Monday, November 25, 2024
Homeक्रीडाRound The Wicket: म्याव म्याव शेर ढेर...

Round The Wicket: म्याव म्याव शेर ढेर…

– डॉ अरुण स्वादी

पाकिस्तानसाठी विश्वचषक स्पर्धेचे दरवाजे अजून पूर्णत: बंद झालेले नाहीत. बांगलादेशवर विजय मिळवून पाकिस्तानने हा दरवाजा किलकिला करून आपल्याला संधी आहे का? याची चाचपणी तरी केली आहे. त्यांनी उर्वरित दोन्हीही सामने जिंकले तर ते रेसमध्ये तरी राहतील. ते इतके सोपे नाही. कारण मला वाटते, त्यांचा एक सामना न्यूझीलंडबरोबर आहे आणि दुसरा फॉर्म नसलेल्या इंग्लंडबरोबर! त्यांनी या दोघांविरुद्ध विजय मिळवला तरच त्यांना १० गुण मिळवणाऱ्या इतर संघांबरोबर स्पर्धा करायला लागेल.

- Advertisement -

ऑस्ट्रेलिया किंवा कदाचित न्यूझीलंडही तो संघ असू शकतो. थोडक्यात, बाबर आजमचा संघ अजूनही व्हेंटिलेटरवर आहे आणि डेंजरसली सिक आहे. पाकिस्तान पहिल्यांदाच जोशात खेळली. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तीनही डिपार्टमेंटमध्ये त्यांनी त्यांच्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली. शाहीनशहा आफ्रिदीने पहिला षटकात दोन बळी घेऊन बांगलादेशचे कंबरडे मोडले. त्यानंतर ते कधीही रिकव्हर झाले नाही. शाकीब आणि मेहदी दोघांनी एक छोटीशी भागीदारी केली आणि दाट अंधारात त्यांच्यासाठी दिवा लुकलुकला.

२०४ धावसंख्या ईडन गार्डनच्या पाटा विकेटवर तुटपंजी ठरणार हे माहीत होते. फकर झमन आणि अब्दुल्ला यांनी हे ध्येय गाठण्यासाठी सुरुवातीपासून हल्लाबोल केला आणि त्या हल्ल्यातून बांगलादेश कधीच रिकव्हर झाले नाहीत. त्यांच्या फलंदाजीचे सपशेल पानिपत झाले गोलंदाजही काही अपवाद वगळता कुठेही भेदक मारा करत आहेत, असे जाणवले नाही. मेहमुदल्ला याचा एकमेव अपवाद वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाने खेळपट्टीवर पाय रोवून प्रतिकार करायचा प्रयत्न केला नाही.

सामान्यतः विश्वचषक स्पर्धांमध्ये बांगलादेशचा खेळ नेहमी चांगला होतो. भल्याभल्या संघांना मात देऊन ते मोठा उलटफेर करतात. यावेळी असे काहीही झाले नाही. सलग सहा पराभवांचे धनी होत त्यांनी या स्पर्धेतून आपला भाषा गुंडाळला आहे.

याउलट शाहीनशहा आफ्रिदी सुरुवातीच्या षटकांत चेंडू स्विंग करू लागला आणि त्याला विकेट मिळाल्या तर पाकिस्तानचा हाच गोलंदाजीचा अटॅक विलक्षण तेज वाटतो. वासिम ज्युनिअर दोन्हीकडे सीम करू शकतो. त्याची गोलंदाजी निश्चितपणे प्रभावी वाटते. त्यामुळे हसन अलीची दुखापत पाकिस्तानच्या पथ्यावर पडू शकेल असे संकेत दिसत आहेत. ओसामा मीर हुशार लेग स्पिनर वाटतो. चेंडूला उंची द्यायला तो घाबरत नाही. मात्र मोठ्या संघांपुढे तो उघडा पडू शकतो. परंतु तो चांगला विकेट घेणारा पर्याय ठरू शकतो.पाकिस्तानचे क्षेत्ररक्षण पण खूप सुधारले आहे. त्यांनी यावेळी चक्क चेंडू अडवले आणि काही सुरेख झेलही घेतले.

फलंदाजीत फकर झमन चमकला. तसाही तो वन-डेचा त्यांचा मुख्य खेळाडू! एक दोनदा लवकर बाद झाला की, त्याला नारळ द्यायच्या गोष्टी सुरू होतात, पण एकदा जम बसल्यावर तो लांब लांब छक्के मारत तुफानी खेळतो. त्याच्यापुढे इमाम अगदी अळणी लोणचं वाटतो. त्यामानाने अब्दुल्ला ठीक वाटतो. थोडक्यात, एक संघ सब कुछ लुटाके ढाका जा रहा है आणि आणि दुसरा उम्मीदोंका चमन ना उजडे इसलिये लढ रहा है।

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या