मुंबई | Mumbai
मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. महायुतीतील मोठा पक्ष असलेल्या भाजपाने अमित ठाकरे यांना या मतदारसंघात पाठिंबा दिला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही मिनिटे बाकी असताना सदा सरवणकर यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. अमित ठाकरे यांच्यासाठी सरवणकर यांनी माघार घ्यावी यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू होते, मात्र सरवणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
सदा सरवणकर यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली, “राज ठाकरे यांना भेटण्यासाठी माझा मुलगा समाधान व आमचे इतर चार पदाधिकारी त्यांच्या घरी गेले होते. त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली. तसेच त्यांनी सांगितले की माझे वडील देखील राज ठाकरे यांना भेटू इच्छितात. निवडणुकीबाबत चर्चा करू इच्छितात. त्यावर राज ठाकरे यांनी मला काही बोलायचे नाही, तुम्हाला उमेदवारी मागे घ्यायची असेल तर घ्या, तुम्हाला निवडणूक लढवायची असेल तर लढा, असा संदेश पाठवला. त्यामुळे त्यांच्याशी पुढे कोणत्याही प्रकारचे बोलणे झाले नाही. त्यांनी भेट देखील नाकारल्यामुळे मला आता निवडणूक लढवावीच लागेल” असे सदा सरवणकर म्हणाले.
पुढे ते असे ही म्हणाले की, मी माझ्या मनाची तयारी केली होती. मात्र राज ठाकरे हे भेटायलाच तयार नसल्याने माझा नाईलाज आहे. त्यामुळे आता मी ही निवडणूक लढणार आहे, असे सरवणकर यांनी म्हटले आहे. दरम्यान सरवणकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती. माहीम मतदारसंघातील स्थिती त्यांनी मुख्यमंत्र्यांना समजावून सांगताना, मी जरी माघार घेतली तरी अमित ठाकरे निवडून येतील अशी परिस्थिती नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांच्या भेटीची देखील इच्छा व्यक्त केली होती. मात्र राज ठाकरे यांनी त्यांची भेट नाकारली. त्यामुळे आता आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवण्याचा निर्णय सरवणकर यांनी घेतला आहे. त्यामुळे माहीममध्ये आता तिरंगी लढत होणार आहे.
राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. याची जाण ठेवत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित ठाकरे यांना पाठिंबा दिला होता. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली होती. परंतु त्यांनी तेथून माघार घ्यावी, असेही विनंतीही सदा सरवणकर यांना केली होती. परंतु सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम होते. उलट अमित ठाकरे यांनीच उमेदवारी मागे घ्यावी, असे सरवणकर म्हणत होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा