Wednesday, July 24, 2024
Homeक्रीडा... तर पोहर्‍यात कसे येईल?

… तर पोहर्‍यात कसे येईल?

डॉ. अरुण स्वादी

- Advertisement -

पाचवेळा आयपीएल ( IPL ) जिंकणार्‍या मुंबई इंडियन्सना ( Mumbai Indians )नक्की काय झालेय असे सर्वांना वाटू लागले आहे. पहिल्या सातपैकी सात सामने हरायची नामुष्की आयपीएलमधील सर्वात सफल टीमवर ओढवली आहे. पण मला विचाराल तर कारण एकदम सोपे आहे. ‘आडातच नाही तर पोहर्‍यात येणार कुठून?’ ऑक्शनमध्ये मुंबईने निवडलेले खेळाडू टुकार आहेत, असे माझे स्पष्ट मत आहे.

एका ईशान किशनला घेण्यात त्यांनी आपला सगळा खिसा रिता केला. ईशान तसा प्रतिभावंत खेळाडू आहे. शिवाय यष्टिरक्षक आहे. सलामीचा फलंदाजही आहे. एका दगडात तीन पक्षी मारायचा त्यांचा प्रयत्न स्पर्धा सुरू झाल्यावर मात्र अपयशी ठरतोय. पंधरा कोटी पाण्यात जातील, असे दिसते आहे. त्यापेक्षाही मोठी चूक केली ती किरॉन पोलार्डला रिटेन करून! पॉलीने मुंबईला अनेक विजय मिळवून दिले हे अगदी खरे, पण सध्या त्याची बॅट गुंगी गुडिया झाली आहे.

त्यातच तो आला की प्रतिस्पर्धी संघ फिरकी गोलंदाज आणतो. लेग स्पिन, ऑफ स्पिन, डावरा बॉलर कोणीही येतो आणि पोलार्डची शाळा करून जातो. पॉली टिकला तर आठ-दहा बॉल खाऊन टाकतो आणि मग सीमारेषेवर विशेषतः बॉलरच्या बरोबर मागे झेल देऊन तो बाद होतो. त्याला घ्यायचेच होते तर ऑक्शनमध्ये दोन-तीन कोटीला घेता आले असते. मला वाटते हे पण जास्त झाले. म्हातारा घोडा, रेसचा असला तरी त्याच्यावर कोण पैसे लावणार? त्यापेक्षा डिकॉक किंवा बोल्टला रीटेन केले असते तर नसते का चालले? पोलार्डचे दिवस आता संपले आहेत हे गेल्या सिझनमध्ये दिसत होतेच. मुंबईची ही पहिली अक्षम्य चूक!

जॉफ्रा आर्चरवर बोली लावून त्याला विकत घेतले हा मुंबईचा मास्टर स्ट्रोक, पण दुसर्‍या दिवशी ही शक्कल लढवली गेली. तोपर्यंत सत्तर टक्के टॉप खेळाडू इतर संघांनी उचलले होते.त्यामुळे आर्चर मिळाला, पण गड मात्र गेला. निवडीसाठी यांच्या वाट्याला दुसर्‍या दिवशी दुय्यम दर्जाचा माल आला. शिवाय जॉफ्रा यावर्षी खेळणार नव्हताच. त्यामुळे यावर्षी तरी हा निर्णय मुंबईच्या अंगलट आला आहे. मात्र त्यांनी निवडलेले मिल्स आणि मेरिडिथ तितके वाईट नव्हते. हे फास्ट बॉलर पुढच्या वर्षी धुमाकूळ घालतील. मात्र बुमराह, आर्चर फिट पाहिजेत, पण फिरकी गोलंदाजीचे काय? मुरुगन आश्विन प्रमुख गोलंदाज होऊ शकतो? आता तरी त्या झंपाला उचला म्हणावे. ऑक्शनमध्ये पूर्वी त्यांनीच निवडलेल्या चहलला घ्यायची संधी चालून आली होती, पण आर्चरच्या प्रेमात आंधळे झाल्यामुळे त्यांना कोणी दिसतच नव्हते.

हार्दिक पंड्या त्यांना हवा होता, पण गुजरातने त्याला आधीच उचलले आणि कर्णधार बनवून सोने केले. त्याला पर्याय म्हणून निवडलेला टीम डेव्हिड संधीची वाट पाहतोय. तो होतकरू आहे हे निश्चित, पण पॉली गळ्यातला ताईत असल्याने त्याला संधीच मिळत नाही. टीम निवडताना झहीर आणि जयवर्धने यांनी असंख्य चुका करून आपल्या पायावर धोंडा मारला असला तरी बेबी एबी आणि तिलक वर्मा ही दोन्ही पोरे मात्र छान उचलली आहेत. ही त्यांची पुढच्या वर्षांची गुंतवणूक आहे.

पुढच्या हंगामात जेव्हा मुंबई काही खेळाडू रिलीज करेल तेव्हा एक चांगला आंतरराष्ट्रीय अनुभव असलेला स्पिनर आणि अष्टपैलू फलंदाज निवडतील याची मला खात्री आहे. आज हा संघ सगळ्यांकडून मार खातोय, पण कोणी सांगावे पुढले वर्ष त्यांचे असेल. सध्या मात्र झहीर खान आणि महेला जयवर्धने अपयशी कर्णधार व फलंदाज रोहित शर्माबरोबर मालक आणि चाहते यांच्या निशाण्यावर असतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या