद्यांपासून ते राष्ट्रीय मुद्दे चर्चेत होते. विदर्भाच्या तुलनेत शिर्डी मतदार संघात अधिक मतदान झाले असले तरी 2019 च्या लोकसभेच्या तुलनेत दोन टक्के आकडा घटलेला आहे. हरिश्चंद्रगडापासून ते नेवासा तालुक्यातील तेलकुडगावपर्यंत तीनशे किमी लांबीच्या विस्तारलेल्या या मतदार संघात 708 गावे असून 1708 बुथमध्ये 16 लाख 77 हजार एवढे मतदार आहेत. असे असले तरी फक्त आठ नगरपालिका व 162 गावांत 65 टक्के मतदार आहेत. 16 लाख 77 हजार मतदारांपैकी या 170 गावांत साडेदहा लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत. या मोठ्या गावांचा जास्तीत जास्त कल जिकडे असेल तिकडेच लोकसभेचा निकाल झुकलेला असणार आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभेचे विजयाचे गणित ठरविताना ही 170 गावांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

शिर्डी मतदारसंघात 710 गावे व 1708 बुथचा या मतदार संघात समावेश असून एकूण 16 लाख 77 हजार मतदार आहेत. असे असले तरी फक्त 170 गावे शिर्डी लोकसभेचा खासदार ठरविणार आहेत. ज्या गावांत तीन बुथ व अठ्ठाविसशेपेक्षा जास्त मतदार आहेत अशा गावांची संख्या 170 आहे. सर्वाधिक शहरी मतदार हे श्रीरामपूर व शिर्डी विधानसभेत असून सर्वात जास्त ग्रामीण मतदार हे अकोले तालुक्यात आहेत. श्रीरामपूर विधानसभेत एकूण मतदार दोन लाख 99 हजार एवढे असून एकूण गावे 84 आहेत. श्रीरामपूर शहर व मोठ्या 23 गावांतच दोन लाख 15 हजार मतदार आहे. म्हणजे एकूण मतांच्या 71 टक्के मतदार हे फक्त 24 गावांमध्ये समाविष्ट आहे. यामध्ये श्रीरामपूर व देवळाली प्रवरा नगरपालिकेचा समावेश असून बेलापूर, टाकळीभान, कारेगाव, पढेगाव, ऐनतपूर, निपाणी वडगाव, टाकळीमिया आदी गावांचा समावेश आहे. शिर्डी विधानसभेत राहाता तालुका व संगमनेर तालुक्यातील काही गावांचा समावेश करण्यात आलेला आहे.

यामध्ये दोन नगरपालिका असून एकूण मतदार जवळपास पावणे तीन लाख आहेत. राहाता विधानसभेत जास्त शहरी मतांचा समावेश असून पावणेतीन लाख मतदारांपैकी पस्तीस गावांतच दोन लाख 20 हजार मतदारांचा समावेश आहे. म्हणजे एकूण मतांच्या 80 टक्के मतदान हे फक्त 35 गावांमध्येच समाविष्ट आहे. या 35 गावांमध्ये शिर्डी, राहाता या दोन नगरपालिका असून सावळीविहीर, लोणी, बाभळेश्वर, कोल्हार, आश्वी आदी गावांचा समावेश होतो. या 35 गावांत ज्याला मताधिक्य असेल त्या उमेदवाराला राहाता विधानसभेत मताधिक्य असते. नेवासा तालुक्यात एकूण पावणेतीन लाख मतदार असले तरी फक्त 27 गावांमध्ये एक लाख 42 हजार मतदार आहे. नेवासा विधानसभेत 120 गावांचा समावेश असून फक्त 27 गावांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त मतदार असून उर्वरीत 93 गावांमध्ये 48 टक्के मतदार आहेत. यामध्ये नेवासा नगरपालिकेसह भेंडा, कुकाणा, सोनई, बेलपिंपळगाव, चांदा आदी गावांचा समावेश आहे.

संगमनेर विधानसभेत देखील एकूण मतदार हे 2 लाख 76 हजार असून येथे देखील अवघ्या 31 गावांतच पावणेदोन लाख मतदार आहेत. यामध्ये संगमनेर नगरपालिकेसह घुलेवाडी, गुंजाळवाडी, साकूर, निमोण, तळेगाव दिघे सारख्या मोठ्या गावांचा समावेश आहे. त्यामुळे या 31 गावांमध्ये मताधिक्य कोणाला मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कोपरगाव विधानसभेत राहाता तालुक्यातील काही गावांचा समावेश करण्यात आला असून जवळपास 90 गावांमध्ये दोन लाख 77 हजार मतदार आहेत. यातील कोपरगाव नगरपालिका व इतर 25 गावांमध्येच एक लाख 84 हजार मतदार आहेत. म्हणजे एकूण मतांच्या 66 टक्के मतदार हे अवघ्या 26 गावांमध्ये समाविष्ट आहेत. यामध्ये कोपरगाव शहरासह पुणतांबा, चितळी, संवत्सर, सुरेगाव, पोहेगाव, शिंगणापूर, वाकडी, वारी आदी गावांचा समावेश होतो. शिर्डी लोकसभेत एकूण सहा विधानसभा मतदारसंघ असून यामध्ये सर्वात जास्त विखुरलेला अकोले विधानसभा मतदारसंघ आहे. अकोले विधानसभेत संगमनेर तालुक्यातील गावांचा समावेश करण्यात आलेला आहे.

सर्वात कमी मतदार हे अकोले तालुक्यात असून अवघे 2 लाख 56 हजार मतदार अकोले तालुक्यात असून सर्वात जास्त बुथ व गावांची संख्याही अकोले तालुक्यात आहे. अकोले तालुक्यात शहरी मताचा टक्का अगदी कमी आहे. अकोले विधानसभेत अकोले नगरपालिकेसह 23 गावांत फक्त 80 हजार मतदार आहेत. एकुण मतांच्या अवघे 31 टक्के मतदार हे मोठ्या गावात राहतात. अकोले विधानसभेत अकोले शहरात सर्वात जास्त 13 हजार मतदार असून सर्वात कमी मतदार हे शिरपुंजे खुर्द (283) मध्ये आहेत. अकोले विधानसभेत राजूर, कोतूळ, समशेरपूर, देवठाण आदी गावांमध्ये सर्वाधिक मतदान आहे. सर्व विधानसभा व त्यातील मोठ्या गावांची टक्केवारी पाहता खर्‍या अर्थाने शिर्डी लोकसभा मतदार संघाचा खासदार ही 170 गावेच ठरविणार असून या ठिकाणी कोणाला मताधिक्य मिळेल यावर प्रमुख उमेदवारांचे भविष्य अवलंबून राहणार आहे. यासाठी 4 जूनची वाट पहावी लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या