नागपूर | Nagpur
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Rss) स्थापनेला आज शनिवारी ९९ वर्ष पूर्ण झाले असून संघाने शताब्दी वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्ताने नागपूरमध्ये (Nagpur) संघ मुख्यालयात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांचं मुख्यालयात भाषण झाले. यावेळी मोहन भागवत यांनी भारताची वाटचाल व जागतिक स्तरावरील आव्हानं याबाबत भाष्य केलं. त्याचवेळी, त्यांनी हिंदू समाजाला संघटित राहण्याचं आवाहन केलं. यावेळी बांगलादेशमधील परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं.
यावेळी बोलतांना भागवत म्हणाले की,”आज भारतात (India) सर्वत्र मूल्यांचा ऱ्हास आणि भेदभाव करणाऱ्या घटकांच्या समाज तोडण्याच्या खेळी दिसत आहेत. जात, भाषा, प्रदेश इत्यादी छोट्या वैशिष्ट्यांच्या आधारे सामान्य समाजाला वेगळे करून संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे आज देशाच्या वायव्य सीमेला लागून असलेल्या पंजाब, जम्मू-काश्मीर, लडाख; सागरी सीमाक्षेत्रातील केरळ, तामिळनाडू आणि बिहारपासून मणिपूरपर्यंत संपूर्ण पूर्वांचल अस्वस्थ आहे. देशात विनाकारण कट्टरतावादाला चिथावणी देणाऱ्या घटनांमध्येही अचानक वाढ होताना दिसते आहे. परिस्थिती किंवा धोरणांबद्दल असंतोष असू शकतो, परंतु ते व्यक्त करण्याचे आणि विरोध करण्याचे लोकशाही मार्ग आहेत. त्यांचे पालन न करता हिंसाचार करणे, समाजातील एखाद्या विशिष्ट वर्गावर हल्ला करणे, विनाकारण हिंसाचार करणे, भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, ही गुंडगिरी आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अशा वागण्याला ‘अराजकतेचे”असे म्हटल्याचे भागवतानी नमूद केले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, “एका आव्हानाचा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा. कारण ते आव्हान फक्त संघ किंवा हिंदू समाजासमोर नाहीये. फक्त भारतासमोरही हे आव्हान नाही. जगभरात हे आव्हान निर्माण होत आहे. ते आपण समजून घ्यायला हवं. भारत पुढे जाऊ नये, अशी इच्छाही अनेक देशांची आहे. त्यांचा विरोध होईल अशीच अपेक्षा आहे. ते वेगवेगळ्या प्रकारच्या चाली खेळतीलच. तसं होतही आहे. आजतागायत भारत सोडून इतर कोणत्या देशानं जगाच्या विकासाचा मार्ग निवडलेला नाही. आपण ते करतो. इतर देशांमध्ये विध्वंस घडवून आणणं, तिथली सरकारं पाडणं या गोष्टी जगात घडत असतात. आपल्या शेजारी बांगलादेशात काय घडलं? त्याची काही तात्कालिक कारणं असतीलही. पण एवढा मोठा विद्ध्वंस तेवढ्यानं होत नाही. दोन गोष्टी स्पष्ट आहेत. त्या विद्ध्वंसामुळे हिंदू समाजावर अत्याचाराच्या गोष्टींची पुनरावृत्ती झाली. कुठे काही गडबड झाली की दुर्बलांवर आपला राग काढण्याची कट्टरपंथी वृत्ती आहे. ही वृत्ती जोपर्यंत तिथे आहे, तोपर्यंत हिंदूच नव्हे, सर्वच अल्पसंख्यकांच्या डोक्यावर ही तलवार टांगती राहणार आहे”, असेही मोहन भागवतांनी म्हटले.
तसेच बांगलादेशमधील परिस्थितीचा उल्लेख करत भागवत म्हणाले की,”त्यांना आपल्या मदतीची, जगभरातल्या हिंदूंच्या मदतीची गरज आहे. हे हिंदूंच्या लक्षात यायला हवं की दुर्बल राहणं अपराध आहे. आपण दुर्बल, असंघटित आहोत याचा अर्थ आपण अत्याचाराला निमंत्रण देत आहोत. मग त्यासाठी कोणत्याही कारणाची गरज नाही. आपण दुर्बल आहोत हेच निमित्त आहे. त्यामुळे जिथे आहात, तिथे संघटित राहा. कुणाशी शत्रुत्व करू नका. हिंसा करू नका. पण याचा अर्थ दुर्बल राहणं नाही. हे आपल्याला करावंच लागेल. देशातील विविधतेला तोडण्याचे व फुटीरवाद तसेच असंतोष निर्माण करत अराजकता निर्माण करण्याचेदेखील प्रयत्न सुरू आहेत. काही घटकांच्या असंतोषाला हवा देऊन तो घटक समाजापासून वेगळा आणि व्यवस्थेविरुद्ध आक्रमक बनवला जात आहे. त्यानंतर व्यवस्था, कायदा, शासन, प्रशासन इत्यादींबद्दल अविश्वास आणि द्वेष वाढवून अराजकता आणि भीतीचे वातावरण निर्माण करण्यात येत आहे. काही लोक यासाठी राजकारणाचा उपयोग करत आहेत. देशहितापेक्षा स्वार्थाच्या राजकारणाला जास्त प्राधान्य देण्यात येत आहे. पर्यायी राजकारणाच्या नावाने आपली विनाशकारी कार्यसूची पुढे नेणे ही त्यांची कार्यपद्धती आहे. अनेक देशांमध्ये असे प्रकार घडले आहेत”, असे आवाहनही सरसंघचालक मोहन भागवतानी आपल्या भाषणात केलं.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा