Friday, September 11, 2026
HomeनगरRahata : अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने काळावर विजय मिळविण्याचे सामर्थ्य

Rahata : अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने काळावर विजय मिळविण्याचे सामर्थ्य

महंत रामगिरी || गंगागिरी महाराज सप्ताह सोहळ्यास धनगरवाडीत ऐतिहासिक मिरवणुकीने प्रारंभ

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

वारकर्‍यांचा कुंभमेळा संबोधला जाणारा 179 वा योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने मंगळवारी सकाळी वाकडी दत्तनगर रोडवरील यशवंतबाबा चौकी या ठिकाणाहून सकाळी 10 वाजता सजविलेल्या अश्वरथातून महंत रामगिरी महाराज यांची हत्ती, घोडे, उंट, ढोलताशा, लेझिम व झांज पथकाच्या गजरात सनई-चौघड्याच्या निनादात गावातील भजनी मंडळाच्या सुश्राव्य अभंगवाणीत सप्ताहस्थळापर्यंत शाही मिरवणूक काढण्यात आली.

- Advertisement -

यावेळी रस्त्यावर जागोजागी ऐतिहासिक देखावे, धनगरवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे रामायणातील देखावे हे भाविकांचे आकर्षण होते. शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे समाजप्रबोधनात्मक देखावे व पथनाट्यांचे सादरीकरण भक्त मंडळाच्या नियोजनातून करण्यात आले. मिरवणूक मार्गावर धनगरवाडी हिरवाईने नटलेल्या शिवारात ढोल, ताशांचा निनाद, भगव्या पताकांची रेलचेल, कलशधारी सुवासिनी, तुळशीवृंद डोक्यावर घेतलेल्या महिला, आदिवासी नृत्य, संतमेळा व सहभागी पथकांचा रिंगण सोहळा, भजनाची सुरावट, कमालीचा उत्साह, असा ऐतिहासिक मिरवणुकीचा नयनरम्य सोहळा रंगला.

मिरवणूक भजन मंडपासमोर पोहोचताच रामगिरी महाराज यांच्या हस्ते अखंड यज्ञ प्रज्वलित करण्यात आला. सराला बेटाचे पुरोहित मनोज गुरु यांनी पौरहित्य केले. त्या नंतर प्रहारा मंडपातील सदगुरू गंगागिरी महाराज, ब्रम्हलीन नारायणगिरी महाराजासह बेटाच्या परंपरेतील संतांच्या प्रतिमांचे पूजन, वीणापूजन करून पंचपदी गायनाने अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ करण्यात आला. भजनाचे सूर उमटले, टाळांचा लयबद्ध आवाज, मृदंगाचे आवाज घुमू लागले. उपस्थित भाविक भजनात तल्लीन झाले. अखंड भजनाचे सूर प्रहरा मंडपात घुमू लागले. अन् अखंड भजन सुरू झाले.

याप्रसंगी महंत रामगिरी महाराज म्हणाले, योगीराज सदगुरू गंगागिरीजी महाराजांनी 179 वर्षांपूर्वी सप्ताह सुरू केला. या सप्ताहात अखंड भजन असते. अनेक ठिकाणी सप्ताह असतो. परंतु अखंड भजन असणारा हा एकमेव सप्ताह आहे. सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्यानंतर या सप्ताहाची धुरा हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज आणि सद्गुरू नारायणगिरी महाराज यांनी पुढे नेली. गुरुवर्य नारायणगिरी महाराजांनी या सप्ताहाचा विस्तार केला. महाराजांनी या सप्ताहातून लाखो समाज जोडण्याचे मोठे कार्य केले. सप्ताहाच्या निमित्ताने आज जे फळ दिसते ते या पाच महात्म्यांच्या तपस्यांचे फळ आहे. तपस्या केली या महात्म्यांनी अन् फळ चाखत आहोत आपण सर्व जण! आपण सर्व भाग्यवान आहोत. सद्गुरू गंगागिरी महाराजांनी भजनाची अखंड परंपरा सुरू केली. अन्नदानाची अखंड परंपरा सुरू केली. कळी काळावर मात करण्याचे सामर्थ्य भगवंतचिंतनात आहे.

धनगरवाडी हे सप्ताहस्थळ चांगले आहे. श्रीरामपुरात जोरदार स्वागत झाले. सर्व गावांनी या सप्ताहास सहकार्य करावे. आजूबाजूच्या गावांनी भाकरी सकाळी लवकर करून सप्ताहस्थळी द्याव्यात. म्हणजे पंगती लवकर सुरू होतील. काल सप्ताहाच्या पहिल्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील गावांमधून मांडे आणि पोळ्या आल्या होत्या. राहाता, श्रीरामपूर तालुक्यांतूनही पुरणाच्या पोळ्या आल्या. वैजापूर, गंगापूर तालुक्यांतील गावांमधूनही पुरण पोळ्या आल्या. हा महाप्रसाद 1 लाखांहून अधिक भाविकांना वाटप करण्यात आला. मांडे व पुरणपोळीसाठी लागणारे दूध बाबासाहेब चिडे मित्रमंडळाच्या वतीने देण्यात आले. 35 हजार लिटर दूध त्यांनी दिले. या सप्ताहात सोन्याचे अथवा कोणतेही मौल्यवान दागिने महिला भाविकांनी अंगावर घालून येऊ नयेत, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. काल सप्ताहात पुणे येथून सप्ताहासाठी आलेल्या भारती संभाजी पवार या महिलेच्या गळ्यातील 3 तोळ्यांचे दागिने चोरट्यांनी लांबविले. आपली दुचाकी, चारचाकी जपा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महंत रामगिरी महाराज सप्ताहस्थळी येत असताना श्रीरामपूर नगरीत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. हरेगावकडून श्रीरामपूरकडे येताना भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. चार ते पाच हजार दुचाकींवरून तरुण या रॅलीत सहभागी झाले होते. ठिकठिकाणी चौकात महाराजांच्या वाहनावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या ऐतिहासिक मिरवणुकीत शाळकरी मुलांनी लेझिमवर ठेका धरला. चितळी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रामायणातील जिवंत पात्रे साकारली. वाकडीच्या श्री लक्ष्मीनारायण विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पावली, लेझिम, परंपरेतील संतांची वेशभूषा आदी साकारत सहभाग घेतला. यावेळी आमदार आशुतोष काळे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, संदीपान लहारे, बाबासाहेब चिडे, अस्तगावकर सराफचे अशोक बोर्‍हाडे, नानासाहेब शिंदे, सुधारक ठोंबरे, नीरज मुरकुटे, सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज, मधुसूदन महाराज, अमोल महाराज बडाख, विक्रम महाराज, दादासाहेब रंजाळे, डॉ. विजय कोते, साहेबराव नळे, भारत महाराज, असावा, आदीसह बेटाचे विद्यार्थी शिष्य भाविकांसह लाखो भाविकांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या