Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमोहन भागवतांच्या 'त्या' विधानाने नवा वाद; विरोधी पक्षाची जोरदार टीका

मोहन भागवतांच्या ‘त्या’ विधानाने नवा वाद; विरोधी पक्षाची जोरदार टीका

मुंबई | प्रतिनिधी

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पूतळा कोसळल्यामुळे महायुती सरकारला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले असतानाच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रायगडावरील शिवरायांबाबत सगळे लोकमान्य टिळकांनी शोधून काढल्याचे वक्तव्य केल्याप्रकरणी पुन्हा नवा वाद उद्भवला आहे. सत्ताधारी पक्षातील मंत्री आणि विरोधकांनी भागवतांचा दावा खोडून काढत रायगडावरील महाराजांची समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनीच शोधून काढली आहे. हा इतिहास कोणी पुसून काढू शकत नाही, अशा शब्दात विरोधकांनी त्यांना सुनावले आहे.

- Advertisement -

मोहन भागवत यांनी अलीकडेच पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देताना म्हटले की, इंग्रजांच्याविरुद्ध लढताना सुद्धा शिवाजी महाराज इथेच होऊन गेले. इथे सुद्धा त्यांचे त्यापद्धतीने स्मरण व्हावे म्हणून जागरण केले गेले, रायगडावर उत्सव सुरु केला. लोकमान्य टिळकांनी ते सर्व शोधून काढले. ही इथली स्थिती असताना सुद्धा रवींद्रनाथ टागोरांनीही शिवाजी महाराजांवर कविता लिहिली. भागवत यांच्या या विधानावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होऊ लागले असून विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

हे ही वाचा : “भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला, विधानसभेत अजितदादांना ७, तर शिंदेंना….”; रोहितपवारांचा सर्वात मोठा दावा

भागवत यांचा दावा खुद्द महायुती सरकारमधील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी खोडून काढला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरची समाधी महात्मा जोतिबा फुले यांनी शोधून काढली आहे. हा इतिहास कोणालाही बदलता येणार नाही. त्याचबरोबर शिवजयंती उत्सवदेखील ज्योतिबा फुले यांनीच सुरू केला आहे, असे भुजबळ म्हणाले. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शिवरायांची समाधी लोकमान्य टिळकांनी शोधून काढल्याचे विधान केले होते. त्यावेळी तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना महात्मा फुले यांनीच समाधी शोधल्याचे निक्षून सांगितले होते.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भागवत यांच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे. इतिहासात पुरावे आहेत की शिवाजी महाराज यांची समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधली आहे. त्यांच्यामुळेच प्रथम लोकांसमोर ही गोष्ट पुढे आली. आता संघ काही पण शोध लावेल. त्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणतात की सूरत शिवाजी महाराजांनी लुटली नाही. इतिहासाबाबत ते आता काहीही बोलत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

हे ही वाचा : अमित शाहांसमोर ‘बिहार पॅटर्न’प्रमाणे मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव ठेवला का?…

इतिहासाचे विकृतीकरण : जितेंद्र आव्हाड

भागवतांच्या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टिकास्त्र सोडले आहे. इतिहासाच्या कुठल्याही पानावर लिहिलेले नाही की, छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी टिळकांनी शोधून काढली. वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी महात्मा जोतिबा फुले यांनी शोधून काढल्याबाबत कोणत्याही इतिहासकारांमध्ये मतभेद नाहीत. ही समाधी त्यांनी अत्यंत कष्टाने शोधून काढली. झाडाझुडपात लपलेली ही समाधी शोधत असताना तेथील मनुवाद्यांनी महात्मा फुले यांना त्रासदेखील दिला होता. पण, या मनुवाद्यांना न जुमानता छत्रपती शिवरायांची समाधी व्यवस्थित करून घेतली ती फक्त आणि फक्त महात्मा जोतिबा फुले यांनीच. त्यामुळे आपण जे बोलता त्यालाच आम्ही इतिहासाचे विकृतीकरण म्हणतो, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या