Saturday, July 27, 2024
Homeक्रीडाराऊंड द विकेट : इंग्लंडचे विमान कोसळले!

राऊंड द विकेट : इंग्लंडचे विमान कोसळले!

काही दिवसांपूर्वीची बातमी होती…  या स्पर्धेतील सर्वोत्तम इंग्लिश तेज गोलंदाज रीस टोपली याच्या हाताचे बोट फ्रॅक्चर झाल्यामुळे तो संघातून बाहेर पडला आहे. बस, त्या नंतरच्या  पुढच्याच सामन्यानंतर पूर्ण इंग्लंडचा संघच वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यासारखा दिसतोय. खरे तर हे फार मोठे आश्चर्य आहे, फार मोठी उलथापालथ आहे. इंग्लंड २०१९चा ‘विश्वचषक विजेता’ आहे आणि आज २०२३ मध्ये निश्चितपणे त्यांना संभाव्य विजेत्याची पसंती दिली जात होती, पण काय चक्र फिरलेय कोणास ठाऊक; अवघ्या काही आठवड्यात इंग्लंड विश्वचषक स्पर्धेतूनच आऊट होत आहे हे अविश्वसनीय, पण सत्य आहे आणि याला कारण इंग्लंडची फलंदाजी…! बझ क्रिकेटने त्यांना भरपूर यश मिळवून दिले, पण भारतात पहिल्या काही सामन्यांमधील अपयशांमुळे त्यांच्या मनात ‘टू बी फॉर नॉट टू बी’ असा हॅम्लेट निर्माण झाला होता.

फार आक्रमक खेळून फायदा होत नाही पाहिल्यावर त्यांनी एखाद्या सामन्यात अतिशय बचावात्मक खेळ केला, पण तिथेही त्यांना अपयश आले. अशी द्विधा मनस्थिती असलेल्या इंग्लिश फलंदाजीला भारतात सुगीचे दिवस आलेच नाहीत. बेअरस्टॉ हा इतका डॅशिंग ओपनर आहे. भारतीय खेळपट्ट्यादेखील त्याला तोंड पाठ आहेत, पण गेल्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लिश फलंदाज खेळले तसे तो खेळायला गेला आणि पूर्ण फ्लॉप झाला. कर्णधार जोस बटलर तसा अनुभवी फलंदाज, पण आघाडीला न खेळायचा त्याचा निर्णय संघाला खूप महागात पडला, असे वाटते. किंचित मंद खेळपट्टीवर त्याला त्याचा नैसर्गिक खेळ करता आला नाही.

- Advertisement -

कितीतरी वेळा तो विकेटकीपरकडे झेल देऊन बाद झाला. मिळालेल्या संधीचा फायदा घेत ब्रुक्स खेळला बरा, पण बेन स्टोक्स त्याची स्वतःची सावलीसुद्धा वाटत नव्हता. त्याला प्रवासी म्हणून फिरवणे इंग्लंडला जड गेले. त्याची किंमत त्यांना चुकवायला लागली. जो रूट त्यांच्या संघाच्या मधल्या फळीची धुरा सांभाळेल असे वाटले होते, पण काहीतरी विचित्र खेळत, रिव्हर्स स्वीपचा अतिरेक करीत त्याने आपण वाईट बॉल क्रिकेटमध्ये यशस्वी होत नाही हे दाखवून दिले. लिविंगस्टनवर त्यांनी नको तितका विश्वास टाकला. तो चतुर फलंदाज वाटत नाही. ब्रुक्स हाच त्यांचा भविष्यकाळ आहे. या सर्वांचा परिपाठ हाच की, एक भारदस्त टीम जिने बझ क्रिकेटचा नवा मंत्र दिला ते या वर्ल्डकपमध्ये धारातीर्थी पडले.

श्रीलंका तसेही इंग्लंडची बोगी टीम होती. भूतकाळात त्यांनी इंग्लंडला बऱ्याच वेळा हरवले आहे. या स्पर्धेत त्यांना दुखापतीने जाम सतावले आहे. एवढे की, त्यांना म्हाताऱ्या अँजेलो मॅथ्यूजला परत बोलवावे लागले. मी तर असे ऐकले की, महेला जयवर्धने आणि कुमार संगाक्कारा बॅग भरायला लागले होते. याच अंजेलोने इंग्लंडची वाताहत सुरू केली. मोहिंदर अमरनाथचा सख्खा भाऊ असल्यागत तो गोलंदाजी करतो. त्यानंतर लाहीरू कुमाराने धक्के दिले.

लंका आपले गोलंदाज रोटेशनवर निवडते. यावेळी कुमाराची बारी होती. एकूणच बंगळुरुच्या विकेटवर लंकेने चांगली गोलंदाजी केली. खरे तर इथे धावांचा डोंगर रचला जातो. यावेळची विकेट थोडी टू पेसड होती. सुरुवातीला स्विंग होत होता. टॉस जिंकून बॅटिंग घ्यायचा निर्णय इंग्लंडला महागात पडला. त्या आधीच्या सामन्यात प्रथम फिल्डिंग घेऊन ते पस्तावले होते. ही संभ्रमावस्था अपयशामुळे आली. गतविजेत्या इंग्लंडचे विमान आता क्रॅश झाल्यातच जमा आहे.

– डॉ. अरुण स्वादी

- Advertisment -

ताज्या बातम्या