राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
सप्ताहातील प्रसादात प्रसन्नता आहे. भगवंताच्या चिंतनातला प्रसाद आहे. ज्या संस्काराचे अन्न आपण खातो तसे मन बनते. ज्याला जगावे असे वाटते, त्याला कापून खाऊ नये. परमार्थ करणारांनी मांसाहार करु नये, असे प्रतिपादन सराला बेटाचे प्रमुख महंत रामगिरी महाराज यांनी केले. राहाता तालुक्यातील श्रीश्रेत्र धनगरवाडी येथे सदगुरु गंगागिरी महाराज 179 वा अखंड हरिनाम सप्ताहाच्या 5 व्या दिवशीच्या चौथ्या प्रवचन पुष्पात महंत रामगिरी महाराज बोलत होते. डॉ. सुजय विखे पाटील, खा. भाऊसाहेब वाकचौरे, आ. विठ्ठलराव लंघे, आ. अमोल खताळ, गंगापूरचे कृष्णा पाटील डोणगावकर, सचिन गुजर, प्रकाश चित्ते, दिपक पटारे, मंजुश्री मुरकुटे, निरज मुरकूटे, दिपाली चित्ते, वाल्मिक शिरसाठ, कमलाकर कोते, सराला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज, विक्रम महाराज, अशिष धनवटे, श्रीरामपूरचे मुख्याधिकारी मनोज उर्किडे, भगवान महाराज जंगले, सर्जेराव मुंढे, अविनाश गलांडे, अस्तगावकर सराफचे अशोकराव बोर्हाडे, नवनाथ महाराज म्हस्के, संदिपानंद लहारे, बापुसाहेब लहारे, यांच्यासह 7 लाखाहुन अधिक भाविकांनी सप्ताहाला हजेरी लावली.
गीतेतील 12 व्या अध्यातील 6 व्या श्लोकावर विवेचन सुरु आहे. भक्ती आणि प्रेम यावर त्यांनी प्रकाश टाकला. अर्जुनावर प्रेम होते म्हणून भगवंताने त्यांच्या रथाचे सारथ्य केले. ज्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे, ते कधीच टिकत नाही.
सप्ताहातील प्रसाद हा प्रसन्नता देणारा आहे. भगवंताच्या चिंतनातील हा प्रसाद आहे. आपण आणलेली भाकरी, बनविलेली आमटी वारकर्यांच्या मुखात जाणारी आहे. ज्या संस्काराचे अन्न खातो, तसे आपले मन बनते. मांसाहार निषेध का? शास्त्र सांगते जिवाची हत्या करु नये. ज्याला जगावेसे वाटते त्याला मारुन खावू नये. परमार्थ जे करतात त्यांनी मांसाहार करु नये. अन्न कुणाचे त्याचे संस्कार अन्नावर होतात. यावर महाराजांनी रामदास स्वामींचा प्रसंग श्रोत्यांना कथन केला. एकाने शिष्यगणांसह रामदास स्वामींना भोजनाचे निमंत्रण दिले. चांदीच्या वाट्यांमध्ये जेवण वाढले जात होते. एका शिष्याने एक वाटी चोरल्याचा आरोप झाला. त्याच्या झोळीत वाटी निघाली. त्यावर जेवण देणाराला विचारले हे अन्न कुणाकडून आणले. त्यावर तो म्हणाला, एका चोराकडून खरेदी केले. अन्न कोणाकडून घेतले, अन्नाचे संस्कार मनावर होतात. हे अध्यात्म शास्त्र सांगते. वाईट विचारांच्या व्यक्तीच्या श्वासाचा ही दुसर्यावर परिणाम होतो. वाईट दृष्टीचाही परिणाम होतो. म्हणून लहान मुलाची दृष्ट काढली जाते. वस्तु वापरली तरी परिणाम होतात. यावर महाराजांनी श्रीमद्भागवतातील परिक्षिती राजाच्या प्रसंग श्रोत्यांना सांगितला.
परिक्षिती राजा शिकारीला जंगलात जातो. तहान लागते. जंगलात एक झोपडी दिसते. तो तिथे जातो. तेथे एक साधु डोळे बंद करुन तपसाधनेला बसलेला असतो. तो बघत नाही म्हणून परिक्षिती राजाला राग येतो. तेथे एक मेलेला साप पडलेला असतो. तो साप साधुच्या गळ्यात घालतो आणि निघुन येतो. राजवाड्यात आल्यावर डोक्यावरचा मुकूट काढून ठेवतो आणि त्याला साधु बरोबर केलेली चुक लक्षात येते. तो मुकूट जरासंधाचा होता. वाईट विचाराच्या माणसाचा परिणाम वस्तुवर होतो. संतांची दृष्टी ही आनंदाचा वर्षाव करणारी असते.
प्रेम हे अविच्छन्न असते. खर्या प्रेमाला नष्ट करण्याची ताकद कुणातच नाही. जवळचा दूर गेला, विच्छेद होतो. भक्तीत विच्छेद नाही! भगवान श्रीकृष्ण द्वापरयुगात होवून गेले. कलयुगात मिराबाई कृष्णभक्तीत विलीन झाल्या. भगवान रामचंद्र त्रेतायुगात होवुन गेले.आज रामभक्त कलियुगात रामाची भक्ती करतात. खर्या प्रेमात काळाचे सुध्दा बंधन नाही. वियोगाचे बंधन नाही. त्यात होणारे रुदन आनंददायी असते. प्रेमाच्या नेत्रांनी दोष दिसत नाही. मुलगा आंधळा असतो, मतीमंद असतो तरीही त्याच्यावर आईचे प्रेम असते ना, भगवंतासाठी साधक कंदमुळे खाऊन जंगलात राहातात हे भगवंताच्या भक्तीमुळे, प्रेमामुळेच ना. सती जाणार्या स्त्री पुढे चिता जळत असते, तीला भय नसते. सती प्रथा पुर्वी होती आता नाही. काही जण म्हणतात सतीला चितेत लोटले जात, कुणी लोटले याची माहिती नाही. काही जण आपल्या संस्कृतीला बदनाम करण्याचे प्रयत्न करतात. धुंडा महाराज देगलूरकर यांचा मृत्यु झाला. हे समजताच पत्नीने प्राण सोडला. हे प्रेम आहे. भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेल्यानंतर कुंतीने प्राण सोडला. प्रेम हे प्राणाच्या पलिकडचे आहे. हे सतीत्व आहे. कुणी कुणाला अग्नित टाकले असेल ती विकृती आहे, दोष आहे.परंतु त्या विकृतीला पुढे करुन सती परंपरा चुकीची आहे. असे म्हणणारा एक वर्ग आहे. हिंदू धर्माला बदनाम करणारा एक वर्ग आहे. अनागोंदिचा राजा व भानुदास महाराज यांचा प्रसंग महाराजांनी सांगितला.
माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सप्ताहाला भेट दिली. महाराजांचा सन्मान केला. सांगतेच्या महाप्रसादासाठी 101 पोती साखर त्यांनी विखे कुटूंबियांच्यावतीने सप्ताहाला दिली. ते म्हणाले, सप्ताहाला भव्य स्वरुप आले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातुन चार कोटी रुपयांचे रस्त्यांचे कामे करण्यात आली.
डॉ. सुजय विखे रस्त्यावर
सप्ताहाकडे येणारे सर्व रस्ते तुडूंब भरुन वाहत आहेत. यामुळे वाहानांची कोंडी होते. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना वाहनांची कोंडी दिसली. त्यांनी त्यांच्या पुढे होत सर्व वाहने शिस्तीने चालविण्यासाठी पुढाकार घेतला व ट्रॅफिक सुरळीत केली.




