डॉ. अरुण स्वादी
कसोटी क्रिकेट म्हणजे एक-एक घोट पीत राहावी, अशी वाईनच, पण नुसत्या फेसाळणार्या सोड्यासारखा असणार्या टी-20 क्रिकेटचे सध्या लोकांना अप्रूप आहे. त्यामुळे असे क्रिकेट पाहायच्या फंदात कोणीच पडत नाही. किमान तरुणाई तरी कसोटी क्रिकेटकडे पाठ करताना दिसते. नुकसान त्यांचेच आहे. काल बरोबरीत सुटलेल्या शेस मालिकेतील कसोटी क्रिकेट एवढ्या उच्च दर्जाचे होते की, या मालिकेत खेळला गेलेला प्रत्येक चेंडू आणि क्षण कायमचा जपून ठेवावा. पराकोटीचे आनंददायी वाटणारे इंग्लंडचे ‘बझ क्रिकेट’; त्याला कांगारुंनी दिलेले निग्रही उत्तर यामुळे ही मालिका छान रंगली. निकाल लागलेले चारही कसोटी सामने चुरशीचे ठरले.
जिंकण्या-हरण्यातले अंतर मिलिमीटरमध्ये मोजायला लागावे इतके कमी होते. मोक्याच्या क्षणी ज्याने जास्त चुका केल्या तो संघ हरला. चौथी कसोटी इंग्लंड सहज जिंकू शकली असती, पण पाऊस नावाचे मांजर आडवे आले. शेवटच्या सामन्यात पुन्हा एकदा कमजोर दिलवालोंकी स्ट्रेस टेस्ट हो गयी, पण यजमान संघाने दिलो-जिगरसे खेळत सामना जिंकला आणि मालिका बरोबरीत सोडवली. मात्र ‘शेस’ ऑस्ट्रेलियाकडे असल्याने त्या त्यांच्याकडेच राहिल्या. ही मालिका इंग्लंडने सहजपणे जिंकायला हवी होती, पण अँडरसनचा हरवलेला स्विंग स्कॉटलंड यार्डलादेखील सापडला नाही. त्यामुळे त्यांचा इंग्लिश हवामानातील हुकुमी एक्का दुर्री ठरला. मालिकेत मोजून सहा विकेट घेऊन त्याने पूर्ण निराशा केली. ज्या विकेटवर वोक्स चेंडू हातभर स्विंग करत होता, तिथेही जिमीची डाळ शिजली नाही.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
एक महत्त्वाचे अस्त्र निकामी झाल्याने आणि कर्णधार स्टोक्स स्वतः गुडघ्यामुळे गोलंदाजी करत नसल्याने नाही म्हटले तरी इंग्लंडची गोलंदाजी कमजोर वाटत होती. मार्क वूड वोक्स आणि स्टुअर्ट ब्रॉडने जीव तोडून जबाबदारी पेलली. एरवी इंग्लंडचे काही खरे नव्हते. उलट नेथन लायन अचानक जखमी झाल्यामुळे बाहेर झाला आणि कांगारुंनी मॅचविनर गमावला. मर्फीने त्याची जागा काही अंशी भरून काढली, पण टीमचा विश्वास नसल्याने त्याला आपला हूनर दाखवायला ओवल कसोटी उजाडली.
दोन्ही संघांची फलंदाजी जबरदस्त बहरली होती. इंग्लंड ‘कुछ भी हो जाये, कोई फर्क नहीं पडता’ म्हणत बझ क्रिकेट खेळली. अगदी क्रॉलीसारखा रांगणारा फलंदाज सुसाट खेळला. डकेतने नावाप्रमाणे डाका घातला. रूट, ब्रुक्स व बेअरस्टॉ यांनी पण धडाका लावला. एकूणच हे सारे करमणूकप्रधान चित्रपटातले कलावंत वाटत होते. उलट कांगारुंनी मात्र कसोटी रितीरिवाज पाळत बॅटिंग केली आणि त्यात ते यशस्वी झाले. ख्वाजा आणि स्टीव स्मिथ तर ओल्ड वाईनसारखे वाटले आणि हेड जेव्हा खेळला तेव्हा त्याने सामना फिरवला.
शेवटच्या डावात बदललेल्या नव्या चेंडूने त्यांचा घात केला. एरवी स्मिथ व हेडने तो सामनाही जिंकलाच होता. इंग्लंडने यात काही चालबाजी केली का? यावर चर्चा होत आहे, पण इंग्लिश विकेट किपरला बाद करताना ऑसी विकेट किपरनेदेखील चलाखी दाखवली होती. नहलेपे देहला मिलताही है। या आणि अशा प्रकारच्या वादविवादामुळे गाजलेल्या या मालिकेत पंचांची व सामनाधिकारी यांचीसुद्धा कसोटी लागली होती. ते विशेष प्रावीण्य मिळवून पास झाले असे म्हणायला हरकत नाही. इंग्लंड सरस असूनही आपल्या देशात निर्णायक जिंकू शकले नाहीत. तर ऑस्ट्रेलिया 2-0 आघाडी घेऊनही इंग्लंडला धोबीपछाड देऊ शकली नाही.
कमिन्सचे मालिका विजयाचे दोन दशकांचे स्वप्न तसेच विरले. पुन्हा इंग्लिश टूर असेल तेव्हा स्टार्क, स्मिथ वॉर्नर हेजलवुड लायन आणि स्वतः कर्णधार संघात असायची शक्यता दुरापास्त आहे. मात्र आपण जबरदस्त टक्कर दिली, याचे समाधान प्रत्येक ऑस्ट्रेलियन खेळाडूला वाटले असेल. बेन स्टोक्स मात्र मनातल्या मनात विजयाची संधी हिरवणार्या ओल्ड ट्रॅफर्डच्या धुवाधार पावसाला दूषणे देत असेल.