मुंबई | Mumbai
आमदार सदाभाऊ खोत यांनी खासदार शरद पवार यांच्या चेहऱ्यावर भाष्य करत टीका केली. त्यांच्या या अभद्र विधानानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. अनेक नेत्यांनी खोत यांच्या वक्तव्याचा निषेध केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील खोत यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केला. दरम्यान, खोत यांनी त्यांनी केलेल्या विधानावर दिलगिरी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले सदाभाऊ खोत?
शरद पवार यांच्याबद्दल बोलताना माझ्या भाषेमुळे कुणाच्या भावना दुखाववल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले. माझी गावगाड्याची भाषा आहे. काही लोकांनी त्या शब्दाच्या अर्थाचा विपर्यास केला. त्यातून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो. दिलगिरी व्यक्त करतो. गावगाड्याची भाषा असते. एखादा आभाळाकडं बघत असला तर आम्ही म्हणतो आरशात जाऊन बघ. गावगाड्याची भाषा समजायला मातीत रुजावे लागते. मातीत राबावे लागते आणि मातीतच मरावे लागते. तेव्हाच गावाकडेची आणि मातीची भाषा समजते अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त करताना दिली.
अजित पवारांचा सदाभाऊंना इशारा
“ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्याविषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही,” असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा