अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत मृद आरोग्य व सुपीकता कार्यक्रम 2025-26 मध्ये आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही मृद तपासणी (जमीन आरोग्य तपासणी) प्रयोगशाळा उभारणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यासाठी अशा 15 प्रयोग शाळांचे उद्दिष्ट्ये देण्यात आले असून या प्रयोग शाळांसाठी कृषी विभागाच्यावतीने इच्छुकांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. मात्र, या प्रयोग शाळांसाठी केवळ दीड लाखांचा निधी देण्यात येणार असल्याने हा ताकडा निधी या प्रयोग शाळांना अडसर ठरण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटरीया अंतर्गत मृद आरोग्य व सुपीकता कार्यक्रम 2025-26 मध्ये राज्यात नव्याने दोन लाख 22 हजार मृद नमुने तपासणीचे उद्देश ठेवण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एका तालुक्यातून किमान एक या तत्वावर गाव पातळीवर जमीन आरोग्य तपासणी प्रयोग शाळा उभारण्यात येणार आहे. यासाठी राज्याच्या कृषी आरखड्यास मंजूर देण्यात आली आहे. या आराखड्यानूसार नगर जिल्ह्यात गाव पातळीवर नव्याने 15 जमीनप्रयोग शाळांना मान्यता देण्यात आली आहे. राज्यात अशा प्रकारे 444 नवीन गाव पातळीवर प्रयोग शाळा उभारण्यात येणार आहेत. यासाठी कृषी संचालक (निविष्ठा व गुण नियंत्रण) कृषी आयुक्तालय पुणे यांचेकडून मान्यता देण्यात आली आहे.
यात केंद्र शासनाच्या मार्गदशक सुचनान्वये कृषी विभाग संबंधीत मृद प्रयोग शाळेला आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणार आहे. यासाठी व्यक्ती, शेतकरी, कृषी उत्पादक संस्था, कृषी चिकित्सालय आणि कृषी-व्यावसाय केंद्रे, माजी सैनिक बचत गट, शेतकरी शेतकरी सहकारी संस्थ, कृषी निविष्ठा किरकोळ विक्रेते आणि शाळा/ कॉलेज, युवक / युवती यांना यासाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी इच्छुकांनी प्रत्येक तालुक्याच्या कृषी विभागाकडे 8 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय यांच्याकडून करण्यात आले आहे.
लक्षांकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हास्तरीय निवड समितीकडून सोडत काढण्यात येऊन लाभार्थ्याची निवड करण्यात येणार आहे. मृद चाचणी प्रयोगशाळेसाठी लाभार्थी निवडीच्या निकषात लाभार्थी युवक/युवती हा 18 ते 27 वयोगटातील असावा. तसेच शेतकरी उत्पादक संस्था, विविध कार्यकारी सहकारी संस्था हे देखील या योजनेत अर्ज करू शकणार आहेत. लाभार्थ्यांच्या पात्रतेबाबत जिल्हा स्तरावरील समिती निर्णय घेणार असून लाभार्थ्याची शैक्षणीक अर्हता ही किमान 10 वी (विज्ञान विषयासह) उत्तीर्ण असणे बंधकारक असून अर्जदाराने अर्जासोबत शैक्षणिक अर्हतेसोबत आधार कार्ड, पॅनकार्ड जोडणे आवश्यक आहे. अर्जदार/गटाची स्वतःची इमारत किंवा किमान 4 वर्ष भाडे करार केलेली इमारत असणे आवश्यक असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांनी सांगितले.
प्रत्येकी मिळणार अवघे दीड लाख
दरम्यान, सध्या नगरच्या जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात जिल्ह्याची एकमात्र जमीन आरोग्य पत्रिका प्रयोग शाळा कार्यरत आहे. या ठिकाणी जिल्हाभरातून माती नमुने संकलित करून त्या ठिकाणी तपासणी करण्यात येते. त्यानूसार जमीनीची आरोग्य पत्रिका तयार करण्यात येत आहे. भविष्यात ग्रामीण भागात सहजासहजी शेतकर्यांना त्याच्या शेतीचे आरोग्य समजावे, यासाठी कृषी आयुक्तालयाकडून गाव पातळीवर मृृग तपासणी प्रयोग शाळांना मान्यता देण्यात आली आहे. मात्र, प्रत्येक प्रयोग शाळेला प्रत्येकी अवघा दीड लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून यात अशा प्रयोग शाळा सुरू होणे अशक्य असल्याने कृषी विभागाला या योजनेत किती प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.





