वैजापूर/ राहाता |तालुका प्रतिनिधी| Vaijapur| Rahata
बळीराजा सुखी झाला पाहिजे, पावसाने ओढ दिली आहे. बळीराजावरील संकट दूर होऊ दे, चांगला पाऊस पडू दे एवढं मागणं पांडुरंगाकडे करत आहे. राज्यातील सर्वांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे। असं साकडं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घातलं.
वैजापूर येथील सद्गुरू गंगागिरी महाराज 176 व्या अखंड हरिनाम सप्ताहात कालच्या एकादशीच्या कीर्तन सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदे यांनी हजेरी लावली. त्याप्रसंगी ते बोलत होते. केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड, छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलिल, पालकमंत्री संदीपान भुमरे, आमदार प्रा. रमेश बोरनारे, खासदार सदाशिव लोखंडे, करमाळा येथील आमदार नारायण पाटील, सप्ताह समितीचे कार्याध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, उपाध्यक्ष साबेरभाई खान, बाळासाहेब संचेती, कमलाकर कोते, विश्वस्त मधुकर महाराज, गोदावरी दूधचे राजेश परजणे, बाबासाहेब चिडे, विशाल संचेती, बाबासाहेब जगताप, बाबासाहेब गायकवाड, संजय बोरणारे, निलेश राजपूत, राजेश गायकवाड, नगरसेवक स्वप्नील जेजुरकर सप्ताह समितीचे सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले, अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून संत महात्म्ये समाजप्रबोधनाचे काम करत असतात. समाजाला दिशा देण्याचे काम करत असतात. आपण खर्या अर्थाने काही क्षण, वेळ पांडूरंगाच्या स्मरणाने किर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून घालवत असतो. या सप्ताहाला लाखो लोक येऊन गेले, मी ही भाग्यवान आहे, मला इथे येण्याची संधी मिळाली.
आषाढी एकादशीला पंढरपूरला मी पुजेच्या अगोदर गेलो, कारण आपल्या पांडूरंगाचे भक्त, वारकरी पंढरपूरला येत असतात. त्यांची गैरसोय होऊ नये. तेथे त्यांना काही अडचण येऊ नये, म्हणून अगोदर गेलो. आषाढीची यात्रेला पिण्याचे पाणी, स्वच्छता ही चांगली राहावी, यासाठी प्रयत्न केला. 100 टक्के सुविधा दिल्या असे म्हणणार नाही, परंतु प्रयत्न निश्चित केला आहे. वारकरी संप्रदाय या राज्यात मोठ्या प्रमाणावर आहे. आषाढी, कार्तिकी एकादशीला वारकरी मोठ्या प्रमाणावर येत असतात. श्रावण महिना आहे. महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे. गंगागिरी महाराज महान संत होते. लेने को हरिनाम, देने को अन्नदान.. या संतवचना प्रमाणे आपण सर्वजण वागलो तर दु:ख हे नसेल, आपण दुसर्यासाठी जगायचे, सर्व सामान्यांच्या दु:खा मध्ये सहभागी व्हायचे, हे असे जर केले तर या समाजात कुणीही दु:खी, कष्टी राहाणार नाही. किर्तनकारांच्या, संतांच्या माध्यमातून ही शिकवण आपल्याला मिळत असते. जनतेला परमार्थाचा अर्थ ते सांगत असतात.
सराला बेट ही संतांच्या भूमी आहे. श्रध्दा स्थान आहे. हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून जनसमुदाय चांगले विचार घेऊन जातात. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, जनतेचे सरकार आहे, वारकर्यांचे सरकार आहे, कष्टकर्यांचे सरकार आहे. शासन आपल्या दारी हा उपक्रम आपण सर्वसामान्य जनतेसाठी घेत होतो. लाभ घेण्यासाठी सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. हक्क मिळाले पाहिजे. आता पर्यंत 12 कार्यक्रमातून दीड कोटी लोकांना शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाभ मिळाला.
पाऊस नाही, पण पडला पाहिजे, अशा सप्ताहाच्या माध्यमातुन वातावरण बदलते. हे सरकार शेतकर्यांच्या, कष्टकर्यांच्या पाठीशी आहे. शेतकर्यांना वार्यावर सोडणार नाही. आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल. शेतकार्यांसाठी काही योजना तयार केल्या त्या आता येथे जाहिर करत नाही.
यावेळी बोलताना महंत रामगिरी महाराज म्हणाले, वारकरी सांप्रदायावर मुख्यमंत्री ना. शिंदे यांचे प्रेम आहे. पंढरपूरला आषाढीला अगोदर उपस्थित राहुन त्यांनी व्यवस्था करण्याच्या सुचना दिल्या. हे पहिले मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी नियोजनासाठी अगोदर हजेरी लावली. मुख्यमंत्री यांनी सप्ताहाला एकादशीची पंगत दिली. पाच ते सहा लाख लोक येऊन गेले. बेटावर जाण्यासाठी रस्ते चांगले नाही. लाखो लोक बेटावर येतात, अडचणी येतात. चिखल होतो, रस्ते मार्गी लावावेत अशी भक्त मंडळींची अपेक्षा असते. गोदावरी असल्याने वाळु उपसा होतो, रस्ते खराब होतो, त्यासाठी रस्ते चांगले क्वालिटीचे व्हावे, भाविकांना सुविधा निर्माण व्हावी. असेही महंत रामगिरी महाराज म्हणाले.
गोदावरीधामला (सराला बेटाला) 15 कोटी देणार !
महंत रामगिरी महाराजांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे गोदावरी धामाकडे (सराला बेट) येणारे रस्ते डांबरीकरण करुन द्या, अशी मागणी केली. या मागणीचा धागा पकडून मुख्यमंत्री शिंदे यांनी रस्त्यांचा प्रश्न निश्चित सोडवू, असे आश्वासन दिले. सराला बेटातील अंतर्गत रस्त्यांसाठी 5 कोटी रुपये, घाट बांधकामासाठी 5 कोटी रुपये आणि भक्तांना सत्संग हॉल बांधण्यासाठी 5 कोटी रुपये, असे 15 कोटी रुपये तात्काळ देऊ, बेटाचे जोड रस्ते देण्यासाठी प्रयत्न करू, महाराजांच्या आदेशाने ते करू असेही मुख्यमंत्री म्हणाले.