Thursday, September 12, 2024
Homeमुख्य बातम्याराऊंड द विकेट : शेवटचा चेंडू निर्णायक

राऊंड द विकेट : शेवटचा चेंडू निर्णायक

– डॉ अरुण स्वादी

वन-डे क्रिकेट आता टी-ट्वेंटीसारखे खेळायला लागले आहेत. याचा पुरावा म्हणजे धर्मशाला मधील ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा ५० षटकांचा सामना…! जवळ-जवळ साडे सातशे धावा निघूनही सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला होता. इतकी धूमधमाल या प्रकारच्या क्रिकेटमध्ये येणार असेल तर पुन्हा एकदा वन-डे क्रिकेटला सोनियाचे दिवस येतील.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाने जोशात आणि जोमात सुरुवात केली ती त्यांच्या पुन्हा फिट झालेल्या ट्रविस हेड या स्फोटक फलंदाजामुळे! तो बरेच दिवसांपासून क्रिकेट खेळला नाही असे वाटलेच नाही. उलट तो असा खेळला की, या स्पर्धेतल्या प्रत्येक संघाला छातीत धडकी भरावी. हेड कसोटी क्रिकेटही असेच खेळतो. म्हणूनच काही षटकांमध्ये तो सामना फिरवतो. इथेही त्याने तेच केले.

जोरदार सुरुवातीनंतर ऑस्ट्रेलियाने फिरकी गोलंदाजीसमोर काहीशी संथ फलंदाजी केली. पुन्हा एकदा मॅक्सवेल इंग्लिस आणि कर्णधार पेट कमिन्स यांनी धुवाधार बल्लेबाजी करीत संघाच्या धावा फलकावर लावल्या. ४८ व्या शतकातील कमिन्सचे चार छक्के हाच शेवटी दोन संघांच्या एकूण कामगिरीतला अंतिम फरक ठरला. एरवी दोन्ही संघ अटीतटीने एकमेकांशी भिडले.

किवी संघाने आपल्यावर कोणतेही दडपण न घेता पाठलाग केला. सुरुवात कोनवे आणि यंगने फटकेबाजी केली, पण मोठी भागीदारी करू शकले नाहीत. डेरील मिचेलही अर्धशतक काढून बाद झाला, पण नवोदित रचिन रचित पुन्हा एकदा चमकला. तो होता तोपर्यंत किविजना संधी होती.

मात्र तो बाद झाल्यावर संघ घायकुतीला आला. नीशाम शेवटपर्यंत लढला, पण नशिबाने साथ दिली नाही. लाबुशेनने दोन अविश्वसनीय चौकार अडवले. ते निर्णायक ठरले, पण चारशेच्या जवळ पोचूनही किविजनी ऑस्ट्रेलियाची झोप उडवली आणि कोणत्याही क्षणी त्यांना पूरी तरहसे हावी होऊ दिले नाही.

झँपाने पुन्हा एकदा आपली उपयुक्तता सिद्ध केली. मॅडमॅक्सने पुन्हा एकदा आपली महती दाखवून दिली. ऑस्ट्रेलियाचा तेज अटॅक मात्र एकसांची वाटतो. स्टार्क खूप धावा देतोय. चेंडू स्विंग झाला नाही तर तो गळ्यातले लोढणे बनतो. मजा म्हणजे किवी ट्रेंट बोल्टची अवस्था तशीच झाली आहे. हे दोन दिग्गज डावखोरे गोलंदाज उतरणीला लागले आहेत हे मात्र खरे!

आता सामने रंगायला लागले आहेत. शेवटच्या जोडीमुळे सामन्याचा निर्णय लागायची दोन दिवसातली ही दुसरी वेळ आहे. ऑस्ट्रेलियाची आगेकूच चालू आहे. लागोपाठ दोन सामने हरल्याने किवी संघाच्या प्रगतीला खीळ बसली आहे. दक्षिण आफ्रिका पाकिस्तानवर शेवटच्या चेंडूवर मात करून टॉपवर आहे. पाकिस्तानला मात्र घरघर लागली आहे आणि इंग्लंड कोमातून बाहेर पडायचा प्रयत्न करीत आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या