Saturday, July 27, 2024
Homeक्रीडाराऊंड द विकेट : झम्पाची कमाल सलामीवीरांची धमाल

राऊंड द विकेट : झम्पाची कमाल सलामीवीरांची धमाल

फक्त दीड स्पिनर खेळवून ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला रडवले हे जरी खरे असले तरी हा डावपेच प्रत्येक वेळी यशस्वी होईल असे नाही. कांगारूना हे शक्य झाले ते त्यांनी उभारलेल्या ३६७ धावांच्या डोंगरामुळे. डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांच्या पहिल्या विकेटसाठी केलेल्या२५९ धावांच्या भागीदारामुळे. एरवी पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचे दात त्यांच्या घशात घातले असते .तसा नजाराही त्यांनी दाखवला.अब्दुल्ला आणि इमाम खेळत असताना आणि नंतर रिजवान आणि इफ्तेकार हाणामारी करत असताना पाकिस्तानच्या आशा चांगल्या पल्लवीत झाल्या होत्या.

खरं म्हणजे ते सामना जिंकायचा परिस्थितीत होते. परंतु अ‍ॅडम झम्पा (Adam Zampa) त्यांना नडला. हा युवा लेग स्पिनर ऑस्ट्रेलियाचा ट्रम्प कार्ड ठरावा. तो लेग स्पिन पेक्षा जास्त गुगली टाकतो. त्याचा वेग ही इतर लेगस्पिनर पेक्षा थोडा जास्तच आहे.स्टंप टू स्टंप गोलंदाजी करण्यात त्याचा हातखंडा आहे. त्यामुळे त्याने इफ्तेकारला असाच फ्लोटर टाकून उचलले आणि लगेच पुढच्या षटकात रिझवानलाही पायचीत केले. इथे सामना (Match) फिरला. अशी एकहाती सामना फिरवायची करामत पूर्वी शेन वॉर्न (Shane Warne) करत असे.

- Advertisement -

या सामन्यात तरी अर्धा स्पिनर मॅक्सवेलला फारसे काही करता आले नाही .त्यामुळे गोलंदाजीचा संपूर्ण भार झम्पानेच उचलला. पुढे जसजशा फिरकी खेळपट्ट्या वाढत जातील तसतसे फक्त झंपावर अवलंबून राहायचे ऑस्ट्रेलियाचे डावपेच त्यांना तोंडघशी पाडू शकतील.फलंदाजी मध्ये स्टीव्ह स्मिथच्या फॉर्मची काळजी त्यांना असेलच. लबुशेन खूप चेंडू खातो हे त्यांची आणखी एक विवंचना. ट्राविस हेडच्या आगमनाने त्यांना दिलासा मिळू शकेल.पण त्यांच्या चमूत एक्सट्रा स्पिनर नाही हे मात्र आश्चर्यकारक.

पाकिस्तानी गोलंदाजी एकखांबी तंबू आहे. शाहीन आफ्रिदी चालला तर त्यांची गाडी रुळावर असते पण तो चालला नाही तर मात्र डिरेल होते. रौफ मेहनती आहे पण यावेळेस का कोण जाणे त्याला भरपूर बडवले जात आहे.हसन अली तर त्यांचा शार्दूल ठाकूर वाटतो.शादाब खानच्या अपयशामुळे त्यांच्या टीमचा बॅलन्स पण बिघडला आहे. एकूणच पाकिस्तानची गोलंदाजी टेरर वाटत नाही

त्यातच कर्णधार बाबर आजमच्या बॅटीतून धावा निघत नाहीत ,त्यामुळे त्यांना सलामीवीर आणि रिजवान यांच्यावर खूप अवलंबून राहावे लागते आहे .तरी देखील त्यांची फलंदाजीची गाडी रुळावर येऊ शकते. पण गोलंदाजीत पाकिस्तानी रुबाब परत दिसेल असे वाटत नाही.गलथान क्षेत्ररक्षण हा त्यांचा आणखी एक कमकुवत दुवा.

वॉर्नरला सुरुवातीलाच जीवदान देणं म्हणजे स्वतःच्या हाताने आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं. नवोदित उसामा मीरने ती चूक केली आणि त्यामुळे पाकिस्तान नेस्तनाबूत झाले. विश्वचषक मालिका आता रंगायला लागली आहे. पण अजूनपर्यंत एकही सामना नेल बायटिंग फिनिश म्हणतात तसा झाला नाही.सध्या सगळे सामने एकतर्फी होत आहेत हे मात्र मोठेच आश्चर्य…

– डॉ अरुण स्वादी

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या