Friday, May 3, 2024
Homeनगरदहा लाख भाविकांच्या उपस्थितीत गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

दहा लाख भाविकांच्या उपस्थितीत गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

वैजापूर /राहाता तालुका प्रतिनिधी | Vaijapur| Rahata

नऊ ते दहा लाख भाविकांची मांदियाळी… राधाकृष्ण, गोपालकृष्ण या भजनावर फुगडीचा धरलेला घेर…मनोरे… अन महंत रामगिरी महाराजांच्या रसाळ वाणीतले कीर्तन…टाळ मृदृंगाचा नाद… अशा मंगलमय वातावरणात उपस्थित जनसागर भक्तीरसात चिंब झाला, वैजापूर येथील सदगुरु गंगागिरी महाराज 176 वा अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली.

- Advertisement -

कालच्या वैजापूर सप्ताहाच्या सांगतेला राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, ना. गिरीष महाजन, आमदार प्रा. रमेश बोरणारे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकूटे, स्नेहलता कोल्हे, गंगापूरचे आमदार प्रशांत बंब, माजी खासदार भाऊसाहेब वाक्चौरे, सिध्दार्थ मुरकूटे, डॉ.वंदना मुरकुटे, संगमनेरचे बाबा ओहोळ, डॉ. राजेंद्र पिपाडा, भाजपाचे सप्ताह समितीचे कार्याध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, उपाध्यक्ष साबेरभाई शेख, बाळासाहेब संचेती, शिल्पाताई परदेशी, बाबासाहेब जगताप, विशाल संचेती, पंकज ठोंबरे, सराला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज, विठ्ठलराव लंघे, बबनराव मुठे, नितीनराव कापसे, भाऊसाहेब विखे, कापसे पैठणीचे संचालक बाळासाहेब कापसे, नागेबाबा मल्टीस्टेटचे कडूभाऊ काळे, साई आदर्श मल्टिस्टेटचे शिवाजीराव कपाळे, नरेश राऊत फौंडेशनचे सेक्रटरी प्रा. लक्ष्मण गोर्डे, अस्तगावकर सराफचे अशोकराव बोर्‍हाडे, महालक्ष्मी दूधचे बाबासाहेब चिडे, भोला उदावंत, दत्तू खपके, संतोष जाधव, बाळासाहेब महाराज रंजाळे, दादा महाराज रंजाळे, गणेश महाराज शास्त्री, अमोल महाराज बडाख, नवनाथ महाराज म्हस्के, नवनाथ महाराज आंधळे, चंद्रकांत महाराज आंधळे, महेंद्र महाराज निकम, बहिरट महाराज, सचिन जगताप, डॉ. धनंजय धनवटे, बंडू खापटे, विक्रांत काले, रामभाऊ महाराज नादीकर, नवनाथ मेहेत्रे, डॉ. विजय कोते, सुनिल महाराज कोळपकर, आनंद आहेर यांचेसह भाविकांची अलोट गर्दी या सोहळ्यास होती.

याती कुळ माझे गेले हरपुनी। श्रीरंगा वाचोनी आणू नेणे॥ या संत ज्ञानेश्वर महाराजांंची गौळण निरुपणास घेत त्यावर महाराजांंनी कीर्तन केले. श्रीकृष्ण परमात्म्याशी ऐक्य पावल्यामुळे माझी जात, कुळ सर्व हरपून गेले. आता श्रीकृष्ण परमात्म्या वाचून दुसरे काही जाणत नाही. तुम्ही मला पुष्कळ व वारंवार कितीही शिकवले, उपदेश करता परंतू त्याचा काय उपयोग? मी त्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी रममाण होऊन गेले आहे. वारकरी सांप्रदायात काल्याला विशेष महत्त्व आहे. काला हा एकमेकांना वाटून खायचा असतो, जीव ब्रम्ह ऐक्य रुपी काला आहे. भगवान गोकुळात तर संत आपल्यासाठी काला करतात, ज्यांना दुसर्‍याचे सुख बघवत नाही, दुसर्‍याच्या सुखाचा नाश करू नये, दुसर्‍याला आनंद देणारांना भगवंताकडे जावे लागत नाही तर भगवंत त्यांच्याकडे येतात. भगवंत गोकुळात प्रकट झाले. यश प्रदान करणारी वृत्ती म्हणजे यशोदा! नंद म्हणजे आनंद! जो जगाला देतो. भगवंत गोकुळात प्रकट होतात जसे आपण भगवंतावर प्रेम करतो, तसे भगवंत आपल्यावर करतात. गोकुळातील गोपिकांचे प्रेमाचे वर्णन करत महाराज म्हणाले, कृष्णाने चोर्‍या केल्या नाही तर चौर्य लिला केल्या. चोरी करणे अपराध आहे. चोरी करणारा दंडास पात्र असतो. भगवंताने चौर्य लिला केल्या. लिला या आनंदाकरिता असतात. प्रेमाच्या चोरीत, भांडणातही आनंद असतो. लोणी हे माध्यम आहे. लोण्याप्रमाणे भगवंत भक्ताच्या चित्ताची चोरी करतो.

हा काला वैकुंठात नाही. भगवतालाही वैकुंठात दुर्मिळ आहे. देवाला वैकुंठात करमणार नाही, ते येथे आले असतील. ज्या ठिकाणी माझे भक्त भजन करतात तेथे भगवंत असतो. गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहात भगवंत आलेले आहेत. गोकुळ वासियांचे भगवंतावर असलेले प्रेम, संसारात आपण प्रेम पाहातो हे गरज म्हणून प्रेम, परंतू भक्ताचे भगवंतावर नैसर्गिक प्रेम असते. मनाला मोहित करणारा, आकर्षित करणारा श्रीकृष्ण आहे. गोपिकांच्या चित्ताचेे वर्णन करत महाराज म्हणाले, गोपीला जातीकुळाचा विसर पडला. आत्मा कुठल्या जाती कुळाचा नसतो. जाती कुळ हे देहाचे धर्म आहेत, आत्म्याचे धर्म नाहीत. परमात्म्याचेही नाहीत. परमात्मा सोडून मी काहीही जाणत नाही. शरीर कुठेही जन्म घेवु शकते. आत्म्याला जात नाही. भगवत गीतेत वर्णन आहे, कुत्रा, मणुष्य कुणीही असो, ज्याला त्यांच्यात परमात्मा दिसतो, ती परमार्थातील परिपक्व अवस्था आहे.

रामगिरी महाराजांचे कीर्तन हा अमृतयोग – आमदार थोरात

पिढीन पिढ्या एकादशीचे कीर्तन आणि काल्याच्या किर्तनाला उपस्थितीत राहिलेलो आहे. आणि त्यामुळे कुठेही गेलो तरी या दिवशी परत येतो. पुर्वीच्या हरिनाम सप्ताहात मी वाढण्याचे काम केले. एकादशीच्यादिवशी गरम खिचडी वाढताने हात पोळले. ते आता गोड वाटते. सप्ताहाची परंपरा पुढे पुढे जात आहे, ती मानवधर्म सांगणारी आहे. सगळे संत अनेक समाजातून आलेले आहे. परंतू मानवता धर्म सांगणारा वारकरी सांप्रदाय आहे. यावर्षी पाऊस नाही, खरीप गेला, अनेक संकटे पाहिले, याही संकटाला सामोरे जावे लागेल. हे संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना यानिमित्ताने आहे.

बेटाकडे येणार्‍या रस्त्यासाठी 12 कोटी- ना. विखे पाटील

योगिराज सदगुरु गंगागिरी महाराजांच्या ऐतिहासिक सप्ताह महंत रामगिरी महाराजांच्या नेतृत्वाखाली संपन्न होतो आहे. सराला बेटातून उर्जा मिळते. त्यामुळेच आपण सोलापूरचा पालकमंत्री म्हणून पंढरपूरला आषाढी एकादशीला चांगली सुविधा निर्माण करु शकलो. राज्यात अभुतपुर्व दुष्काळाची परिस्थिती आहे. पाऊस नाही. धरणं भरली नाहीत. जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपल्याला सोडवावा लागणार आहे. राज्य सरकारच्यावतीने कोणत्याही परिस्थितीमध्ये जनतेला वार्‍यावर सोडणार नाही. या सप्ताहाच्या निमित्ताने सप्ताहाची सांगता होतांना इतका पाऊस पडू दे की कायम स्वरुपी दूष्काळ हटू दे! अशा प्रकारे परमेश्वराकडे साकडं घालतो. सराला बेटाकडे येणारा माळेवाडी ते सरला गोवर्धन रस्त्यासाठी आपण 5 कोटी रुपये दिले. आणि यावर्षीही 7 कोटी देवू आणि मोठा रस्ता बेटावर जाण्यासाठी व्यवस्था करु, लोणी येथे नारायणगिरी महाराजांनी सप्ताह केला होता. त्याही पेक्षा रेकॉर्डब्रेक सप्ताह वैजापूरला झाला. हा जनसागर येथे आला तो केवळ सराला बेटावर श्रध्दा आहे म्हणुन, आणि रामगिरी महाराजांवर असणारा विश्वास त्यामुळे भक्तीसागर याठिकाणी लोटला.

सप्ताह भव्य दिव्य – बागडे

देशाची सांस्कृतीक पंरपरा आहे, देवाला मानणारी पंरपरा आहे. आणखी वाढत चालली आहे. जगामध्ये कोणत्याही संतांच्या बोलवण्यावरुन इतकी जनता जमत नाही. रमागिरी महाराजांच्या सानिध्यात जमु शकतात. सप्ताह सुंदर, आणि भव्यदिव्य झाला.

फुगडी रंगली !

राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल सप्ताहात भजनाच्या ठेक्यावर महंत रामगिरी महाराजांच्या बरोबर फुगडीचा घेर धरला होता. आमदार बोरणारे व माजी आमदार बाळासाहेब मुरकूटे यांच्यातही फुगडी रंगली.

पुढील सप्ताहाची मागणी वाढली !

वैजापूर येथे सुरू असलेला 176 वा अखंड हरिनाम सप्ताह मध्ये पुढील वर्षीचा 177 वा सप्ताह मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्ह्यासाठी, रत्नापूर गंगापूर तालुक्याच्या वतीने आमदार प्रशांत बंब, सभापती संतोष जाधव यांनी मागणी केली, आडगाव ग्रामस्थ तालुका राहाता, सावखेड गंगा पंचक्रोशी तालुका वैजापू र, वडाळा महादेव पंचक्रोशी तालुका श्रीरामपूर, डोंगरगाव पंचक्रोशी समस्त ग्रामस्थ तालुका येवला, नेवासा पंचक्रोशी तालुका नेवासा, अनकवाडे पंचक्रोशी तालुका नांदगाव, कुंभारी ग्रामस्थ तालुका कोपरगाव, चांदवड ग्रामस्थ तालुका चांदवड, नारखेडा गारखेडा पंचक्रोशी तालुका येवला, आधी सह विविध गावाहून अनेकांनी सप्ताह मागणी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या