माळवाडगाव |वार्ताहर| Malvadgav
लोकसभा निवडणुकीदरम्यान मुठभर लोकांनी ‘व्होट जिहाद’चा प्रयोग केल्यानंतर, आपण महंत रामगिरी महाराज व अध्यात्मातील सर्व संत, महंतांना धर्म संस्कृतीवर होणारे आक्रमण परतविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले, त्यावर सर्व संत एकत्र आल्याने समोरच्यांचा सुपडासाफ झाल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिदेवगाव सप्तक्रोशी येथील सद्गुरु गंगागिरी महाराज 178 व्या सप्ताहाच्या सांगतेप्रसंगी केले.
सद्गुरु गंगागिरी महाराज सप्ताह सांगता प्रसंगी अथांग जनसमुदायासमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आम्ही मुंबईहुन निघताना समुद्र पाहीला, इथ आल्यावर वरतून माणसांचा जनसागर पाहिला. सदगुरू गंगागिरी महाराज यांनी ना भुतो न भविष्यती अशी सप्ताहाची परंपरा सुरू केली. महंत रामगिरी महाराज ही परंपरा जोमाने चालवत आहे. या सप्ताहाच्या निमंत्रणासाठी महंत रामगिरी महाराजांचा निरोप आला. आणि ते मी आनंदाने स्विकारले,
लोकसभेच्या निवडणुकीत ज्या महाराष्ट्रात ‘व्होट जिहाद’ चा प्रयोग झाला. या प्रयोगातून राजकीय ‘व्होट जिहाद’ राजकीय व्यवस्था उभी राहिली. धर्मावरील षडयंत्र लक्षात आल्यावर आम्ही, महंत रामगिरी महाराज यांच्यासह अध्यात्मिक संत महंताना आवाहन केले. हे राजकीय आक्रमण नसून आपल्या धर्म, संस्कृतीवर होणारे आक्रमण आहे.
मुठभर लोक एकत्र येऊन धर्म, संस्कृतीच्या विचाराला परावृत्त करू पाहाताहेत. यापूर्वी मंदिरांवर जसे आक्रमण झाले, तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, म्हणून सावधान राहीले पाहीजे, सरकारे येतील, सरकारे जातील. परंतु, आपला देश, धर्म, संस्कृती कायम राहिली पाहिजे, संस्कृतीला वाचवायचे असेल तर, अध्यात्मिक शक्ती एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. महंत रामगिरी महाराज यांच्यासह सर्व शक्ती एकत्र आली अन् समोरचा सुपडासाफ झाला. या परिसरातील शेतकर्यांच्या हितासाठी शनिदेवगाव बंधार्याचे काम करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच सरालाबेट विकासाचा 109 कोटी रूपयांचा आराखडा लवकरात लवकर मंजूर करू, असाही त्यांनी यावेळी शब्द दिला. जलसिंचनाच्या सुविधा देऊन या राज्यातील शेतकर्यांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त करणार असून नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून नगर जिल्ह्यासह मराठवाड्याला पाणी आणणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि ना. गिरीष महाजन यांनी यावर अगोदरच काम सुरू केले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. आ.रमेश बोरनारे यांनी प्रास्ताविक केले. दिनेश परदेशी यांनी आभार मानले.
महाआघाडीच्या नेत्यांच्या अनुपस्थितीची भाविकांत रंगली चर्चा
सर्व राजकीय पक्षांचे आजी-माजी आमदार, खासदार, मंत्री सांगता सोहळ्यास हजेरी लावतात. मात्र, या सांगता सोहळ्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार असल्याने व्यासपीठावर महायुतीचा प्रभाव राहील हा विचार समोर ठेवून, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खा.चंद्रकांत खैरे, शिर्डी लोकसभा मतदारसंघ खासदार भाऊसाहेब वाकचौरे सप्ताह काळात दर्शन घेऊन परतले. श्रीरामपूर काँग्रेसचे आ. हेमंत ओगले व त्यांचे सहकारी आपापल्या सोयीनुसार सप्ताह काळात हजेरी लावून महंत रामगिरी महाराज यांचे दर्शन घेतले. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सप्ताहास सर्वोतोपरी सहकार्य, यंत्रसामुग्री पुरविली. ते सप्ताहात नक्की येतील अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा होती, परंतू सप्ताह अखेरपर्यंत तेही आले नाही.
नेवासा, संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, राहात्यासह अनेकांनी केली सप्ताहासाठी मागणी
योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज 178 व्या सप्ताह मागणीसाठी अनेक राजकीय नेते मंडळींसह भाविक ग्रामस्थांनी मागणी केली. यात पैठणसाठी आ.विलास भुमरे, संभाजीनगरसाठी चंद्रकांत खैरे, नेवाशासाठी आ.विठ्ठलराव लंघे, संगमनेरसाठी आ. अम़ोल खताळ, करमाळासाठी आ. नारायणराव पाटील, नगिना पिंपळगाव, ता.वैजापुर, राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा, राहाता तालुक्यातील वाकडी खंडोबा, कोपरगाव तालुक्यातील कुंभारी, सिन्नर तालुक्यातील शहा, श्रीरामपूर तालुक्यातील धनगरवाडी, नरहरी रांजणगाव शिंगी, पिंपरी ग्रामस्थांचा समावेश आहे. त्यामुळे हा लाभ रामगिरी महाराज कुणाला देतात? याकडे सर्व भाविकांच्या नजरा आहेत.
मी पुन्हा येईन…
अध्यात्मिक शक्ती सुमार्गाने चालविण्याची प्रेरणा देते. महंत रामगिरी महाराज यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आलो, सप्ताहात पुन्हा येईन. मी तुम्हाला सांगतो मी पुन्हा येईन म्हटल्यावर पुन्हा येत़ोच, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणताच उपस्थितांनी भरभरून दाद दिली.





