श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत खासगी प्रवासी वाहतूक करणार्या बसेसची विशेष तपासणी मोहीम सुरू असून या मोहिमेत 15 दिवसांत सुमारे 350 बसेसची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत 140 वाहने दोषी आढळून आल्याने त्यांना 6 लाख 18 हजार 260 रुपयांचा दंड करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी दिली.
राज्याचे परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली खासगी प्रवासी बसेसची विशेष तपासणी मोहिम दि. 1 ते 31 जुलै 2023 पासून सुरू आहे. या मोहिमेत मद्य प्रशासन करुन वाहन चाविणार्या चालकांची तपासणी करणे, वेग नियंत्रकामध्ये छेडछाड करणे, अग्निशमन यंत्रणा नसणे, विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करणारी वाहने, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, अवैध मालवाहतूक करणार्या बसेस, वाहनांमध्ये बेकायदेशीर केलेले फेरबदल, आपत्कालीन निर्गमन आणि दरवाजे कार्यरत स्थितीत नसणार्या, योग्यता प्रमाणपत्र नसणे, जादा भाडे आकारणी, रिफ्लेक्टर टेप नसणे, इंडिकेटर, टेल लाईट वापर इत्यादी मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार तपासणी केली जात आहे.
खासगी बस तपासणी मोहीम यापुढेही सुरू राहणार असून वाहनधरकांनी मोटार वाहन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच खासगी बसेसमध्ये काही त्रुटी आढळून आल्यास प्रवाशांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे यांनी केले आहे.