दक्षिण आफ्रिका त्यांचे सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळत आहे. उपांत्य फेरीतल्या संघांसाठी ही धोक्याची घंटा आहे. अगदी भारतापेक्षाही ते सरस खेळत आहेत. नेदरलँड्सने त्यांना चकवले हे खरे, पण त्यानंतर बवुमाच्या संघाने कोणतीही दयामाया न दाखवता प्रतिस्पर्ध्याला अगदी चुरडून टाकले आहे. अपवाद फ़क्त पाकिस्तानविरुद्धचा! त्या सामन्यात या संघाला वाचवले ते एका पंचाने. भारतात येण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला अस्मान दाखवले होते. एरव्हीही भारतीय उपखंडात त्यांचे रेकॉर्ड बरे आहे, पण ते असे घणाघाती व दडपशाही क्रिकेट खेळतील, असे कोणाला वाटत नव्हते.
या स्पर्धेत सुरवंटाचे पाखरू झाले खरे! त्यांचा देश खडतर परिस्थितीतुन जात आहे. संघ निवडीसाठी गौरेतरांना कोटा पध्दत वापरली जाते, याबद्दल प्रचंड नाराजी आहे. तरीही हा संघ दिमाखात उभा राहिला आणि भल्याभल्यांना नाकी नऊ आणतो आहे.
असे फार क्वचित होते की, संघाची पूर्ण बॅटिंग लाईन फार्मात आहे, पण दक्षिण आफ्रिकेचे सर्व फलंदाज सध्या टॉप गिअरमध्ये आहेत. त्यातल्या त्यात कर्णधार बघून थोडा कमजोर कडे वाटतो क्विंटन डी कॉक तर ही शेवटची स्पर्धा असल्याने सगळे दूध के साथ वसूल कर रहा है. त्याचा लेग साईड गेम चांगलाच होता, पण आता ऑफ साईडचा गेम पण खूप सुधारला आहे. त्यामुळे त्याला नक्की कुठे गोलंदाजी करायची हा प्रश्नच पडतो.
दुस्से तसा गुणी फलंदाज, पण कोटा सिस्टीममध्ये काही वेळा त्याला बाहेर बसायला लागले. आता तो आपले स्थान हलवून-हलवून पक्के करतोय. क्लासेनकडे क्लास नेहमीच होता. आता ते तो प्रत्येक सामन्यात दाखवतो. मारक्रम तोही तसाच… डेव्हिड मिलर सुरुवातीला चाचपडत खेळत होता, पण न्यूझीलंडविरुद्ध त्याने धावांचा पाऊस पडला. शिवाय हे कमी म्हणून की काय; मार्को यांसेन सुसाट फलंदाजी करतोय. म्हणजे सध्या दक्षिण आफ्रिकन फलंदाजीला ‘सुजलाम सुफलाम’ दिवस आले आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीतही खूप वैविध्य आहे. मार्क डावरा जलदगती गोलंदाज आहे. आरामात 140 ने गोलंदाजी करतो. रबाडा तर सर्वांना परिचित आहे. एन गिडीत खूप सुधारणा झाली आहे आणि कोएट्झी कडेही वेग आहे. महाराज शमसी एकत्र किंवा आलटून-पालटून खेळतात. दोन्ही स्पिनर दोन वेगळ्या ध्रुवावरून आल्यासारखे वाटतात. थोडक्यात, या फ्रंटवर पण त्यांच्याकडे आबादी आहे. न्यूझीलंडविरुद्ध त्यांच्या गोलंदाजांनी आग ओकली आणि महाराजने त्यांना आपल्या फिरकीने गुंडाळले.
या पराभवामुळे न्यूझीलंड खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे दोन गुण तर गेलेच आणि आता ते आठ गुणांवरतीच अडकले आहेत. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे या मोठ्या पराभवामुळे त्यांचा रन रेट खूप कमी झालेला आहे. या सामन्यात पुन्हा एकदा त्यांची ना गोलंदाजी चांगली झाली ना फलंदाजी! विल्यमसनची गैरहजेरी त्यांना खूप जाणवत आहे, असे दिसतेय.
‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
कर्णधार लथमने वर खेळून पाहावे. कोन्वेचा फॉर्म कुठे हरवला माहीत नाही. त्यातच त्यांचे दोन खेळाडू जायबंदी झाल्यासारखे वाटतात. त्यांच्या या भल्या मोठ्या पराभवामुळे पाकिस्तान संघ मात्र खूश झाला आहे. त्यांना कधी नव्हे ती आता उपांत्य फेरीत पोचायची संधी उपलब्ध झाली आहे. अर्थात त्यासाठी प्रथम त्यांना न्यूझीलंडला हरवायला लागेल आणि लगोलग इंग्लंडचाही पराभव करायला लागेल. इंग्लंडची अवस्था ‘मेलेले मेंढरू आगीला भीत नाही’सारखी झाली आहे. त्यामुळे ते पाकिस्तानला जोरदार लढाई देतील, असे दिसते.
एकूणच दक्षिण आफ्रिका आणि भारत आपले स्थान बळकट करीत असताना न्यूझीलंडने आपले वर्चस्व गमावत स्वतःवरच इमर्जन्सी लादली आहे. आता उप उपांत्य फेरीत त्यांची ‘कांटे की टक्कर’ पाकिस्तानशी होणार आहे. ही ड्रीम मॅच पाहण्यासारखी असेल.
– डॉ अरुण स्वादी