Friday, June 14, 2024
Homeनगरग्रामिण भागातील बससेवा सुरू

ग्रामिण भागातील बससेवा सुरू

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

- Advertisement -

जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी जनआक्रोश आंदोलनाचा दणका देत शुक्रवारी कोपरगांव आगाराने ग्रामिण भागातील बससेवा सुरळीत चालु न केल्यास आंदोलन करू असे इशारा दिल्याने अखेर कोपरगांव आगाराने ग्रामिण भागातील बससेवा सुरू केली आहे. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी ग्रामिण भागातून येणारे दळणवळण आता सुरू होईल. शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासाठी ओढताण होणा-या मुला-मुलींना आता दिलासा मिळाला आहे.

कोपरगाव शहर व मतदार संघातील वीज, पाणी यासह प्रलंबित समस्यामुळे शेतकर्‍यांसह जनसामान्य जर्जर झाला होता. त्याच्या प्रश्नांना वाचा फुटावी, महाविकास आघाडी शासन आणि जबाबदार लोकप्रतिनिधी यांना जाग यावी म्हणून 2 मे रोजी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी तहसिल प्रशासनास विविध प्रलंबित समस्याबाबत हजारो नागरिकांच्या स्वाक्षर्‍या घेवुन निवेदन दिले होते. मात्र संबंधीत कार्यान्वयीन यंत्रणेने हाकेच्या अंतरावर असलेल्या कोपरगाव आगारास बस बाबतचे निवेदन दिले नाही.

ग्रामिण भागातून तालुक्याच्या ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षणासाठी बस सुरू नसल्याने खाजगी वाहतुकीचा आधार घेवुन प्रवास करावा लागत होता. शुक्रवारी डाऊच परिसरात अ‍ॅपेरिक्षा आणि कंटेनरचा दुर्दैवी अपघात होवुन त्यात दोन महाविद्यालयीन विद्यार्थीनींसह सात जणांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागला. त्यामुळे संचालक विवेक कोल्हे यांनी पुन्हा शुक्रवारी आगारप्रमुख अभिजित चौधरी यांची भेट घेवुन या घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले. करोना महामारीनंतर बससेवा सुरू करा म्हणून त्यांनी सतत मागणी लाऊन धरली.

मात्र ही सुरक्षीत वाहतूक सुरू होत नसल्याने ग्रामिण भागातील दळणवळण ठप्प झाले आहे. विविध कारणासाठी या सर्व प्रवाशांसह महाविद्यालयीन तसेच शालेय विद्यार्थी विद्यार्थीनींना खाजगी वाहतुकीला हात करून प्रवास करावा लागत आहे त्यात अपघाताचे प्रमाण वाढल्याने जनसामान्यांच्या जीवाची सुरक्षीतता धोक्यात आली होती म्हणून संचालक विवेक कोल्हे यांनी तालुका आगार प्रमुखाबरोबरच जिल्हा आगारप्रमुखाशी संवाद साधत कोपरगाव आगाराने ग्रामिण भागात सुरळीत बससेवा सुरू करावी अन्यथा आम्ही आमच्या पध्दतीने आंदोलन करू असा इशारा दिला होता. त्यानुसार कोपरगांव ग्रामिण भागात शनिवारपासून काही ठिकाणी मुक्कामी तर अन्य ठिकाणी नियीमत बसफेर्‍या सुरू केल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या