– डॉ. अरुण स्वादी
जिंकायची जशी सवय लागते तशी हरायची पण सवय लागते. इंग्लंड आता जिंकायचे विसरले आहे. त्यामुळे जिंकायच्या स्थितीतून ते सहज हरतात. आज त्यांची अवस्था ‘अंगं गलितं’ अशी झाली आहे. ऑस्ट्रेलियाची त्यांनी चांगलीच नाकेबंदी केली होती.
२४७/८ अशी अवघड परिस्थिती असताना झंपा फलंदाजीला आला. त्याने मिशेल स्टार्कबरोबर जवळपास ४० धावा जोडल्या. शेवटी दोन संघांमधला फरक या धावाच ठरल्या. इंग्लंड त्यावेळी हतबुद्ध झाल्यासारखे दिसत होते. त्यानंतर स्टोक्स खेळत होता तोपर्यंत त्यांना विजयाची संधी होती, पण त्याने अगदी ठरवून मारल्यासारखा शॉर्ट फाईन लेगला झेल कोलून दिला.
‘घर फिरते तेव्हा घराचे वासे पण फिरतात’ म्हणतात ना; तसे होत आहे इंग्लंडचे! कांगारूंना आता त्या मानाने सोपे सामने आहेत. या विजयामुळे त्यांचे बस्तान आता ठीक बसले आहे. याउलट पाकिस्तानची स्थिती आहे. एका फखर झमनमुळे त्यांच्या वृत्तीतच फरक पडला आणि त्याला ड्रॉप करायच्या गप्पा चालू होत्या म्हणे. फखर त्यांचा बिग मॅच प्लेअर आहे. फारशी ताकद न लावता तो छक्के मारतो. त्याने बंगळुरूच्या छपराची पार वाट लावली.
त्याबरोबर न्यूझीलंडची पण वाट लागली. चारशे धावा करूनही त्यांच्या नशिबी पराभव आला. डकवर्थं लुईसने घात केला, असे ते म्हणू शकतात. परंतु सामना पन्नास षटके झाला असता तरीदेखील तो पाकिस्तानने जिंकला असता, असे वाटते. आता किविज गॅसवर आहेत. त्यांना रन रेट चांगला ठेऊन लंकेला हरवायला लागेल. पाकिस्तानला गलितगात्र झालेल्या इंग्लंडला असेच मोठ्या फरकाने हरवायचे आहे. पाकिस्तानला कमी समजू नका रे बाबांनो!