मुंबई । Mumbai
गणेशोत्सवाच्या काळात अवघी मुंबई आणि विशेषतः लालबाग-परळ परिसर बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झाला आहे. लालबागचा राजा, गणेशगल्लीचा राजा, चिंतामणी आणि काळाचौकीचा महागणपती यांच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविकांची अलोट गर्दी उसळत आहे.
परंतु, यंदा या उत्सवाला दुःखाची आणि गंभीर अपघातांची काळी किनार लागली आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जळगावहून आलेल्या एका तरुणाचा झालेला दुर्दैवी मृत्यू आणि काळाचौकीच्या महागणपती मंडपाजवळ ५ जणांना विजेचा शॉक लागून त्यात दोघांचा गेलेला बळी; या दोन घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. या गंभीर दुर्घटनांनंतर आता प्रसिद्ध वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून थेट मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
पत्रकारांशी बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी पोलीस प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळांच्या नियोजनशून्य कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. ते म्हणाले, “गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झालाच पाहिजे, यात कोणाचेही दुमत नाही. पण भक्तांच्या श्रद्धेचा असा खेळ करून कोणाचा जीव जाता कामा नये. जळगावहून दर्शनासाठी आलेल्या तरुणाचा मृत्यू आणि काळाचौकी येथे विजेचा शॉक लागून झालेला दोघांचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. या दोन्ही दुर्घटनांना संबंधित गणेशोत्सव मंडळेच जबाबदार आहेत.” सदावर्ते यांनी राज्याचे गृहसचिव (Home Secretary), पोलीस महासंचालक आणि काळाचौकी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली आहे. केवळ साधी एफआयआर (FIR) नोंदवून चालणार नाही, तर लालबागचा राजा आणि काळाचौकी महागणपती मंडळाच्या विश्वस्तांवर व पदाधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करून त्यांना आरोपी केले पाहिजे, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. तसेच धक्काबुक्की करणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
आपल्या मागण्यांचा पाढा वाचताना सदावर्ते यांनी सांगितले की, दुर्दैवाने प्राण गमावलेल्या बालकाच्या व तरुणाच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई म्हणून कमीत कमी १ कोटी रुपयांची आर्थिक मदत शासनाने व मंडळांनी तात्काळ जाहीर करावी. “लालबागच्या राजाची स्थापना मूळ कोळी बांधवांनी केली होती, पण आज ते कोळी बांधव कुठेही दिसत नाहीत. तिथे केवळ कमर्शियलायझेशन आणि गर्दीचे गैरव्यवस्थापन सुरू आहे. दर्शनासाठी लांबून येणाऱ्या भक्तांना चोऱ्या आणि धक्काबुक्कीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या प्रकरणात उत्तरदायित्व निश्चित केलेच पाहिजे,” असा इशाराही त्यांनी दिला. या प्रकरणामुळे आता मुंबईतील गणेशोत्सव मंडळांच्या सुरक्षेचा आणि गर्दीच्या व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.




