Thursday, May 30, 2024
Homeनगरग्रामीण कारागिरांची होणार नोंदणी !

ग्रामीण कारागिरांची होणार नोंदणी !

अहमदनगर |ज्ञानेश दुधाडे| Ahmednagar

केंद्र सरकारच्या पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत पारंपरिक कारागिरांना आता बँकेतून अर्थसहाय्य मिळणार आहे. यासाठी राज्यातील प्रत्येक गावात असणार्‍या पारंपरिक कारागिरांची नोंदणी सुरू झाली आहे. नगर जिल्ह्यात देखील जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने याबाबतची कार्यवाही सुरू केली असून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 1 हजार 831 कारागिरांची नोंदणी करण्यात आली आहे. लवकरच संपूर्ण जिल्ह्यातील कारागिरांची नोंदणी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

- Advertisement -

दरम्यान, ग्रामीण भागात प्रत्येक गावात काम करणारे विविध कारागिर यांचे काम आणि त्यांची नोंदणी करण्याची जबाबदारी त्या-त्या गाावातील सरपंच यांच्यावर सोपवण्यात आली आहे. संबंधित गावचे सरपंच त्यांच्या गावातील कारागिर यांच्या कामाची पडताळणी करून पीएम विश्वकर्मा पोर्टलवर याबाबतची माहिती व्हेरिफाय करणार आहेत. मात्र, सरपंच यांना त्यांच्या गावातील कारागिरांची पडताळणी करण्यासाठी आधी स्वत:ची नोंदणी करून घ्यावी लागणार असून ही प्रक्रिया देखील जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने सुरू केली आहे. आतापर्यंत नगर जिल्ह्यातील 1 हजार 318 ग्रामपंचायतीपैकी 599 गावातील सरपंच यांची पीएम विश्वकर्मा पोर्टलवर नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्यावतीने देण्यात आली.

केंद्र सरकारच्या या पीएम विश्वकर्मा योजनेत ग्रामीण कारागिरांना कमी व्याजदराने कर्ज मिळणार आहे. यासाठी त्यांना बँकेला गॅरंटीची आवश्यकता बंधनकारक राहणार नाही, हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. ही योजना सुरू करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण केंद्रे सुरु करण्याच्या हालचाली सुरु आहेत. या योजनेत संबंधीत ग्रामीण कारागिरांना प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. पहिल्या टप्प्यात योजनेच्या लाभासाठी संबंधीत कारागिरी त्या गावातील सरपंच यांची पीएम विश्वकर्मा पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे. ही नोंदणी झाल्यावर योजनेच्या पुढील लाभाची माहिती देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ही योजना यशस्वी करण्यासाठी सरपंच आणि कारागिर यांच्या नोंदणीसाठी आपले सरकारचे कर्मचारी आणि ग्रामसेवक यांना सुचना देण्यात आल्या आहेत. त्यानूसार जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 599 सरपंच आणि 1 हजार 831 कारागिर यांची नोंदणी झाली असल्याचे माहिती देण्यात आली.

असे योजनेचे क्षणचित्र

स्किल इंडिया पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर ओळखपत्र मिळणार त्यानंतर प्रशिक्षण. योजनेतील लाभार्थी कारागिरांना पाच दिवसांचे प्रशिक्षण बंधनकारक आहे. प्रशिक्षण कालावधीत दररोज 500 रुपयांप्रमाणे स्टायफंड तथा शिष्यवृत्ती मिळणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर 15 हजार रुपये किंवा साहित्य किट मिळेल आणि त्यानंतर प्रमाणपत्र मिळणार असून प्रमाणपत्र जोडून बँकेकडे योजनेअंतर्गत करावी कर्जाची मागणी, सुरवातीला मिळणार बिनव्याजी एक लाख रुपये यांचा समावेश असून बिनव्याजी कर्जाची वेळेत परतफेड केल्यास मिळणार पुढील दोन लाखांचे कर्जाची व्यवस्था राहणार आहे.

हे कारागीर योजनेचे लाभार्थी

कुंभार, चांभार, न्हावी, मूर्तिकार, पाथरवट, दगडफोडे, गवंडी, फुलांचे हार बनविणारे, धोबी, शिंपी , हातोडा व टूलकिट बनविणारे, सुतार, होडी बनविणारे, लोहार, घिसाडी, टोपली, चटई, झाडू बनविणारे, काथ्या विणकर, बाहुल्या व खेळणी बनविणारे पारंपरिक कारागीर, सोनार, कुलूप-किल्ली बनविणारे व मासे पकडण्याचे जाळे विणणारे कारागीर या योजनेचे लाभार्थी असणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या