Wednesday, December 4, 2024
Homeक्रीडाराऊंड द विकेट : संपूर्ण शरणागती

राऊंड द विकेट : संपूर्ण शरणागती

नेदरलँड्सची विश्वचषक स्पर्धेत आता उलटी गिनती चालू झाली आहे. ऑस्ट्रेलियाने त्यांना फस्त करून टाकले. तब्बल ३०० धावांनी झालेला विक्रमी पराभव त्यांना चांगलाच झोंबला असेल. त्यांना एवढेच समाधान की ग्लेन मॅक्सवेल फलंदाजीला उतरेपर्यंत सामना त्यांच्या हातातून निसटला असला तरी अब्रू शाबूत होती. अर्थात मॅक्स खेळायला लागल्यावर भल्या भल्यांची त्रेधातिरपीट उडते हा इतिहास आहे. गेले काही दिवस हा मॅड मॅक्स  फॉर्मात नव्हता. कारण तो तंदुरुस्तीच्या कारणामुळे संघाबाहेर गेला  होता.

त्यानंतर तो भारताविरुद्ध मालिका खेळला आणि या स्पर्धेतही तो प्रत्येक सामना खेळतोय, पण त्याची बरसणारी बॅट बिनसल्यामुळे धावा होत नव्हत्या. यावेळी त्याने दुबळ्या हॉलंडच्या गोलंदाजीचा ‘मौके का फायदा’ उठवला. त्याचे एकदोन स्वीप व रिवर्स स्वीप कनेक्ट झाल्यावर हा दिवस मॅक्सवेलचा असणार असे वाटायला लागले.

- Advertisement -

मग तो डच गोलंदाजीवर खूप दिवस भूखा असल्यासारखा तुटून पडला. दडपण आल्यामुळे गोलंदाजांनी स्वैर मारा केला. तसेही ग्लेनने क्रीझ सोडून कुठेही जाऊन कोणताही फटका मारल्यामुळे ते बावरले होतेच. याचा परिणाम हा झाला की, ३१०-३२० पर्यंत ऑस्ट्रेलिया पोचेल, असे वाटत होते ते चक्क चारशेच्या घरात पोचले. या सामन्यात कॅमेरून ग्रीन वगळता फॉर्मात नसलेल्या स्टीव स्मिथनेदेखील हात धुवून घेतले. लबुशेन कधी नव्हे ते वेगात खेळला आणि नशीबवान वोर्नरने पुन्हा एक शतक काढून ‘अभी तो मैं जवान हूं’ हे दाखवून दिले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

नेदरलँड कोणताही प्रतिकार न करता शरण गेले. अर्थात हेझलवूड कमिन्स स्टार्क ही नावे कोणालाही धडकी भरवणारी आहेत. त्यांनी सुरेख स्पेल टाकले. लेग स्पिनर झम्पासमोर तर ते पार गोंधळले होते. त्यांचा मोठा पराभव करून कमिन्सच्या टीमने रन रेटचा बॅकलॉग भरून काढला. आता त्यांच्या उपांत्य फेरीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पाकिस्तान, विशेषतः इंग्लंड आपले आव्हान कसे टिकवायचे या चिंतेत असतील.

– डॉ अरुण स्वादी

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या