Friday, May 17, 2024
Homeक्रीडाRound The Wicket: इंग्लिश क्रिकेटची दैना

Round The Wicket: इंग्लिश क्रिकेटची दैना

– डॉ अरुण स्वादी

इंग्लिश क्रिकेटचे वर्तुळ पूर्ण झाले आहे. २०१५ च्या ऑस्ट्रेलियामधील विश्वचषक स्पर्धेत त्यांना उपांत्य फेरी तर गाठता आली नाहीच, पण पार नाचक्की झाली होती. त्यानंतर त्यांनी केलेल्या चुकीपासून धडा घेतला. नवीन टीम बांधली. क्रिकेट खेळायचा नवा मंत्र शोधला आणि मॉर्गनच्या नेतृत्वाखाली त्यांनी २०१९ ची इंग्लंडमधील विश्वचषक स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा जिंकण्यात नशिबाचा भाग होता हे मान्य केले पाहिजे.

- Advertisement -

त्यानंतर त्यांच्या अधोगतीला सुरुवात झाली आणि आता पुन्हा एकदा २०२३ मध्ये त्यांची घसरगुंडी झाली. एक वेळ तर अशी आली होती की, ते तळाचे मनसबदार होतात की काय? असे वाटले. शेवटचे दोन सामने जिंकून त्यांनी स्वतःला चॅम्पियन ट्रॉफी करता पात्र ठरवले; एवढीच त्यांची या विश्वचषक स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरी! माजी विश्वचषक विजेते आणि संभाव्य विजेते इंग्लंड या देशाची आताच्या स्पर्धेत पार फरफट झाली. कुठेही ते अजिंक्य वाटले नाहीत. ‘काप गेली आणि भोके राहिली’ अशी त्यांची अवस्था झाली.

याला कारणे काय? कारण क्रमांक एक. इथल्या खेळपट्ट्या! धरमशाला ते बंगळुरू या प्रवासात त्यांना खूपदा वेगळ्या खेळपट्ट्या मिळाल्या. बहुतेक ठिकाणी पीचेस सारखी होती. त्यामुळे ते रुळले नाहीत. इतर परदेशी संघ मात्र छान ॲडजस्ट झाले. शिवाय ते बझ क्रिकेट खेळले कुठे? आल्या-आल्या बेअर स्टो बाद व्हायचा. रुटचेही तेच.

दोन पायातून स्टंपवर स्वीप करायचा. मग बझ क्रिकेट खेळणार कधी? गेल्यावेळी इंग्लंडने जुना झालेला चेंडू बदडून काढला होता, पण यावेळी ना बटलर, ना ब्रुक्स तसे करू शकले. दोन सामने घालवल्यावर बेन स्टोक्सला ते जमायला लागले. थोडक्यात, त्यांच्या यशस्वी फॉर्मुलाचे तीन तेरा वाजले. आदिल रशीद फारसा चालला नाही आणि मोईन अली सुरूवातीला अपयशी ठरल्यावर लिविंगस्टन या कामचलाऊ लेगस्पिनरला खेळवले गेले.

कोलकात्यात मोईनने हातभर चेंडू वळवले आणि आपण त्यातल्या त्यात बरे आहोत हे बटलरला दाखवून दिले. इंग्लंडचे बरेच खेळाडू आता निवृत्तीकडे झुकले आहेत. बटलर, बे अरस्टो, मालन, मोईन विली, रूट सगळे उतरणीला लागले आहेत. त्यामुळे २०२७ साठी त्यांना आता नवीन टीम बांधावी लागेल, असे दिसते.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या