हा क्रिकेटचा खेळ आहे की, सापशिडीचा हे कळायला मार्ग नाही. गेल्या वेळचे विश्वचषक विजेते इंग्लंड आता एकदम रसातळाला गेले आहेत आणि तेथून थोडेसुद्धा वर यायची शक्यता नाही. हे कसे घडले? खरोखर कळण्यापलीकडचे आहे. कदाचित स्कॉटलंड यार्ड यावर प्रकाश टाकू शकेल. इंग्लंडचा संघ या वेळी जवळपास तोच आहे. २०१९ मध्ये फॉर्मात नसलेला, पण स्पर्धा जिंकलेला कर्णधार मॉर्गन आता रिटायर झाला आहे. मॅच विनर जोफ्रा आर्चर जायबंदी होता. आता तो ठीक असला तरी धोका नको म्हणून संघाबाहेर आहे. जेसन रॉयला त्यांनी नारळ दिला, पण यामुळे विजेते एकदम गलितगात्र झाले हे मात्र मोठेच आश्चर्य वाटते.
लखनौची खेळपट्टी काहीशी वेगळी वागते हे आपण आयपीएलमध्ये पाहिले होते. बॅटिंग सेकंड अवघड असते हे तेव्हा नजरेस आले, पण इंग्लंडने होमवर्क केला नसावा किंवा भारताच्या पाठलागाच्या रेकॉर्डचा धसका घेतला असावा. कदाचित दव पडेल, असेही त्यांना वाटले असेल. बटलरच्या मनात काय चालले होते माहीत नाही, पण त्याची देहबोली आत्मविश्र्वास गमावलेल्या कर्णधाराची होती.
तरीही त्यांनी भारताला २२९ धावात रोखले. विकेट मात्र आपला रंग दाखवत होती. रोहित शर्मा एक लाजवाब खेळी खेळला. त्याने निवृत्त व्हावे, असा सल्ला देणाऱ्या मंडळींना अंदमानच्या जेलमध्ये आराम करायला पाठवायला हवे. श्रेयस अय्यर सूर्यकुमारपेक्षा चांगला फलंदाज आहे, असे म्हणणाऱ्या लोकांना चांदी आणि सोन्यातला फरक कळत नाही, असे वाटते. फक्त पहिला चेंडू सोडला तर प्रत्येक चेंडू त्याने मिडल केला. उलट श्रेयसच्या बॅटने बॉलबरोबर छुपाछुपीचा खेळ केला.
‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
मोहम्मद शामीपेक्षा सिराज जास्त परिणामकारक आहे, असे काही जणांचे मत आहे. हे म्हणजे अरबाज खान शाहरुख खानपेक्षा जास्त चांगला अभिनय करतो, म्हटल्यासारखे होईल. किमान भारतात तरी शमीला तोड नाही. चेंडू सीम आणि स्विंग करण्यात, विशेषतः रिवर्स स्विंग करण्यात तो सर्वांचा गुरू आहे. बुमराह आणि शामी ही जोडी या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट तेज जोडी, असे वसीम अक्रम म्हणतो ते काय उगीच?
इंग्लंडची पार नाचक्की झाली असली तरी ते पन्नास आणि वीस षटकांच्या दोन्ही स्पर्धांचे सध्याचे चॅम्पियन आहेत हे विसरू नये! पुढच्या टी-२० स्पर्धेत ते पुन्हा उसळी मारतील हे माझे भविष्य आहे. सध्या मात्र झपकन आत घुसलेला व दांडी उडवलेला कुलदीपचा तो चेंडू बटलरच्या स्वप्नात येत असेल आणि झोप उडवत असेल.
– डॉ अरुण स्वादी