Friday, November 22, 2024
Homeनगरआयोध्येतील राम मंदिरामुळे लोकसभेत पराभव

आयोध्येतील राम मंदिरामुळे लोकसभेत पराभव

विधानाचा विपर्यास झाल्याचा सदाशिव लोखंडे यांचा दावा

कर्जत/शिर्डी |वार्ताहर| Karjat | Shirdi

आयोध्येतील राम मंदिरामुळे आपला लोकसभा निवडणुकीत पराभव झाला, असा धक्कादायक निष्कर्ष माजी खा.सदाशिव लोखंडे यांनी मांडल्याने गोंधळ उडाला आहे. त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओत ते ‘मतदारसंघात रावणाला मानणारे बरेच आहेत’ अशा अर्थाचे विधान करताना दिसत आहेत. दरम्यान, या वक्तव्याचा लोखंडे यांनी इन्कार केला असून आपल्या विधानांचा विपर्यास केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

- Advertisement -

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघात चुरशीचा सामना झाला. उद्धव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा पराभव केला. यानंतर या जय-पराजयाची कारणमिमांसा दोन्ही गटांकडून सुरू आहे. लोखंडे यांनी आपले प्रयत्न कमी पडल्याचे आधी म्हटले होते. मात्र रविवारी कर्जत येथे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी केलेल्या दाव्यांवरून एकच गोंधळ उडाला आहे.

सोमवारी एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर हे वृत्त वार्‍यासारखे पसरले. यात लोखंडे आपल्या पराभवासाठी राम मंदिर आणि आदिवासी बांधव कारण असल्याचे सांगताना दिसत आहेत. व्हिडिओतील संवादानुसार ‘शिर्डी मतदारसंघात आदिवासी पट्टा आहे. तिथे रावणाला मानणारे बरेच आहेत. याशिवाय मतदारसंघात कारखानादारांचे गट-तट आणि साम्राज्य आहेत. तोही इफेक्ट झाला’, असा निष्कर्ष मांडताना ते दिसत आहेत. एकप्रकारे त्यांनी राम मंदिर, आदीवासी बांधव व विखे-थोरात या दिग्गजांचे राजकारण याकडे बोट दाखविल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, हे वृत्त व्हायरल झाल्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून सोशल मीडियावर निषेधाचे सूर उमटले. त्यानंतर सोमवारी सायंकाळी सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी येथे माध्यमांशी बोलताना यावर स्पष्टीकरण दिले. आपल्या विधानांचा विपर्यास झाल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले, आपण कारसेवक असून राम मंदिर लढ्यात प्रामुख्याने सहभागी होतो. 1990 मध्ये सोमनाथ ते आयोध्या रथयात्रेसाठी चेंबुर येथे तयार करण्यात आलेल्या रथासाठी आपणही योगदान दिले. हा रथ सोमनाथ मंदिरापर्यंत पोहचवण्याचे काम दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या नेतृत्वाखालील पार पाडले होते. 1989 साली शिळापुजनाचे आंदोलन झाले. देशभरातून प्रत्येक गावातून वीटा पूजन करून सर्व वीटा आयोध्येला पोहचवल्या.

या अभियानाचा देखील मी प्रमुख होतो. 1992 मध्ये जेव्हा बाबरी मशिद घटनेत कारसेवेसाठी आयोध्येत होतो. बालपणापासून संघाचा स्वंयसेवक आहे. हिंदुत्व माझ्या रक्तात आहे. आमचा डिनए कधीही बदलणार नाही. आम्ही आमचे आयुष्य राम मंदिरासाठी खर्च केलेले आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने सत्ता महत्त्वाची नसून राम मंदिर महत्वाचे आहे. शिर्डीतील पत्रपरिषदेला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, संपर्क प्रमुख बाजीराव दराडे, बाळासाहेब पवार, राहुल गोंदकर, अनिल पवार, चंद्रकांत गायकवाड आदी उपस्थित होते.

राम मंदिराबाबत अपप्रचार
राम मंदिर बांधल्यामुळे मुस्लिम मतांचे झालेले एकीकरण व अकोले तालुक्यात रावण संघटनेने राम मंदिराबाबत केलेला अपप्रचार यामुळे आपला पराभव झाल्याचे मला म्हणायचे होते. मात्र विधानाचा विपर्यास केला गेला, असा दावा सदाशिव लोखंडे यांनी शिर्डीत केला. ते म्हणाले, कर्जत येथे औपचारिक गप्पा सुरू असताना काही पत्रकारांनी विचारले की, राम मंदिर बांधले असतानाही तुमचा पराभव कसा झाला? त्यावर मी रावण संघटनेचा उल्लेख केला. रावण संघटना ही हिंदू विरोधी असून ती आदिवासी समाजात हिंदुत्व व रामाबाबत अपप्रचार करत आहे़ त्याचाच फटका आपल्याला अकोले तालुक्यात बसला, असे ते म्हणाले.

राम मंदिर भारतीयांचे श्रद्धास्थान
माजी खा. सदाशिव लोखंडे राम मंदिर आणि मतदान या विषयावर काय बोलले हे माहित नाही किंवा माझ्या वाचनात नाही. राम मंदिराचा 550 वर्षाचा विषय भाजप सरकारच्या काळात मार्गी लागला. राम मंदिर हे लाखो हिंदूचे श्रध्दास्थान आहे. या मंदिराचे काम पूर्ण व्हावे, अशी सर्वधर्मीय इच्छा होती. त्यानूसार राम मंदिराचे काम पूर्ण झालेले आहे. यामुळे आयोध्येत राम मंदिर बांधल्याने मतदान कमी झाले अथवा पराभव झाला असे म्हणता येणार नाही आणि ते मान्य देखील नाही.

  • विठ्ठलराव लंघे, भाजप उत्तर जिल्हाध्यक्ष
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या