Saturday, May 4, 2024
Homeब्लॉगब्लॉग : गाठीभेटींच्या अफवा अन् राजकीय रंगपंचमी !

ब्लॉग : गाठीभेटींच्या अफवा अन् राजकीय रंगपंचमी !

गेल्या आठवड्यात महाराष्ट्रासंबंधीच्या राजकीय घडामोडींचे केंद्र चक्क गुजरात राज्य ठरले.

अहमदाबादमधून आलेल्या एका बातमीने देशात नाही, पण महाराष्ट्र देशी मात्र खळबळ उडवली. राज्यात महिनाभरात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांवर कळस चढवला तो राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते अमित शहा यांच्या भेटीच्या वावडीने! पवार-शहा भेट गुप्त असल्याचे पुन:पुन्हा सांगितले गेले, पण त्या भेटीच्या बातमीला पाय फुटलेच. त्या आधारे महाराष्ट्रात राजकीय रंगपंचमी चांगलीच रंगली.

- Advertisement -

—–

महाराष्ट्रात सत्ताबदल घडून दीड वर्ष लोटले आहे. दुसर्‍या वर्षाकडे महाविकास आघाडी सरकारची वाटचाल सुरू आहे.

तथापि राजकीय वादळे आणि वावटळी थांबायचे नाव घेत नाहीत. वरचेवर घडणार्‍या राजकीय घडामोडींनी मराठी मुलुख सदैव गजबजत आहे. कधी सत्ताधारी आघाडीचे तर कधी विरोधी पक्षांचे नेते राज्यातील राजकीय वातावरणात सदैव संशयकल्लोळाचा बोलबाला राहील याची पुरेपूर काळजी घेताना दिसतात. राजकारणात कोणीच कोणाचा सदैव शत्रू वा मित्र नसतो. त्यामुळेच वैचारिक मतभेद असले तरी दोन पक्षांचे नेते एकमेकांना भेटतात.

कधी गुप्तपणे तर कधी उघडपणेसुद्धा नेत्यांच्या गाठीभेटी होतात. सत्तेवाचून तळमळणारे नेते सत्ता पक्षांच्या आश्रयाला जाण्याची धडपड करतात.

सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सहेतूक किंवा निर्हेतूकपणे एकमेकांना भेटल्यास त्यात वावगे काय? अशा भेटींतूनच नवनवी राजकीय समीकरणे उदयास येतात यावर राजकीय मंडळींचा ठाम विश्वास असतो.

देशातील, विशेषत: जनतेला त्याचा अनुभव वरचेवर येत आहे. सत्तेतील दोन मित्र दुरावले आणि त्यातील एका मित्राला दोन नवे मित्र मिळाले. दुसर्‍या मित्राला सत्तेवरून पायउतार होऊन विरोधी बाकावर बसावे लागले.

तेव्हापासून तो मित्र सत्तेविना तळमळत आहे. सरकारचे नेतृत्व करणार्‍या पूर्वाश्रमीच्या जुन्या मित्राला वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सळो की पळो करण्याचा प्रयत्न सतत करीत आहे.

‘सरकार पडणार… सरकार पडणार’ अशी आवई वेळोवेळी उठवली गेली. आताही उठवली जात आहे. सध्या देशात पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची रंगपंचमी सुरू झाली आहे.

महाराष्ट्रात विधानसभेच्या पंढरपूर पोटनिवडणुकीखेरीज एकमेकांना भिडायला सत्ताधारी आणि विरोधकांपुढे अन्य कोणतीही मोठी निवडणूक तूर्तास नाही. राजकीय धूळवड मात्र सुरू आहे.

विधानसभा निवडणूक निकाल लागल्यावर पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर घडेल आणि त्यानंतर महाराष्ट्रातसुद्धा काहीतरी राजकीय ‘चमत्कार’ घडेल अथवा घडवला जाईल, असा आशावाद काही मंडळींना पुन्हा वाटू लागला आहे. सत्तेतील तिन्ही पक्षांमध्ये परस्पर विसंवाद असल्याचा आभासदेखील निर्माण केला जात आहे.

अँटलिनाजवळील स्फोटके, वाझे प्रकरण, गृहमंत्र्यांवर शंभर कोटींचा आरोप, तपासात एनआयएचा प्रवेश आदी घटनांनी गेला पंधरवडाभर राष्ट्रीयस्तरावर महाराष्ट्र चर्चेत राहिला. मात्र या घटनांमागील गूढ आणि सूत्रधाराचा पुरेसा पर्दाफाश अद्यापही होऊ शकलेला नाही हे विशेष!

सुशांत प्रकरणात नेमके काय घडले ते सीबीआयलाही कळू शकलेले नाही. तपास मात्र चालू आहे. प्रकरणाची उकल होण्याऐवजी अमली पदार्थ सेवन आणि व्यवहारांप्रकरणी बॉलिवुडमधील काही अभिनेते आणि अभिनेत्रींसंबंधीच्या प्रकरणाचे नवे शेपूट उगवले.

अमली पदार्थविरोधी विभागाच्या (एनसीबी) धडक कारवाईने बॉलिवूड जगतातील अनेक जण संशयाच्या भोवर्‍यात सापडले. नोटिसा बजावल्या गेल्या. अनेकांच्या तासन् तास चौकशा केल्या गेल्या. कोर्ट-कचेर्‍या झाल्या, पण अमली पदार्थ व्यापार करणार्‍यांशी अभिनेत्री-अभिनेत्यांच्या कथित संबंधांबाबतच्या चौकशांचा ससेमिरा संपलेला नाही.

मध्यंतरी राज्यातील तीन मंत्र्यांवर आरोप झाले. त्यातील एकाला राजीनामा द्यावा लागला. पाठोपाठ काही नाट्यमय घटना घडल्या. त्यामुळे आघाडी सरकार आणि सत्ताधारी पक्षांचे नेते सुरुवातीला काहीसे गांगरले, पण नंतर ते सावरले. आक्रमक होऊन प्रतिवार करण्याचा मोह त्यांनी आवरला.

तरीसुद्धा सरकारला कोंडीत पकडण्याचा डाव असल्याचा पलटवार सत्ताधारी नेत्यांनी विरोधकांवर लगेच केला, पण या सगळ्या घटना आणि आरोपांवर अधिक व्यक्त होण्यापेक्षा संयम राखून मौन बाळगणेच त्यांनी पसंत केले.

गेल्या आठवड्यात महाराष्ट्रासंबंधीच्या राजकीय घडामोडींचे केंद्र चक्क गुजरात राज्य ठरले. अहमदाबादमधून आलेल्या एका बातमीने देशात नाही, पण महाराष्ट्र देशी मात्र खळबळ उडवली.

राज्यातील महिनाभरातील वेगवेगळ्या घटनांवर कळस चढवला तो राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीयमंत्री तथा भाजप नेते अमित शहा यांच्या भेटीच्या वावडीने! एका गुजराती दैनिकात त्यासंबंधी बातमी आली. त्या आधारे वृत्तवाहिन्यांनी दिवसभर ‘मोडकी वार्ता’ (ब्रेकिंग न्यूज) चालवली. त्या बातम्यांमुळे उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या.

पवार-शहा भेट गुप्त असल्याचे पुन:पुन्हा सांगितले गेले, पण गुप्त भेटीच्या बातमीला पाय फुटलेच. लगोलग त्यावर अनुकूल-प्रतिकूल प्रतिक्रियाही उमटल्या. ‘बंददाराआडच्या सगळ्याच गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात’ असे संभ्रमित करणारे संदिग्ध विधान गृहमंत्र्यांनीसुद्धा करून कथित गुप्तभेटीचे गूढ वाढवले.

चर्चा आणि अफवांना आणखी हवा दिली. त्या अफवांवर स्वार होऊन महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांच्या सत्तेच्या स्वप्नांना पुन्हा पंख फुटले. ‘पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल’ असे सांगून ते मोकळे झाले.

पवार-शहा गुप्तभेटीच्या बातम्यांनी राज्यातील सत्ताधारी नेत्यांमध्ये काही प्रमाणात चलबिचल जरूर निर्माण झाली. ‘कथित भेटीच्या बातम्या तथ्यहीन आहेत. अशी भेट झालीच नाही’, ‘माध्यमांत आलेल्या बातम्या निव्वळ ‘अफवा’ आहेत’, ‘भाजपसोबत सख्य शक्य नाही’ आदी खुलासेवजा स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या नेत्यांना करावे लागले.

‘भेट घेतली तर बिघडले कुठे? राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या भेटी होतच असतात, राजकारणात कोणतीही भेट गुप्त नसते’ असे सांगून सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी काल्पनिक भेटीचे समर्थन करण्याचा प्रयत्नही केला.

आघाडी सरकारचे नेतृत्व करणारी शिवसेनासुद्धा थोडीफार आवाक झाली. तथापि शहांची भेट घेतली की नाही? याचा खुलासा करायला शरद पवार यांना उसंत मिळाली नसावी. कारण त्या बातमीची शहा-निशा होण्याआधीच पवार यांची प्रकृती बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले. त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रियाही झाली. लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा देणारे संदेश मुख्यमंत्र्यांसह सरकारमधील अन्य नेत्यांसोबत विरोधी पक्षांच्या नेत्यांनीसुद्धा समाज माध्यमांवर पेरले. त्यामुळे पवारांचे आजारपण खोटे असेल का? या शंकेला मूठमाती मिळाली.

राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांनी पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली, पण दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींनी पवारांची अजिबात विचारपूस केली नसल्याच्या बातम्याही लगोलग माध्यमांतून झळकल्या. ज्यांनी शिवसेना आणि काँग्रेसला सोबत घेऊन सत्तेची मोट बांधली, भाजपला सत्तेपासून दूर ठेवले, असा नेता अचानक भाजपच्या शीर्षस्थ नेत्याची भेट कसा घेऊ शकतो? पवार-शहा भेटीच्या बातम्या किंवा अफवांना ऐन धुळवडीच्या पहाटेच वाचा कशी फुटली?

भल्या पहाटेचा शपथविधी होऊन आणि अल्पमतातील सरकार भुईसपाट झाल्यानंतरसुद्धा त्या घटनेचे गूढ भल्या-भल्यांना अजूनही उकलता आलेले नाही.

एका रात्रीत दोन प्रमुख नेत्यांच्या भेटी कधी आणि कुठे घडल्या? गुपचूप सरकार स्थापनेबाबत चर्चा कधी झाली? त्या अल्पायुषी सरकारचा ‘करविता धनी’ नेमका कोण होता? राष्ट्रपती राजवट मागे घेणे, सरकार स्थापनेच्या दाव्यावर तत्काळ निर्णय, पहाटेचा शपथविधी एवढे सगळे करणे महामहीम राज्यपालांना तेव्हा कसे झेपले? ‘मी परत येईन’चे वगनाट्य अर्ध्यावरच का राहिले? हे गूढ-गुपित आजही कायम आहे. ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ या उक्तीनुसार कदाचित ते उलगडणारही नाही. उलगडले तरी त्यावर आता विश्वास तरी कोण ठेवणार?

विधानसभा निवडणुकीआधी ‘मातोश्री’च्या बंद खोलीत शिवसेना पक्षप्रमुख आणि आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गृहमंत्री शहा यांनी नेमका कोणता शब्द दिला होता?

या प्रश्नाच्या खर्‍या उत्तराची राजकीय निरीक्षकांना अजूनही प्रतीक्षाच आहे. आघाडी सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू असताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली होती. तेव्हासुद्धा पवार वेगळा पर्याय चाचपडत असल्याच्या अफवांचा बाजार गरमला होता.

प्रत्यक्षात तसे काही न घडता शिवसेनेच्या नेतृत्वात राज्यात आघाडी सरकार अस्तित्वात आले. पवार-मोदी भेटीतून वेगळ्या राजकीय गणितांची शक्यता फोल ठरली. पवार-शहांच्या गुप्तभेटीच्या आताच्या बातम्या थोड्याफार फरकाने त्या भेटीसारख्याच असतील का?

राजकारण सतत तापत ठेवण्यासाठी अशा क्लृप्त्या जाणीवपूर्वक केल्या जातात का? राज्यात वा केंद्रात कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी आपल्या जीवनात कोणताही बदल घडत नाही हे जनतेला ठाऊक आहे.

त्यामुळे अशा तर्‍हेच्या राजकीय घडामोडींमध्ये लोकांना काडीचाही रस नसतो. राजकारणी मंडळींचे आत्मिक समाधान अथवा मनोरंजनापलीकडे अशा गाठीभेटींना फार महत्त्व उरत नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या