Saturday, July 27, 2024
Homeनगरपुष्प 7 वे : मृत्युचे स्मरण झाले तर पाप घडत नाही- महंत...

पुष्प 7 वे : मृत्युचे स्मरण झाले तर पाप घडत नाही- महंत रामगिरी महाराज

वैजापूर / राहाता |तालुका प्रतिनिधी| Vaijapur | Rahata

मृत्युचे स्मरण झाले तर पाप घडत नाही, असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले. वैजापूर येथे सदगुरू गंगागिरी महाराज 176 व्या अखंड हरिनाम सप्ताहातील कालच्या एकादशीच्या किर्तनाला 7 लाखांहून अधिक भाविकांनी हजेरी लावली. महंत रामगिरी महाराजांच्या कालच्या किर्तनास मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड, छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलिल, पालकमंत्री संदीपान भुमरे, आमदार प्रा. रमेश बोरनारे, खासदार सदाशिव लोखंडे, करमाळा येथील आमदार नारायण पाटील, सप्ताह समितीचे कार्याध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, उपाध्यक्ष साबेरभाई खान, बाळासाहेब संचेती, कमलाकर कोते, विश्वस्त मधुकर महाराज, गोदावरी दूधचे राजेश परजणे, बाबासाहेब चिडे, विशाल संचेती, बाबासाहेब जगताप, बाबासाहेब गायकवाड, संजय बोरणारे, निलेश राजपूत, राजेश गायकवाड, नगरसेवक स्वप्नील जेजुरकर, कोपरगावचे माजी सभापती सिताराम गाडेकर, सप्ताह समितीचे सदस्य उपस्थित होते.

- Advertisement -

एवढा प्रभु भावे। तेणें संपुष्टी राहावे॥ हा संत तुकाराम महाराजांचा अभंग निरुपणास घेत महाराजांनी त्यावर कीर्तन केले.

काल एकादशी असल्याने भाविकभक्त तब्बल 5 तास सप्ताह मैदानावर बसून होते. सुरुवातीला प्रवचन झाले आणि नंतर कीर्तन झाले. मुख्यमंत्री येणार म्हणून कीर्तन महंत रामगिरी महाराजांना विस्तीर्ण घ्यावे लागले. कालच्या एकादशीच्या दिवशी सर्व रस्ते फुल्ल भरून वाहत होते. प्रवचन मैदानावर भाविकांना जागा अपुरी पडू लागली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकादशीचे फराळ उपस्थित जनसमुदायाला दिले.

महाराज म्हणाले, अनेक लोक दारू पितात, व्यसनाधिन आहेत. कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. बुध्दी ठिकाणावर राहत नाही. व्यसन करू नये, घातक आहे. 2016 ला तांदुळनेर सप्ताहात दिडशे तरुणांना व्यसन मुक्तीची शपथ दिली होती. विश्वविक्रम सप्ताहात झाला! व्यसनामुळे तारुण्याचा नाश होतो. काही कामाची व्यसनं काही क्रोधाची व्यसनं आहेत. काही विकारांची आहेत. अलिकडच्या काळात तरुणांमध्ये व्यसनाने नपुंसकत्वाचे प्रमाण वाढले आहे. संतती होत नाही. याचा अर्थ आहारातून दोष होतो. कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. एवढं सुंदर शरीर भगवंताने दिले, रोग होण्यासाठी नाही. रोग निवारण्यासाठी औषधोपचार करण्यापेक्षा रोग होऊच नये म्हणून आपण प्रयत्नशिल असले पाहिजे. आपण जर आपले आहार विहार शुध्द ठेवले तर जवळजवळ 80 टक्के रोग आपण टाळू शकतो. म्हणुन व्यसन सोडावे.

भगवान शिवाचा त्याग यावर बोलताना महाराज म्हणाले, भगवान शिवाने पत्नी अणि मुलांचा त्याग केला. ज्या दिवशी मृत्युचे स्मरण होईल त्यावेळी पाप होणार नाही. म्हणुन मृत्युचे स्मरण करा, हा त्याग भगवान शिवाचा आहे.

अथांग असणारा हा जनसुमदाय लाखोंच्या संख्येने उपस्थित आहे. सर्वजण पावसाची वाट पाहातात, सप्ताहात थोडा झाला, गंगागिरी महाराजांच्या कृपेने येईल पाऊस, सर्व प्राणी अन्नावर जगतात, अन्न पर्जन्यावर आणि पर्जन्य यज्ञावर आवलंबून आहे. नाम यज्ञ चालू आहे, ज्ञान यज्ञ चालू आहे. यज्ञ म्हटले की, यज्ञ कुंंड लागतात, येथे लक्षावधी कुंड आहेत असे सांगतांना महाराज म्हणाले, प्रत्येकाला दोन कान आहेत, हेच कुंड! लाखो कुंड आहेत ना हो! सर्व इंद्रियामध्ये श्रवण इंद्रिय श्रेष्ठ आहे. नवविधा भक्तीमध्ये पहिली भक्ती आहे श्रवण, जो जास्त श्रवण करतो जास्त विदवान बनतो. भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली ती त्याने कानाने श्रवण केली. शुक्राचार्यांनी परिक्षीतील भागवत सांगितले ते त्यांनी कानाने श्रवण केले. श्रवण एक भक्ती आहे. कान या कुंडात ज्ञानाची आहुती आहे. ज्ञान रुपी अग्निद्वारे दोष जाळायचे आहे.

भक्तीरसाचे सेवन सप्ताहात होते. साहित्य शास्त्रात 9 रस सांगितले. संतांनी दहावा भक्तीरस सांगितला आहे. जसा भाव असेल तसा परमात्मा आपल्या समोर येतो. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी अनेकांनी प्रयत्न केले. सर्वच सफल होतील असे नाही. विश्वमित्रा, पराशरांसारख्यांना इंद्रियांवर विजय मिळविता आला नाही. मोठे तपस्वी फेल झाले. विश्वमित्राला वशिष्ट ब्रम्हर्षी म्हणत नव्हते म्हणुन राग येतो. वशिष्टाच्या डोक्यात दगड घालायला गेला विश्वमित्र! ज्याच्या डोक्यात दगड घालायचा ते काय बोलतात हे ऐकण्यासाठी उभे राहिले. वशिष्टाच्या पत्नीला वशिष्ट म्हणतात माझ्या विश्वमित्राच्या तपस्येसारखे चांदण, मधुर, स्वच्छ आहे. विश्वमित्राच्या डोक्यावरील दगड खाली गळून पडला. विश्वमित्र पळत पळत आले आणि विश्वमित्रांनी वशिष्टांना साष्टांग दंडवत घातला. नम्रता आली विश्वमित्रामध्ये आणि मग वशिष्ट म्हणाले तु आता ब्रम्हर्षी झाला! विश्वमित्राला अहंकारावर विजय मिळविता आला नाही.

परमार्थाशिवाय प्रपंच हा उत्तमरित्या होत नाही. प्रपंच व परमार्थ या दोहोंना एकत्रपणे पुढे घेऊन जाणारा आपला देश आहे संतांच्या सानिध्याने पवित्र झालेली ही भूमी आहे. त्यामुळे याठिकाणी प्रसन्न असे वातावरण आहे. संत, महंतांच्या सानिध्यातून मानवी जीवन विकासाच्या वाटेवर जाते. त्यामुळे प्रत्येकाने संतांचे कार्य लक्षात घ्यावे, असे भेदाभेदांमुळे एकमेकांपासून दुरावलेल्या माणसांना जोडण्याचा प्रयत्न संतांनी केला आहे. उघडीले अन्न छत्र चारी वर्ण एकत्र या गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाचे वैशिष्ट्य आहे.

गिनीज बुकात नोंद असलेला अखंड हरिनाम सप्ताह हा नुसता नामस्मरण किंवा महाप्रसाद नाही तर योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज, ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज आदींसह बेटातील संताचे संत कार्य आहे. अनेकांना आध्यात्मिक व प्रापंचिक कार्य दोन्ही करत पुढे जावे लागत आहे. नवीन पिढी ही प्रश्न विचारणारी आहे. त्यांना तर्क, पुरावे, प्रमाण देऊन आपले म्हणणे सांगावे लागते. हेच कार्य संतकार्य आहे. कार्य म्हणून त्याचा विचार व्हायला हवा. जे काही प्राप्त करायचे आहे ते शरीराच्या माध्यमातूनच प्राप्त करावे लागणार आहे. शरिराच्या माध्यमातून केवळ कार्य होत असते. बाकी सर्व शक्ती, उर्जा हे परमेश्वर देत असतो. आपण सर्व केवळ साधने असून मुख्य स्त्रोत हा अध्यात्मच आहे.

आपली संस्कृती ही थोर असून दुर्दैवाने आपल्या संस्कृतीतील खर्‍या मर्माचा आपल्याला विसर पडलेला दिसतो. सत्ययुग ते कलियुग मधील सामाजिक स्थिती यावर सोदाहरण मांडणी करत एकंदरीत सामाजिक स्थितीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी ईश्वरी अवतार निर्माणाचे कारण हे साधूंचे सदप्रवृत्तीचे रक्षण करणे हा आहे. ईश्वर प्रत्येक एका व्यक्तीसाठी जन्म घेण्यास तयार असतोच. ईश्वर आणि आपण यात कमीतकमी अंतर हवे असल्यास आपल्याला आपला जीवनमार्ग सरळ ठेवणे आवश्यक आहे. हे प्रपंचात राहून करणे देखील शक्य आहे. हाच विचार रुजविण्याचे कार्य या अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून होत आहे.

सत्याची साधना हे परम लक्ष्य आहे. सत्याची प्राप्ती झाल्यानंतरच शाश्वत आनंद प्राप्ती होते. यासाठी आपण साधना करणे आवश्यक आहे. साधना उत्तम होणे कामी समाजाची भौतीक स्थिती उत्तम असणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकसंग्रह करणे व त्यांना त्यांचा मार्ग दाखविणे हे आवश्यक आहे. संत हे कळवळ असणार्‍या वृत्तीचे असतात, त्यांच्यात करुणा असते जे आपल्याला प्राप्त झाले ते इतरांना देखील प्राप्त व्हावे यासाठी कार्य करत असतात. असे योगीराज गंगागिरी महाराजांसारखे संत आपल्या सानिध्यात यावे यासाठी आपल्या अंगी तशी योग्यता बाळगणे आवश्यक असल्याचे महंत रामगिरी महाराज म्हणाले.

आज सांगता !

आज सोमवारी सकाळी 10 वाजता या अखंड हरिनाम सप्तहाची सांगता होत आहे. प्रहरा मंडपातील भजनाचे सूर थांबणार आहेत. महंत रामगिरी महाराजांचे काल्याचे कीर्तन होऊन सप्ताहाची सांगता होईल. 500 पोते साखरेची बुंदी व 700 पोते चिवडा असा महाप्रसाद वाटण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या