Thursday, May 23, 2024
Homeक्रीडाराऊंड द विकेट : शिकार हो के चले....!

राऊंड द विकेट : शिकार हो के चले….!

डॉ. अरुण स्वादी

फिरकी खेळपट्टीच्या प्रेमात पडलेल्या भारतीय क्रिकेट संघाचे, ‘शिकार करनेको आए, शिकार हो के चले’ अशी अवस्था झाली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर, फिरकी खेळपट्टीवर सव्वा दोन दिवसांत नऊ विकेट्सनी सामना हरायची मोठी नामुष्की भारतीय संघावर आली. तीसुद्धा अशा संघाकडून की ज्यांना आधीच्या दोन्ही कसोटी सामन्यांत भारताने धोबीपछाड दिला होता. फिरकी खेळपट्टीचा डाव इतका उलटेल, असे रोहित शर्मा आणि राहुल द्रविडच्या ध्यानी-मनी नसेल. सापशिडीतल्या खेळाप्रमाणे भारतीय संघाला सापाने गिळंकृत केले आणि ऑस्ट्रेलियाचा संघ शिडीवरून बरोबर टॉपला चढून गेला.

- Advertisement -

भारताचे नेमके काय चुकले? विकेट खरेच इतकी खराब होती? कोणी म्हणतात तसे कव्हरखालच्या ओलसरपणामुळे पाहिल्या दिवशी लंचपर्यंत चेंडू बेभान झाल्यासारखा वर-खाली उधळत होता का? कंगारुंनी जी अतिआक्रमक व्हायची चूक केली तीच चूक आपण गिरवली का? की ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज योग्य टप्प्यावर चेंडू टाकत होते आणि आम्ही लाईन आणि टप्पा पार विसरलो? कारणे काहीही असोत, भारताच्या डावपेचांना स्टीव स्मिथ आणि त्याचे सहकारी पुरून उरले हे मात्र खरे! त्यांच्या फलंदाजांनी, विशेषतः उस्मान ख्वाजा, लाबुशेनने पहिल्या डावात स्पिनरवर तुटून न पडता संयमाने खेळ केला आणि दुसर्‍या डावात हेडने डोके वापरून, आक्रमण करीत छोट्या आव्हानातली हवाच काढून घेतली.

याउलट रोहित शर्मापासून सारे जण किमान पहिल्या डावात तरी सामना दोन दिवसांचा असल्यासारखे खेळले. चेंडू पहिल्या सत्रात नको तितक्या कुरापती काढत होता हे खरे, पण आमच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यासारखा खेळ केला. याचा काय अर्थ काढायचा? कांगारू आता स्पिन खेळायला शिकले ? आणि भारतात फिरकीसाठी कोणता टप्पा आणि दिशा निर्णायक ठरते हे त्यांच्या गोलंदाजांना कळाले?

पहिल्या दोन्ही कसोटीत ऑस्ट्रेलियाचा मोठा पराभव झाला हे खरे, पण या सामन्यात एका निर्णायक क्षणी कांगारू बाजी पलटवू शकत होते. पाहिल्या कसोटीत कर्णधार रोहित शर्मा बाद झाला तेव्हा आमच्याकडे नाममात्र आघाडी होती, पण जडेजा, आश्विन आणि अक्षर पटेलने त्यांना सुस्थितीत आणून सोडले. दुसर्‍या कसोटीत तर सात बाद 139 धावा असताना अक्षरने पुन्हा जडेजाला साथीला घेऊन नेटाने सामना करीत फक्त एका धावेची आघाडी घेऊ दिली. त्यानंतर सामना फिरला. इंदूरला भारत कुठल्याही क्षणी तोडीस तोड नव्हता. रोहित बाद असलेल्या, पण नाबाद ठरलेल्या पाहिल्या चेंडूपासून शेवटपर्यत कांगारू आघाडीवर राहिले. अगदी 11 धावांत सहा विकेट गमावल्या तरीही.

चौथी कसोटी सुरू व्हायला फार वेळ नाही, पण असे दिसतेय की, आमचा आत्मविश्वास पार ढासळला आहे. त्यामुळे प्रथमच कांगारूंना ही मालिका बरोबरीत सोडवायचे गोड स्वप्न पडले असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या