नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
राष्ट्रीय स्वयंसेवक दलाने जातीय जनगणना आणि महिला सुरक्षे सारख्या संवेदनशील मुद्द्यावर आपली भूमिका मांडली आहे. समाजाची एकता आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी जातीय जनगणनेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिंता व्यक्त केली आहे. तर महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. केरळमधल्या पलक्कड येते तीन दिवसीय अखिल भारतीय समन्वय बैठक सुरु असून त्यावेळी या मुद्द्यावर भाष्य करण्यात आले.
या पत्रकार परिषदेत संघाचे प्रचारप्रमुख सुनील आंबेकर म्हणाले की, ” ‘जात हा आपल्या समाजातील संवेदनशील मुद्दा आहे. हाही देशाच्या एकात्मतेशी संबंधित प्रश्न आहे. त्यामुळे फक्त निवडणुका आणि राजकारण डोळ्यासमोर न ठेवता यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.” जातीय जनगणनानेमुळे समाजाच्या एकता आणि अखंडतेला धोका आहे, असे संघाने म्हटले आहे. तसेच समरसतेला तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम नेटाने पुढे नेण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.
जातीवर आधारित मोजणी हा समाजातील संवेदनशील मुद्दा आहे. तसेच राष्ट्रीय एकतेसाठीदेखील महत्वाचा आहे. याचा उपयोग प्रचारासाठी किंवा निवडणुकीसाठी केला जाऊ नये. कल्याणकारी हेतूंसाठी आणि प्रामुख्याने दलित समाजाची संख्या जाणून घेण्यासाठी सरकार त्यांची संख्या मोजू शकते, असे संघाने म्हटले आहे.
या बैठकीत पश्चिम बंगालमध्ये झालेल्या दुर्देवी घटनेवर विस्ताराने चर्चा करण्यात आली. यावेळी महिलांच्या सुरक्षेसाठी कायद्यातील दुरुस्तीवर संघाने यावेळी जोर दिला. महिलांची सुरक्षा हा संवेदनशील मुद्दा असल्याचे संघाने म्हटले. महिला सुरक्षेबाबत पाच टप्प्यांमध्ये ही चर्चा करण्यात आली. कायदा, जागरूकता, संस्कार, शिक्षण आणि आत्मसंरक्षण या मुद्द्यांवर ही चर्चा झाली. या मुद्द्यांवर महिलांच्याबाबतीतील सुरक्षा मोहीम हाती घेण्याचाही निर्णय घेण्यात आला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा