बस झाले ते आयपीएल पुराण…! चेन्नई सुपर किंग जिंकले. छान झाले. कर्णधार महेंद्रसिंग धोनी जिंकला. खूप छान झाले. रवींद्र जाडेजाने दिलेला फिनिशिंग टच लई भारी… मस्त…! पाचव्यांदा स्पर्धा जिंकून यलो ब्रिगेडने मुंबईशी बरोबरी केली. झकास झाले, पण ही स्पर्धा म्हणजे काय विश्वचषक स्पर्धा होती? आपल्याच देशातल्या धनाढ्य क्रिकेट मंडळाने १० अतिश्रीमंत लोकांना बरोबर घेऊन टी-२० क्रिकेटचा उरूस भरवला होता एवढेच. त्यात प्रचंड करमणूक होती. धूम धमाल होती. अगदी मज्जाच मज्जा होती हे मात्र खरे! पण ती काही वेगवेगळ्या देशांच्या संघातली स्पर्धा नव्हती.
अगदी दोन देशांमधल्या संघातला सामना नव्हता, पण जिंकलेला संघ असा काही विजय साजरा करत होता की वाटावे त्यांनी वर्ल्डकप जिंकला आहे. अर्थात बहुतेक संघ जिंकल्यावर असेच करतात. मुंबई काय आणि चेन्नई काय, एकाच माळेचे मणी! दोन वेळा विश्वचषक जिंकणारा कर्णधार माही तेंव्हा किती स्थितप्रज्ञ होता हे सर्वानी पाहिले आहे.यावेळी त्यालाही जग जिंकल्यासारखा आनंद झाला होता. काय करू अन काय नको असे झाले होते.
त्याची ही अवस्था तर इतरांचे काय ? न्यूझीलंडचा सामनावीर डेवोन कॉन्व्हे तर म्हणाला, माझ्या आजवरच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम विजय, पण त्याचे देशवासी भडकले तेव्हा त्याने आपले स्टेटमेंट बदलले. दोन वर्षांपूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील त्यांचा अंतिम सामन्यातील विजय जास्त महत्वाचा होता, पण हे तो विसरून गेला होता.
अनुकंपा नोकरदार ते मनपाच्या शिक्षणाधिकारी; लाचखोर सुनीता धनगरांची ‘अशी’ आहे कारकीर्द
आयपीएल नावाच्या अफूच्या गोळीमुळे आम्ही अजुनही जाडेजाच्या त्या पराक्रमाचीच चर्चा करतो आहोत. माही किती ग्रेट कर्णधार आहे हे पुन्हा पुन्हा सांगतो आहोत. तो किती महान आहे हे आयपीएलमुळे ठरत नाही. त्याचा आंतरराष्ट्रीय इतिहास ते स्पष्ट सांगतो. धोनी म्हणतो, ‘लोकांच्या प्रेमाखातर तो निवृत्त होऊ इच्छित नाही. ‘खरे तर शंभर टक्के ती वेळ धोनीच्या निवृत्तीची होती. पुढच्या वेळी असाच चमत्कार घडेल याची कोण खात्री देईल ? त्याची टीम सुरेख जमली आहे, बेन स्टोक्सला नारळ दिल्यावर सोळा कोटी मोकळे होतील. शिवाय रायडू पण शाल-श्रीफळ घेऊन निवृत्त झालाय.
पुढे टीम आणखी स्ट्रॉंग बनेल. तरीही तेच जिंकतील याची काय गॅरंटी ? मला वाटत होते धोनी भारतात होणाऱ्या ५० षटकांच्या विश्वकप स्पर्धेसाठी खेळायची तयारी दाखवेल. अर्थात हे सोपे नव्हते आणि नाही. कारण तो ५० षटकांचा कप आहे. टी-२० नाही. त्यासाठी वेगळा फिटनेस लागतो. एक्केचाळीस वर्षांच्या खेळाडूकडून तशी अपेक्षा करणे चूक आहे.
तरीही वाटते, इतर देशातही या प्रकारचे कार्निव्हल भरतात, पण भारतातल्या लीगची व विजयाची जेवढी चर्चा होते तशी ती इतरत्र होताना दिसत नाही. कोणी सांगेल ऑस्ट्रेलियात बिग बॅश स्पर्धेचा विजेता कोणता संघ आहे? पाकिस्तान क्रिकेट लीग चॅम्पियनबद्दल आपल्याला किती माहिती आहे? पण हे लोक सेमिफायनल फायनल खेळतात आम्ही आयपीएलमध्ये बार उडवतो. असो.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...
Nashik Crime : काय म्हणावं या चोरट्यांना? चक्क ATM च पळवलं अन् पुढे ‘असं’ घडलं
आता जागतिक टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरू व्हायला फक्त काही तास उरले आहेत. मुंबई इंडियन्सचा रोहित किंवा आरसीबीचा विराट काय करतो यापेक्षा भारताचा शामी आणि सिराज इंग्लिश हवामानाचा किती फायदा उठवतील यावर चर्चा व्हावी असे मला वाटते. मोहित शर्मा सुरेख यॉर्कर टाकत असताना हार्दिक पांड्याने काहीतरी उपदेश करून त्याची लय कशी बिघडवली, असल्या चर्चेला आता सर्वांनी पूर्ण विराम दिला पाहिजे.
– डॉ. अरुण स्वादी