जळगाव – Jalgaon
पोलीस आणि होमगार्ड यांचे काम खरंच वाखाणण्याजोगेच असते. आज आपणही पाहिले असेल गेल्या दोन वर्षांपासून सबंध भारतात पोलीस आणि होमगार्ड यांनी नागरिकांना कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या जीवाची तसेच आपल्या परिवाराची काळजी न करता अहोरात्र मेहनत घेतली. त्यांना बर्याच अघटित घटनांचा सामना करावा लागला, तरीही ते आपली संयमता शाबूत ठेवून आपले कार्य करत राहिले. तहान, भूक हरपून आपले कर्तव्य बजावताना त्यांनी केवळ आपल्या कार्याचे स्मरण करत आपली भूमिका नागरिकांसमोर वारंवार ठासून सांगितली. या लघुचित्रपटातही या घटनांचा काहीसा देखावा साकारण्यात दिग्दर्शक काही प्रमाणात का होेईना; नक्कीच यशस्वी ठरलेले आहे.
होमगार्ड हे नेहमी कर्तव्यदक्ष असतात. परंतु, त्यांच्या कामाला हवा तसा सन्मान अजूनही मिळालेला नसून तो मिळवून देण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यांच्या व्यथांची जर शासन दरबारी नोंद घेण्यात आली तर हाच होमगार्ड आपले कर्तव्य अजून जोमाने निभावेल, यात शंका नाही.
– सचिन कापडे, लेखक दिग्दर्शक
सध्या अनेक माध्यमांतून समाजात विविध विषयांवर जनजागृती होताना आज पाहत असतो. यातील सध्याच्या युगात सोशल मीडिया हे एक असे साधन बनलंय की, त्या माध्यमातून आपण जगभरात काही मिनिटांतच पोहोचू शकतो. सध्या शिक्षित युवकांमध्येही आपल्या समाजात असणार्या दुर्लक्षित काही घटकांकडे लक्ष वळवले असून सध्या यू-ट्यूबवर गाजत असलेली असाच एक लघुचित्रपट प्रेक्षकांच्या तसेच शासकीय आस्थापनांच्या पसंतीचे आकर्षण बनला आहे; ज्याचे नाव आहे कर्तव्य. प्रस्तुत शोध फिल्म प्रोडक्शन व साजन फोटो स्टुडिओ निर्मित या लघुचित्रपटाने पहिल्याच दिवशी 10 हजार प्रेक्षकांपर्यंत जाऊन आपली लोकप्रियता वाढवून यू-ट्यूबवर ख्याती मिळवली आहे.
पोलीस आणि होमगार्ड यांचे काम खरच वाखाणण्याजोगेच असते. आज आपणही पाहिले असेल गेल्या दोन वर्षांपासून सबंध भारतात पोलिस आणि होमगार्ड यांनी नागरिकांना कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या जिवाची तसेच आपल्या परिवाराची काळजी न करता अहोरात्र मेहनत घेतली. त्यांना बर्याच अघटित घटनांचा सामना करावा लागला, तरीही ते आपली संयमता शाबूत ठेवून आपले कार्य करत राहिले. तहान, भूक हरपून आपले कर्तव्य बजावताना त्यांनी केवळ आपल्या कार्याचे स्मरण करत आपली भूमिका नागरिकांसमोर वारंवार ठासून सांगितली. या लघुचित्रपटातही या घटनांचा काहीसा देखावा साकारण्यात दिग्दर्शक काही प्रमाणात का होेईना; नक्कीच यशस्वी ठरलेले आहे. चित्रीकरणाची मेहनत त्यांच्या सखोल संहिता आणि दिग्दर्शनातून ठळकपणे दिसून येते. यातील संगीत हे हव्या त्या प्रसंगांना अगदी समर्पक असून ते न बोेलताही कळते. लघुचित्रपटाचे काम करताना खूप बारकाईने विचार केला असता, ज्यांनी या दोन वर्षात सगळ्यात जास्त मेहनत घेतली ते पोलीस प्रशासनच आहे. कारण भरउन्हात, रात्री त्यांना बंदोबस्तासाठी जे चौकाचौकात उभे राहावे लागते, त्याचप्रमाणे काही निष्काळजीपणाने वागणार्या नागरिकांना आपले म्हणणे मांडण्यासाठी या विभागाने जी जनजागृती केली, हा चित्रपट त्याचेच फळ आहे, असे म्हटले तरी अतिशयोक्ती वाटणार नाही.
मुळात होमगार्ड या विभागाकडे काही प्रमाणात का होईना पण सरकार, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडूनही दुर्लक्ष झाले आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. याच विषयाला हेरून लेखक-दिग्दर्शक सचिन कापडे या स्वतः होमगार्डमध्ये कार्यरत असणार्या जवानाने या विभागातील व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तुटपुंजा मानधनासाठी होमगार्ड रस्त्यांवर तासन्तास उभे राहून आपले कर्तव्य चोख बजावताना आपण पाहिले असेलच; पण त्यांना त्या बदल्यात हवा तसा मोबदला मिळत नाही. यामुळे आपल्या संसाराचा रहाटगाडा चालवताना कशाप्रकारे त्रास सहन करावा लागतो, याची अनुभूती कर्तव्य लघुचित्रपटाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना अनुभवायला येते. यातील एका प्रसंगात जेव्हा कलाकार आपले कर्तव्य बजावून घरी येतो तेव्हा त्याची पत्नी त्याला जेवण आणून देते, मात्र त्याला साहेबांचा फोन आल्याने त्याला भरल्या ताटावरून उठून जावे लागते. यावेळी त्याच्या पत्नीच्या डोळ्यातून तरळलेले अश्रू हे रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही.
दुसर्या लाटेतील कोरोनाच्या महामारीत होमगार्ड विभाग सगळ्यात जास्त सक्रिय असल्याचे आपण बघितले असेलच पण पन्नास वर्षांवरील महिला अन् पुरुष होमगार्ड जवानांना कोरोना संसर्गाची बाधा होऊ शकते, असा कयास बांधून त्यांना कोणताही बंदोबस्त देऊ नये असे आदेश राज्याचे होमगार्ड महासमादेशक यांनी काढलेले आहे. यामुळे शारीरिक पात्रता चाचणी यशस्वी ठरलेल्या वर्षांवरील होमगार्ड जवानांवर झालेला अन्याय दूर करून त्यांना पूर्ववत बंदोबस्त मिळावा, अशा मागण्याही होमगार्ड विभागाकडून होत आहेत. मुळात होमगार्ड विभागाकडे लक्ष द्यावे, असा प्रामाणिक हेतू या लघुचित्रपटात असल्याचे रसिकांना पुन्हा पुन्हा कळते.
या चित्रपटाचे प्रदर्शन गेल्या सोमवारी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर करण्यात आले असता त्यांच्याही रुमालाच्या घड्या ओल्या होताना दिसून आल्या. अतिशय मार्मिक, भावनिक आणि सहज हृदयाला हात घालणार्या या विषयामुळे रसिकांचे डोळे डबडबल्याशिवाय राहत नाही. यावेळी हा चित्रपट अतिशय उत्तम असून यातील सगळ्या कलाकारांनी आपआपल्या भूमिका अतिशय योग्य पद्धतीने मांडल्य असल्याची भूमिका त्यांना मांडली. त्याचबरोबर असा जनजागृती करणारा चित्रपट हा सर्व जनतेने बघून या ला उत्तम प्रतिसाद देण्यासाठीही त्यांनी आग्रह धरला. या माध्यमातून का होेईना पण आपल्यासह इतर बांधवांचे दुःख हे अधिकार्यांसमोर मांडण्याचा आणि समाजातही योग्य असे स्थान पक्के करण्यासाठी हा चित्रपट नक्कीच वेगळी भूमिका वठवेल, यात शंका नाही.
याचे लेखक आणि दिग्दर्शक होमगार्ड सचिन कापडे असून चित्रपटाच्या माध्यमातून दहा हत्तीचे बळ, संघर्ष, संयम, जिद्द, प्रामाणिकपणा कार्यतत्परता होमगार्डमध्ये असून सर्वसामान्यांमध्ये आपली प्रतिमा ही सहजसोपी आणि समजणारी व्हावी, हा उद्देश घेऊन यांनी याची निर्मिती केली असावी, असा विश्वास लघुचित्रपट बघताना होत असतो. काही दिवसांत मिलियन लाइक्स मिळवून हा चित्रपट नक्की यश गाठून जळगावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याशिवाय राहणार नाही. सचिन कापडे हे स्वतः होमगार्ड असून त्यांनी त्यांचे गेल्या दोन वर्षांचे कष्ट आणि घरातील संकटांचा आलेला अनुभव यातून मांडला आहे. बंदोबस्त करत असताना जरी कोरोना या महामारीची भीती असली तरी आपले कर्तव्य आपण चोख बजावणार, अशी त्यांची भूमिका ठाम होती, असेही या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
यातील कलाकार हर्षदा वाघ, सचिन कापडे, पोलीस नाईक सचिन वाघ, प्रणेश ठाकूर, होमगार्ड महेश कोळी, होमगार्ड रवी महाजनसह हर्षा तायडे, कांचन हांबेकर, छायाचित्र सागर परदेशी, संकलन व्हिजनरी क्रिएटिव्ह, कला दिग्दर्शक आकाश परदेशी, सहाय्यक दिग्दर्शन अविनाश निरखे, कला सहाय्यक ऋतिक परदेशी, दीक्षा निरखे, रंगभूषा उज्वला शिंपी, केशभूषा मोहिनी निरखे, पोस्टर डिझाईन मयूरी अहिरे, हर्षदा म्हस्के, सागर परदेशी, संगीत दीपक महाजन तर अमोल ठाकूर, कविता राहुल सोनवणे, स्वप्निल गायकवाड, अमोल सूर्यवंशी, रवी महाजन, अक्षय बाविस्कर, महेश कोळी, निलेश कोळी, गौतम निकम, प्रदीप भोई, रवी महाजन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
जळगाव शहरात अनेक असे कलाकार आहेत जे अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील आहेत. काही कलाकार आपल्या वेगवेगळ्या अंगांनी खान्देशाला पुढे नेण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहेत. सध्या सोशल मीडिया हे असे माध्यम बनले आहे, ही क्षणार्धात आपण या जगासमोर केव्हाही येऊ शकतो. सध्या काही कलाकार खान्देशातून सहज सोप्या भाषेत आपल्या रसिकांसमोर बातम्या पोहोचवत आहेत तर काही गाण्यांच्या माध्यमातून आपल्याच मित्रांना प्रोत्साहित करत आहेत. जसे की, योगेश पाटील, धनंजय धनगर, प्रदीप भोई, मनोज रंधे, गौरव लवंगले, दीपक महाजन, अमोल ठाकुर त्याचबरोबर यांनी आता सोशल मीडियाची कास धरत आपल्या गाण्यातून आणि लघुचित्रपटाची निर्मिती करून आपला वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला आहे.
कोणी गाण्याच्या माध्यमातून तर कोणी अशा लघुचित्रपटांच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करण्याचा करत आहेत. आज या जळगावातील कलाकारांना राजाश्रय मिळाला तर आपली सुवर्णनगरी कलाकार नगरही बनेल, आणि मुंबई, पुण्यातील कलाकारांना मागे टाकत आपली एक वेगळी छाप या जगासमारे आणतील. जळगाव नगरी मुळात कलाकारांचीच भूमी असून अनेक कलाकार या भूमीने आपल्याला दिलेले दिसून येतात. काहीच वर्षात जळगावचे नाव यशोशिखरावर येण्यासाठी ही नवीन फळीच कामात येईल, आणि जुन्या जाणत्यांचे त्यांना नेहमी मार्गदर्शन आणि आशीर्वाद असतील. याअनुषंगाने जर असे काही कलाकार समाजात जनजागृती करत असतील, त्यांना देशदूततर्फे खूप शुभेच्छा.