Wednesday, June 26, 2024
Homeनगरपुष्प - 6 वे : गंगागिरी महाराज सप्ताहात जातीभेदामुळे दूरावलेला समाज जोडण्याचे...

पुष्प – 6 वे : गंगागिरी महाराज सप्ताहात जातीभेदामुळे दूरावलेला समाज जोडण्याचे काम

वैजापूर/राहाता |तालुका प्रतिनिधी| Vaijapur | Rahata

- Advertisement -

मनुष्य असेल, पशु असेल प्रत्येक जीवमात्रात ज्याला परमात्मा दिसतो तो भक्त आहे, असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.

वैजापूर येथे सदगुरु गंगागिरी महाराज 176 व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या कालच्या सहाव्या दिवशीचे पाचवे वाक्पुष्प गुंफतांना महंत रामगिरी महाराज बोलत होते. गीतेतील 9 व्या अध्यायातील 22 व्या श्लोकावर महंत रामगिरी महाराज चिंतन करत आहेत. कालच्या प्रवचनात भक्ती, भक्ताचे प्रकार, अनन्यता या विषयांना स्पर्श करत विविध प्रसंग, दृष्टांत सांगत त्यांनी भाविकांना आपल्या सुश्राव्य वाणीतून पावणेदोन तास खिळवून ठेवले. काल सहाव्या दिवशी भाविकांनी गर्दीचा उच्चांक केला. त्यामुळे सर्वच रस्त्यांवर वाहतूक ठप्प झाली होती. पंगती सुरु असताना काल पावसाने काही काळ दमदार हजेरी सप्ताह परिसरात हजेरी लावली.

आपल्या प्रवचन सेवेत महाराज म्हणाले, गितेत भगवंताने चार भक्त सांगितले. आर्क, अर्थाअर्थी, जिज्ञासु आणि ज्ञानी! भक्ती म्हटले की, अंतकरणात श्रध्दा असावी.

अनेकांना वैराग्य निर्माण होते, पण ते टिकत नाही. वैराग्याचे प्रकार सांगत महाराज म्हणाले, काही जण वैतागुन परमात्मा करतात. एक मनुष्य आळसी होता, आळसी माणसे संसारही व्यवस्थित करु शकत नाही, आणि परमार्थही करु शकत नाही. माणसाने जिवनात प्रयत्नवादी असावे, आळशी नसावे. त्यावर एक दृष्टांत महाराजांनी सांगितला. एक आळशी मनुष्य काहीच काम करत नव्हता. त्याचे आणि त्याच्या बायकोचे सतत भांडणे होत. मग त्याने बाबा होण्याचा निर्णय घेतला. तो गावाच्या बाहेर एका साधुकडे गेला. त्यांना सर्व सांगितले. साधुने त्याच्या पत्नीकडून सर्व माहिती घेतली. तो साधु त्याला म्हणाला, तुला आता संन्यासी व्हायचे आहे.

तुला कडाक्याच्या थंडीत गार पाण्याने स्नान करावे लागेल. देवांना पुजेसाठी स्नान करवून आण! त्या माणसाने ते सर्व देव बादलीत टाकले. आणि बादली बुडविली पाण्यात, तीन देव हालके होते, ते पाण्यात बुडाले. तो पुन्हा आला, आणि साधुने त्याला पुजा करण्यास सांगितले. ते आळशी म्हणाला, महाराज देवांना आज सुतक आहे. तीन देव विहीरीत बुडाले! महाराज मला खुप भुक लागली आहे. त्यावर साधु म्हणाले, जा तेथे लाडू आहेत, खा! या मनुष्याने ते खायला लागला ते कडू लिंबाच्या पानाचे होते, याला ते कडू लागले. आणि तो आश्रमाचा त्याग करुन मध्यरात्री घरी परतला. घासा घासाला विष पचवणे अवघड असते तसे वैराग्य पचवणे अवघड असते. बाबा होणे सोपे नाही. परमार्थ हा आळसी माणसांचा नाही. जो संसार चांगला करत नाही, तो परमार्थ काय चांगला करणार?

साधु आणि एका शेतकर्‍याचा प्रसंग महाराजांनी सांगितला. त्या शेतकर्‍याच्या विहीरीत मारीमारी करता करता दोन कुत्री पडतात. ते सडतात, त्यावर साधुला विचारतो महाराज कुत्रे पडले ते चार पाच दिवसांनी सडले, पाणी खराब झाले. त्यावर साधु म्हणतात पाणी उपसुन टाक! शेतकरी पाणी उपसुन टाकतो. पुन्हा पाणी येते ते दुर्गंधी युक्त असते. पुन्हा साधुला म्हणतो पाण्याचा वास येतोच, त्यावर साधु विचारतात कुत्रे काढले का? तो नाही म्हणतो. मग कुत्रे काढले नाहीत तर मग वास येणारच ना! परमार्थ करतो, भजन करतो, सप्ताला येतो, हे पाणी उपसायचे काम चालु आहे. परंतु शरीरात अंतरकणात काम, क्रोध हे सडलेले कुत्रे तसेच आहेत. विकारांवर विजय मिळवून परमार्थ करावा.

आर्क म्हणजे जेंव्हा जिवनात दु:ख येते, संकट येतात, तेव्हा भजन करतो, द्रौपदीचे उदाहरण देत महाराज म्हणाले, जेव्हा जेव्हा द्रौपदीवर संकटे आली तेव्हा तेव्हा तिने भगवंताचा धावा केला. दु:शासन द्रौपदीचे वस्त्र हरण करतो हा प्रसंग सांगत महाराज म्हणाले, द्रौपदीला आशा होती पितामह भिष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य या सारखे ज्येष्ठ मंडळी असतांना माझ्यावर अन्याय होणार नाही. भिष्माचार्यांकडे मोठ्या आशेने पाहिले. भिष्माचार्य लाचार झालेले खाली मान घालुन बसलेले दिसले. जेव्हा मोठे माणसं लाचार होतात, त्यावेळी अन्यायाला कसे प्रोत्साहन देतात हे महाभारतातील उदाहरण आहे. म्हणून माणसाने कधी लाचार होवू नये. अन्याय करणारा दोषी असेल पण अन्याय सहन करणाराही दोषी असतो. ज्यावेळी ज्येष्ठ मंडळी लाचार होतात, त्यावेळी समाजाचे वस्त्रहरण होते. हिंदू धर्मावर अनेक वेळा अक्रमण होवुनही हिंदू समाज झोपलेला आहे. सावध असले पाहिजे.

अनन्यता आल्याशिवाय भगवंत कृपा नाही. भक्तीपासून मिळणारा आनंद सर्वात मोठा आहे. सदगुरु गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाचा आनंद सर्वात मोठा आहे, अब्जाधिश व्हा, कोट्याधिश व्हावा तरीही हा आनंद मिळणार नाही. ज्यांना काम करायची सवय नाही ते या सप्ताहात थकत नाहीत. भक्त आणि भगवंत यांच्यात नैसर्गिक प्रेम आहे. संसारातील प्रेम गरज म्हणून प्रेम आहे. मनुष्याने भजनात तल्लीन व्हावे, संसारातील तल्लीनता दु:ख देणारी आहे. संसार अस्थिर आहे.

कालच्या सप्ताहाला कोपरगाव बेटाचे रमेशगिरी महाराज, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अल्पसंख्यांक मंत्री अब्दूल सत्तार, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी खासदार चंद्रकांत खैरे, कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव, प्रकाश चित्ते, बबन मुठे, संतोष जाधव, नितीनराव कापसे, विजय शिंदे, सुनिल बोठे, गणेश चे संचालक नानासाहेब नळे, पुणतांब्याचे धनंजय जाधव, जयंत डोणगावकर, दिनेश परदेशी, नाशिक चे गोविंद घुगे, आण्णासाहेब निरगुडे, भगवानराव डांगे, सर्जेराव चौधरी, विजय देशमुख, नामदेव राहाणे, सागर कापसे, रघुनाथ सोनवणे, अक्ष्मण सोनवणे, अजय गरुड, दत्तू खपके, अस्तगावकर सराफचे अशोकराव बोर्‍हाडे, लक्ष्मी दूधचे बाबासाहेब चिडे, साई आदर्श मल्टिस्टेटचे शिवाजीराव कपाळे, नानासाहेब डांगे, विकास डांगे, अनिल चोळके, सुधाकर रोहोम, संभाजी रक्ताटे, भोला उदावंत, मधुकर महाराज, नवनाथ महाराज आंधळे, बाळासाहेब महाराज रंजाळे, अमोल महाराज बडाख, धोंडिरामसिंह राजपूत, बाळासाहेब जेजुरकर, गणपत भागवत यांचेसह भाविक साडेचार लाखाहुन अधिक संख्येने उपस्थित होते.

आज मुख्यमंत्री भेट देणार ?

आज एकादशी असल्याने 1 वाजता प्रवचन सुरु होईल आणि त्यानंतर 2 ते 4 कीर्तन होईल. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रविवारी सप्ताहास भेट देण्याची शक्यता आहे. त्यांची आज एकादशी निमित्त फराळाची पंगत आहे. यासाठी 350 क्विंटल साबुदाना, 100 क्विंटल भगर यापासून फराळ बनवून भाविकांना त्याचे वाटप होईल.

राजकीय मंडळी अन सप्ताह मागणी !

काल राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी 177 वा सप्ताह येवल्यातील डोंगरगावला द्यावा, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राहाता तालुक्यात सप्ताह मागितला. नितीनराव कापसे यांनी पिंपळस पंचक्रोशी, मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मतदार संघात, तसेच नाशिकलाही मागणी करण्यात आली. या सर्व मंडळींचे आमदार प्रा. रमेश बोरणारे व डॉ. दिनेश परदेशी यांनी स्वागत केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या