आश्वी |वार्ताहर| Ashwi
संगमनेर तालुक्यातील सादतपूत शिवारात रविवारी (दि.28) दुपारी झालेल्या अपघातात एक तरुण ठार झाला असून दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. यानंतर आक्रमक झालेल्या नातेवाईकांनी लोणी-संगमनेर राज्य महामार्गावर काहीकाळ आणि आश्वी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. 30 तास उलटूनही अंत्यसंस्कार तसेच गुन्हा दाखल न झाल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे.
याबाबतची माहिती अशी, सादतपूर शिवारात रविवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास एका जेसीबीने धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यानंतर जखमी तरुणांना लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, यामध्ये अमन शेख या तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. तर, दुसरा जखमी असलेला मुलगा कार्तिक मुळेकर याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हे दोघेही चंद्रपूर (ता.राहाता) येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघाताची माहिती मिळताच मयत आणि जखमी तरुणांच्या नातेवाईकांनी अपघातस्थळी धाव घेतली.
यानंतर अपघातास कारणीभूत असलेल्या जेसीबी चालकाला तत्काळ अटक करावी आणि जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही व अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. त्यानंतर त्यांनी लोणी-संगमनेर राज्य महामार्ग अडवून आंदोलन केले. यामुळे लोणीचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी त्यांच्या सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेऊन नातेवाईकांशी चर्चा केली. यानंतर मयत आणि जखमी तरुणांच्या नातेवाईकांनी आश्वी पोलीस ठाणे येथे येऊन त्याठिकाणी तळ ठोकून आक्रमकपणे ठिय्या आंदोलन सुरू केले.
यामुळे परिसरात तणाव निर्माण झाल्याने 20 जणांचा समावेश असलेले दंगल नियंत्रण पथक पोलीस ठाण्याच्या आवारात दाखल झाले होते. रविवारी रात्री उशिरा व सोमवारी दुपारपर्यंत हे आंदोलन सुरुचं होते. दरम्यान, आश्वी बुद्रुक बाजारतळावर पोलीस ठाणे असल्याने सोमवारच्या आठवडे बाजारातही तणाव दिसून येत होता. सोमवारी दिवसभरात नातेवाईकांच्या संमतीअभावी मयत तरुणाचे शवविच्छेदन झाले नसल्याचे समजते. त्यामुळे आज (मंगळवार दि.30) शवविच्छेदन झाल्यानंतरच अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. तर, सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात देखील याबाबत कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.




