Tuesday, November 26, 2024
Homeक्रीडाराऊंड द विकेट : इतिहासाची पुनरावृत्ती...

राऊंड द विकेट : इतिहासाची पुनरावृत्ती…

पुन्हा एकदा ‘ये रे माझ्या मागल्या, ताक-कण्या चांगल्या’ म्हणत आमची टीम अंतिम सामन्याच्या भोज्याला पाय लावून परत आली. नाणेफेक जिंकण्यापलीकडे या अंतिम सामन्यात काहीही आपल्या मनासारखे झाले नाही. पहिल्या दिवशी, पहिल्या सत्रात, पहिल्या तासात आपण या सामन्यात आहोत, असे निश्चित जाणवत होते, पण ट्रे विस हेडने आल्या-आल्या प्रतिआक्रमण केले आणि भारतीय संघासमोर मोठी डोकेदुखी निर्माण केली. या डोकेदुखीचा उपाय सापडेपर्यंत हेडने आपल्या संघाला सामन्यावर पूर्ण वर्चस्व मिळवून दिले होते. त्यानंतर दोनदा भारताने आशा निर्माण केल्या, पण त्या तशाच अवकाळी पावसात वाहून गेल्या. भारताला पुन्हा एकदा दारुण पराभवाला सामोरे जायला लागले. दोन्ही वेळेस अंतिम सामन्यात झालेला हा पराभव भारताला गुंटूरची कडक मिरची खाल्ल्यागत झोंबणार यात शंका नाही.

पराभवानंतर पोस्ट मॉर्टेम तर होणारच…! सध्या गावस्कर सर फॉर्मात आहेत. दोन-तीन वर्षांपासून ते खेळाडूंची हजेरी घेताना दिसतात. सध्या रोहित शर्मा त्यांचा दोडका विद्यार्थी झाला आहे. त्याच्या बाद होण्याचे गावस्करांना बिलकुल आश्चर्य वाटत नाही. आम्हाला तरी कुठे वाटते? माझा तर संशय आहे, आजकाल तो आधीच ठरवल्याप्रमाणे पूर्वनियोजित (प्री-मेडिटेटेड) फटका मारायला जातो. फिरकी गोलंदाज आला रे आला की, तो हमखास पूल किंवा स्वीप करणार हे तर ठरून गेले आहे. रोहित पहिला किंवा दुसरा चेंडू मिड विकेट ते फाईन लेगच्या पट्ट्यात मारणार नाही हे निव्वळ असंभव…! बाद व्हायला त्याला कोणताही फिरकी गोलंदाज चालतो.

- Advertisement -

करण शर्मा, दीपक हूडासुद्धा चालतो. इथे तर नेथन लॉयन होता आणि मला वाटते हे आयपीएल नव्हते. सेट झाल्यावर त्याने जितक्या वेळा विकेट फेकली आहे ते पाहता तो आधुनिक कुबेर आहे का असे वाटावे. तो बाद झाला की, लोकांना वडापावची आठवण येते. त्याच्या वजनावर चर्चा सुरू होते. त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उभे राहते. रोहितने आपल्या कर्माने टी-२०चे नेतृत्व आणि संघातली जागा घालवली आहे, असे मला तरी वाटते. अब बारी है वन डे की…! हा किल्ला त्याच्या हातून जाऊ नये असे मनापासून वाटते…!

रोहित शर्माला विश्रांती द्या म्हटले की लगेच विराट कोहलीचे नाव येते. हा विराटवर अन्याय वाटतो. एक तर तो संपूर्ण फिट खेळाडू आहे. शिवाय तो प्रयत्नात कुठेही कमी पडत नाही. विकेट फेकणे त्याच्या रक्तात नाही. या कसोटीत दोन्ही डावांत त्याला अफलातून बॉल मिळाले व तो बाद झाला. पूर्वी तिशी ओलांडली की, तो सेंच्युरी मारायचा. आता तसे होत नाही. तो गोलंदाजांना त्याला बाद करायची जास्त संधी देतोय एवढेच. कदाचित मोठ्या खेळीसाठी तो स्वतः वर दडपण आणत असावा. रोहित आणि विराट एकाच पद्धतीचे फलंदाज नाहीत. त्यांना मोजायची फुटपट्टी पण एकच नसावी. मात्र रवी शास्त्री म्हणतात तसे संघासाठी तो कॅप्टन म्हणून जास्त योग्य ठरला असता हे मात्र पटत नाही. नेतृत्वाच्या रेसमधून तो कायमचा बाद झाला आहे, असे म्हणणे धोक्याचे ठरेल, पण आम्हाला हवाय शतकांवर शतके ठोकणारा फलंदाज विराट कोहली. आज त्याची जास्त गरज आहे.

मला मजा वाटते या माजी कसोटीवीरांची. त्यांना संघात अश्विन हवा होता. त्याची ऑफ स्पिन फिरकी हवी होती. कारण स्मिथ लबुशेनना त्याने खूपदा बाद केले आहे, पण त्यासाठी जाडेजाला वगळावे, असे ठामपणे कोणीच म्हटले नाही. मांजरेकर साहेब तसे म्हणाले असतील तर मला माहीत नाही, पण ते वैयक्तिक साप-मुंगूसाचे वैर आहे; म्हणून दुर्लक्ष केलेले बरे! बहुतेक जण या विषयावर तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प बसले होते. विकेट वरकरणी तरी गवतामुळे तेज वाटत होती. मधून-मधून ढग पावसाचा अंदाज होताच. तो चुकला हा भाग वेगळा. त्यामुळे दोन फिरकीपटू खेळवण्यात मोठाच धोका होता, पण जगातल्या नंबर वन गोलंदाजाला संघात जागा नाही ही गोष्टच गावस्कर साहेबांना रुचली नाही.

त्याला जडेजाबरोबर घ्यायचे की जडेजाच्या जागी घ्यायचे हा गुंता सोडवायचा कसा हे मात्र त्यांनी सांगायचे टाळले असावे. सचिनलाही अश्विनला जागा मिळायला पाहिजे होती असे वाटले. त्याचे कारण मात्र ऑस्ट्रेलियाचे पहिल्या आठ पैकी पाच फलंदाज डावखोरे होते. शिवाय सिमिंग वातावरणात त्याने भेदक गोलंदाजी केली नसती, असे संघाला का वाटले हा प्रश्न त्याला पडला आहे.  अश्विनचे रेकॉर्ड भारताबाहेर वाईट नाही. (कुंबळेचे फारसे बरे नव्हते). दोन वर्षांपूर्वी भारत न्यूझीलंड विरुद्ध अंतिम सामना खेळला तेंव्हादेखील अश्विनचे काय करायचे या प्रश्नाने संघ व्यवस्थापनाची झोप उडवली होती.

विराट व शास्त्रीने त्यावेळी एक सीमर वगळून अश्विनला घेतले. पावसाळी वातावरण आणि सिमिंग विकेटमुळे भारताने इशांत शर्मा, बुमराह व शम्मीबरोबर चौथा तेज गोलंदाज निवडायला पाहिजे होता, असा पोस्ट मॉर्टेमचा अहवाल आला, पण नंतर छाती बडवून काय फायदा..? सहाव्या दिवशी भारत आणखी तास-दीड तास खेळला असता तर सामना अनिर्णित राहिला असता. आमच्या फलंदाजांना तेवढेही जमले नाही. यावेळी तरी काय झाले? अजिंक्य रहाणे सोडला तर बाकीचे सारे कामावर आले आणि पगारापुरते काम करून पाट्या टाकून गेले. पुजाराला तेही जमले नाही. त्याने फक्त कौंटी क्रिकेट आणि टेस्ट क्रिकेट यात केवढी दरी असते हे सप्रमाण दाखवून दिले.

इंग्लंडमध्ये रुळायला किमान तीन आठवडे लागतात, असे द्रविड सर म्हणतात, पण मग आयपीएलचे काय? जडेजा, रहाणे आणि गिल तर इंग्लंडला जेमतेम पोचले. आमचा संघ फायनलला पोचणार नाही याची मंडळाला खात्री असावी. किंवा पैशापुढे ते डोळेझाक करत असावेत. पॅट कमिन्स आणि स्टार्क अशेससाठी ताजेतवाने राहण्यासाठी आयपीएलचा  पैसे सोडतात. आमचे मंडळ अंतिम सामना सोडते आणि हे चित्र पहिल्यांदा दिसलेले नाही. थोडक्यात, पुन्हा एकदा किंचित नव्या संचाने जुन्या नाटकाचा पुन्हा एक फ्लॉप शो केला.
चांगलं खेळून उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरी गाठायची आणि मग नांगी टाकून सपशेल शरणागती पत्करायची हेच चित्र गेली दहा वर्षे पाहायला मिळते आहे. कधी थांबणार इतिहासाची ही पुनरावृत्ती?

– डॉ अरुण स्वादी

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या