वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur
पंचायत समितीमध्ये (Vaijapur Panchayat Samiti) कार्यरत ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याला (Rural Housing Engineer) पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाचा दुसरा हप्ता (Gharkul Installment) मंजूर करून देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच (Bribe) स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने सोमवारी (29 जून) रंगेहाथ अटक केली.
प्रवीण गायकवाड (वय 35, रा. पानवी, ता. वैजापूर) असे अटक करण्यात आलेल्या अभियंत्याचे नाव आहे. 31 वर्षीय तक्रारदार यांना पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojana) घरकुल मंजूर झाले असून पहिला हप्ता प्राप्त झाला होता. दुसरा हप्ता मिळण्यासाठी आवश्यक असलेली स्थळ पाहणी, जिओ-टॅगिंग व छायाचित्रे अपलोड करण्यासाठी त्यांनी संबंधित अभियंत्याकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, दुसरा हप्ता मंजूर करून देण्यासाठी आरोपी अभियंत्याने एक हजार रुपयांच्या लाचेची (Bribe) मागणी केली.
तक्रारदार यांची लाच देण्याची तयारी नसल्याने त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti-Corruption Department) तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केली असता, घरकुलाच्या दुसर्या हप्त्याचे 75 हजार रुपयांचे बिल काढून देण्यासाठी आरोपीने एक हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर एसीबीने सोमवारी पंचायत समिती कार्यालयात सापळा रचला. तक्रारदारांकडून प्रवीण गायकवाड याने एक हजार रुपयांची लाच (Bribe) स्वीकारताच पथकाने त्याला पंचांसमक्ष ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान त्याच्याकडून लाचेची एक हजार रुपयांची रक्कम, अन्य 450 रुपये रोख तसेच दोन मोबाईल जप्त (Seized) करण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत सिंगारे आणि पोलिस उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शांतीलाल चव्हाण, पोलिस हवालदार रवींद्र काळे, युवराज हिवाळे, अशोक नागरगोजे, चांगदेव बागुल आणि रामेश्वर ताठे यांच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रतिभा अबूज करीत आहेत.




