Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यागाळा लिलावातून ४४ लाख रुपये वसूल

गाळा लिलावातून ४४ लाख रुपये वसूल

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एका आडतदाराने टोमॅटोच्या मालापोटी 196 शेतकर्‍यांचे दोन ते सव्वादोन कोटी रुपये रक्कम थकवली होती. शेतकर्‍यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींवरून बाजार समिती प्रशासनाने संबंधित आडत्याच्या गाळ्याचा लिलाव करत 44 लाख रुपयांना विक्री करण्यात आला. गुरुवारी (दि.17) 45 शेतकर्‍यांना थकित रकमेपैकी 20 टक्के परत करण्यात आली. कष्टाचे पैसे मिळाल्याने शेतकर्‍यांनी सभापती देवीदास पिंगळे व संचालक मंडळासह सचिव व बाजार समिती प्रशासनाचे आभार मानले आहेत.

- Advertisement -

याप्रसंगी सभापती देवीदास पिंगळे, उपसभापती उत्तमराव खांडबहाले, संचालक संजय तुंगार, तानाजी करंजकर, विनायक माळेकर, जगन्नाथ कंटाळे, प्रल्हाद काकड, हमाल मापारी प्रतिनिधी चंद्रकात निकम, व्यापारी प्रतिनिधी जगदीश अपसुंदे तसेच मनमाडचे माजी आमदार तथा सभापती मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय पवार उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

पेठरोडवरील शरदचंद्रजी पवार मार्केट यार्ड येथे इन्कलाब व्हेजीटेबल कंपनी प्रोप्रायटर नौशाद फारुकी, समशाद फारुकी यांना टोमॅटो विभागात गाळा क्र. 151 हा 99 वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात आला होता. लायसन्स घेऊन टोमॅटो या शेतमालाचा खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता. या आडत्याने जिल्हाभरातील जवळपास 196 शेतकर्‍यांकडून टोमॅटो शेतीमाल वेळोवेळी घेतला आणि त्यांची शेतीमाल विक्रीची जवळपास दोन कोटी रुपये रक्कम थकवली. याबाबत अनेकदा मागणी करूनही शेतकर्‍यांना थकित रक्कम मिळत नव्हती.

प्रशासकीय काळात त्यामुळे शेतकर्‍यांनी बाजार समितीकडे यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. शेतकर्‍यांना कष्टाचे पैसे मिळत नसल्याचे पाहून सभापती देवीदास पिंगळे यांनी शेतकर्‍यांच्या शेतीमाल विक्रीची रक्कम परत करण्यासाठी पुढाकार घेतला. संबंधित गाळ्याचा जाहीर लिलाव ठेवण्यात आला होता. संबंधित शेतकर्‍यांना तसे आवाहनही करण्यात आले होते. त्यानुसार ज्या ज्या शेतकरी बांधवांचे फक्त नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमाल विक्री केल्यानंतर सदर आडत्याने पैसे थकवले होते अशा शेतकर्‍यांनी आवश्यक दस्तऐवजांसह गुरुवारी सकाळी 11 पर्यंत बाजार नियमन विभागात प्राप्त तक्रारदारांना बोलावण्यात आले.

सदर गाळ्याच्या लिलावापोटी आलेली 44 लाख रुपयांची रक्कम शेतकर्‍यांना धनादेशाद्वारे वाटप करण्याचे कामकाज सुरू असून गुरुवारी (दि.17 ) जवळपास 45 शेतकर्‍यांना धनादेशआधारे 20 टक्के रक्कम देण्यात आली आहे, याचप्रमाणे उर्वरित शेतकर्‍यांना देखील देण्यात येणार आहे. कष्टाने पिकवलेल्या शेतमालाची आडत्याने थकवलेली रक्कम परत मिळेल, अशी अपेक्षा नसताना बाजार समिती सभपाती व संचालक मंडळाने पुढाकाराने सदर रक्कम परत मिळाल्याने संबंधित शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त करत सभापती देवीदास पिंगळे, संचालक मंडळ आणि बाजार समिती प्रशासनाचे आभार मानले आहेत.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकर्‍यांची असून, शेतकरी आणि आडते यांच्यातील दुवा म्हणून समिती काम करते. त्यामुळे शेतकरी हा बाजार समितीचा मुख्य घटक आहे. यापुढे आडत्याने शेतकर्‍यांचे पैसे थकवल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या तर सदर आडत्याचा गाळा सील करून त्याचा लिलाव केला जाईल. कुठल्याही आडत्याकडे रक्कम थकल्यास लागलीच बाजार समितीत संपर्क साधावा.

– देवीदास पिंगळे, सभापती, कृउबा समिती, नाशिक

शरदचंद्रजी मार्केट यार्डातील टोमॅटो विभागातील आडते नौशाद फारुकी व समशाद फारुकी यांनी जवळपास 196 शेतकर्‍यांचे दोन ते सव्वादोन कोटी रुपये थकवले आहेत. यापैकी बाजार समिती सभापती, संचालक मंडळाने पुढाकार घेत थकित रकमेपैकी 20 टक्के रक्कम परत मिळवून दिली आहे. मात्र बाजार समिती प्रशासकीय काळात आम्ही तक्रार केली होती. त्यावेळी योग्य कारवाई न करणार्‍या अधिकार्‍यांवर तत्काळ कठोर कारवाई करावी. तसेच फरार आडते फारुकी याचा शोध घेत शासन व बाजार समिती प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरीत्या न्याय मिळवून द्यावा.

– सागर गायकवाड, शेतकरी, मखमलाबाद

- Advertisment -

ताज्या बातम्या