विल यंग, डेवोन काँनवे, रचिन रवींद्र, डेरील मिचेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन… न्यूझीलंडचे हे फलंदाज! सांगा, यांच्यापैकी कोण सुपरस्टार आहे? कोणीच नाही… एकही नाही… अपवाद फक्त केन विल्यमसनचा, पण तो पुन्हा अनफिट झाला आहे. तरीही किवी संघ फलंदाजीत ढेपाळत नाही. कोणीतरी डाव सावरतो, पण शरण जात नाही आणि मला वाटते, फलंदाजी हीच त्यांची थोडी कमकुवत बाजू आहे.
उलट गोलंदाजीत ते निश्चित बलवान आहेत. ट्रेंट बोल्टची धार कमी झाली असली तरी पहिल्या दोन ओव्हरमध्ये एखाद दुसरी विकेट काढण्याची त्याची हातोटी तशीच आहे. मॅट हेनरी संथ खेळपट्टीतून तेल काढतो. लोकी फर्ग्युसनही भन्नाट वेगाने गोलंदाजी करतो. या तिघांची बॅटिंग तितकी चांगली नाही; म्हणून कदाचित टीम सौदी फिट झाल्यावर संघात परतेल. मिचेल सांतनर त्यांचा बिशन बेदी… चेंडूला उंची देवून विकेट काढतो. रचीत रवींद्र धोकादायक वाटत नाही, पण त्याचा विकेटचा कॉलम रिकामा कधीच नसतो. अफगाणिस्तान (Afghanistan) विरुद्ध हेच पाहायला मिळाले.
अफगाणिस्तान सुरुवातीला किविजच्या तोडीस तोड खेळत होते. त्यांच्या फिरकीने न्यूझीलंडला ( New Zealand) चांगलेच सतावले, पण शेवटच्या दहा; त्यातही सहा ओवर्समध्ये ग्लेन फिलिप्स आणि कर्णधार लॅथमने त्यांची पिसे काढली. चॅपमनने आणि संतनरने तुफानी खेळून उरलेले सोपस्कार पूर्ण केले. अफगाण खेळाडूंनी झेल सोडायची अंतर्गत स्पर्धा घेतली होती, असे वाटून गेले.
सुरुवातीला यंगचा झेल सोडल्यावर अफगाण सातत्याने तेच करीत राहिले. गोलंदाजांनी कोंडीत पकडूनही या बटर फिंगर्समुळे त्यांनी किमान ३० धावा जास्त दिल्या. किवी सध्या जोमात आहेत. डस्टी खेळपट्टीवर अफगाण स्पिनरना त्यांनी चांगली लढत दिली. यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला असेल. अफगाण संघासाठी मात्र हा सामना एक दु:स्वप्न होते. त्यांच्यासाठी हा सामना ‘एक डाव भुताचा’ वाटावा.
-डॉ अरुण स्वादी