Sunday, September 8, 2024
Homeक्रीडाराऊंड द विकेट : काबुल कंदहार काबीज

राऊंड द विकेट : काबुल कंदहार काबीज

निर्दयी म्हणावे इतके ठणठणीत खेळपट्टी असलेले अरुण जेटली स्टेडियम भारताची, विशेषतः भारतीय गोलंदाजांची परीक्षा घेणार यात शंका नव्हती. त्यातच नाणेफेक हरल्यामुळे मैदानात आल्याबरोबरच अवघड परीक्षेला सुरुवात झाली. एक जसप्रीत बुमराह सोडला तर भारताच्या गोलंदाजीत काही दम आहे असे वाटत नव्हते. खोलवर टप्पा ठेवून मोहम्मद सिराजने धावा लुटायला परमिट काढून दिले. त्याची अंमलबजावणी तो शेवटपर्यंत करीत राहिला. फिरकी गोलंदाजांचा चेंडू वळायचे नाव घेत नव्हता.

त्यामुळे फलंदाजाला बीट करायचे ते हवेतच; एवढेच गोलंदाजांच्या हाती होते. कुलदीप यादव कधी नव्हे ते सामान्य दर्जाचा वाटत होता. त्याने धावा मात्र रोखल्या आणि अफगाणिस्तानला घोडदौड करू दिली नाही. चांगल्या सुरुवातीनंतर अफगाणिस्तानने तीनशेचे स्वप्न पाहायला सुरुवात केली, पण अझमतुल्ला-शाहिदी ही जमलेली धोकादायक जोडी फुटली आणि धावांचा ओघ आटला. मात्र लंकेला जसा जाणवला होता तेवढा दुष्काळ नाही पडला. उलट मुजीबूर रहमान आणि रशीदने मौल्यवान धावा जमवल्या व संघाला 272 पर्यंत पोहोचवले. या पडझडीचे बरेचसे श्रेय जसप्रीत बुमराहला पण जाते. त्याने बरेच स्लोअर वन टाकले आणि फलंदाज गोंधळात पडले. त्याच्याविरुद्ध सहज धावा पण करता येत नव्हत्या. त्यामुळे विकेट भसाभस पडल्या.

- Advertisement -

भारताला रोखायची सारी मदार अफगाण फिरकी गोलंदाजांवर होती, पण सुरुवातीलाच रोहित शर्माने जो हल्लाबोल केला त्यामुळे मुजीब आणि नबी यांचा आत्मविश्वास धुळीस मिळाला. रशीदला त्यामानाने उशिरा गोलंदाजीला आणण्यात आले. त्याचाही थोडा फायदा भारताला झाला, पण एकूणच ज्या पद्धतीने कर्णधार खेळत होता ते पाहता हा सामना २५ षटकांतच संपवायचा त्याचा विचार होता असे दिसते. त्याच्या बॅटचा मेक कोणता होता माहीत नाही; परंतु चेंडूचा स्पर्श झाल्यावर तो  सीमारेषेबाहेरच जायचा. त्यासाठी रोहितला विशेष मेहनत करायला लागत होती असे वाटत नव्हते. एखाद्या आर्टिस्टप्रमाणे तो बॅटचा कुंचला फिरवत होता. त्याने प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान पहिल्या दहा षटकांतच संपवले. नंतर उरले ते फक्त सोपस्कार…! ते यथासांग पार पडले.

नाणेफेक जिंकूनही प्रथम फलंदाजी का स्वीकारली जाते हे मात्र कोडे आहे. कारण बहुतेक ठिकाणी बऱ्यापैकी दव पडते. त्यामुळे स्पिनरना चेंडू ग्रिप करायला अवघड जातो. शिवाय विकेट किंचित तेज झाल्यामुळे फलंदाजीला फायदा होतो. तरीही परवा लंकेने आणि आज अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी स्वीकारली.

भारत सध्या टॉप गिअरमध्ये खेळत असला तरी पाकिस्तानही हळूहळू त्याच गियरमध्ये येत आहे. त्यामुळे आम्ही खूप हरखून जाऊ नये. आता पुढचा सामना त्यांच्याशीच आहे. तेव्हा आटे-दालका भाव मालूम होईल.

– डॉ अरुण स्वादी

- Advertisment -

ताज्या बातम्या