माळवाडगाव |वार्ताहर| Malvadgav
ज्यांना संसार करता येत नाही, अथवा संसारात मन रमत नाही ते लोक परमार्थ करतात. हे धादांत खोटे असून कुणीही याव, इतका परमार्थ सोपा नसल्याचा उपदेश महंत रामगिरी महाराज यांनी सप्ताहाच्या सातव्या दिवशीच्या किर्तन सोहळ्यात केला. आज बुधवारी या सोहळ्याची सांगता होणार आहे.
श्रीरामपूर-वैजापूर तालुका हद्दीवर शनैश्वर देवस्थान, शनिदेवगाव सप्तक्रोशी येथे सुरू असलेल्या 178 व्या योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज सप्ताहाचा सातव्या दिवशी एकादशी कीर्तन सेवेत भक्ती जो कठीण, सुळावरील पोळी, निवडले तो बळी विरळा शुर, या संत तुकाराम महाराजांच्या मागणीपर अभंगातून महाराजांनी भाविकांना उपदेश केला. महाराज पुढे म्हणाले, सद्गुरुयोगीराज गंगागिरी महाराजांनी सप्ताहाच्या माध्यमातून मानवांना ईश्वर भक्ती, अध्यात्माच्या मार्गावर आणले. 200 वर्षांपूर्वी त्यांनी समाजाला हलगी-ढोलकी तमाशापासून परावृत्त करत कथा, कीर्तन, भजनात जोडले.
वाईट व्यसनापासून अनेकांना परावर्तीत केले, परंतू आज आध्यात्मिक क्षेत्रातील ढोंगी, लोभी समाज अध्यात्माचे खोटे सोंग करत आहे, या ढोंगी समाजाचा कावा वेळीच ओळखून आपण जागृत राहिले पाहिजे, अशा पाखंडी ढोंगी लोकांना योगीराज गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहात प्रवेश नसल्याचे महाराज म्हणाले. संसारात सुख दुःख सम समान असते. परंतु, अखंड हरिनाम सप्ताहात फक्त आनंदच पाहायला मिळतो, तुकाराम महाराजांच्या अभंगा प्रमाणे भक्ती कठीण असली तरी ती नामस्मरण, भजन, कीर्तनाने सोपी होत असते.
गोदावरी, गंगा पाप नाहीसे करते, तर संत पाप आणि ताप या दोन्ही गोष्टी नष्ट करतात, भगवंता प्रती ज्याची भक्ती दृढ असते, तोच सर्व कष्ट घेऊन निष्काम भक्ती करत असतो. येथील भजनी, वारकरी हे सात दिवसांपासून मिळेल, ती आमटी भाकर खाऊन भगवंताचे भजन करत आहे, ज्ञानी भक्त भगवंताकडे प्रेम मागतो, तर जिज्ञासू उदारता मागतो, आमच्यासाठी हा ज्ञानमार्ग आहे. पण त्यांच्या लक्षात येत नाही, की तो अत्यंत कठीण आहे. त्यात अभिमान नष्ट होण्याऐवजी वाढण्याचाच संभव जास्त असतो. नुसत्या विचाराने देहाचे मिथ्यत्व अनुभवाला येणे, कर्मठ लोक म्हणतात की, आम्ही आमच्या कर्ममार्गानेच जाणार, आमचा नामावर विश्वास नाही. आम्ही कर्मानी घालून दिलेली बंधने आणि नियम यांचे पालन करणार, असे म्हणून ते बंधने आणि नियम यांचे इतके काही पालन करतात की, ते बंधनालाच सर्वस्व मानतात. त्यांच्या हे लक्षात येत नाही, की ईश्वरप्राप्ती हे साध्य असून बंधने आणि नियम हे साधनरूप आहेत. साध्य साधण्यापुरतीच बंधने पाळायला हवीत असे महाराज शेवटी म्हणाले.
आजच्या सप्ताहास माजी खासदार डॉ. सुजय विखे, आ.रमेश बोरणारे, पैठणचे आ. विलासबापु भुमरे, आ.विठ्ठलराव लंघे, माजी आमदार लहु कानडे, माजी आमदार भाऊसाहेब चिगटगावकर, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, शिंदे सेनेच्या शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख सुरेखा गव्हाणे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुनिता शेळके, माजी आमदार भानुदास मुरकुटे, डॉ. सुरेश बेल्हेकर, राजेंद्र काळे, भद्रा मारुती संस्थानचे अध्यक्ष मिठु बारगळ, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे, अशोकचे व्हा.चेअरमन बाबासाहेब आदिक, संचालक निरज मुरकुटे, अशोक बोर्हाडे, प्रवरेचे निवृत्त कार्यकारी संचालक अभिजित भागडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष भागडे, दिपक पटारे, गिरीधर आसने, डॉ. शंकर मुठे, भाऊसाहेब बांद्रे, बजरंग दरंदले, संदीप जगताप, रामदरबार आश्रमाचे हरिशरणगिरी महाराज, शिवगिरी आश्रमाचे संदिपान महाराज, योगानंदगिरी महाराज, विक्रम महाराज, सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज यांच्यासह सरालाबेटचे सर्व शिष्यगण उपस्थित होते.
पोलिस प्रशासन गर्दीवर लक्ष ठेवून
सांगता सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत ना. राधाकृष्ण विखे पाटील, ना.संजय शिरसाट तसेच आमदार, खासदार उपस्थिती लावणार आहेत. श्रीरामपूर तालुका हद्दीकडून गर्दी वाढणार असल्याने अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुंजे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस निरीक्षक धनवडे हे गर्दीवर लक्ष ठेवून आहेत. येणारे रस्ते वाहतूक जैसे थे ठेवावी. मात्र, रविवारप्रमाणे बंधार्यावर कोंडी होऊ नये म्हणून पोलीस कर्मचारी व स्वयंसेवी तरूणात वाढ करण्याची मागणी सप्ताह कमिटीने केली आहे.
आज अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता निमित्ताने 450 पोते बुंदी प्रसादाचे 15 हजार युवक-महिला 400 ट्रॅक्टर-ट्राली द्वारे वाटप करणार आहेत. सुमारे 10 लाखांहून अधिक भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज सप्ताह समितीने केला आहे. आतापर्यंत पंचक्रोशीतल्या गावोगावच्या तरूण मंडळे, महिला मंडळ, विविध विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आमटी भाकरी, खिचडी फराळ, वाढण्याचे काम चोख केल्याबद्दल तसेच त्यांना कडुभाऊ काळे यांनी योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल महंत रामगिरी महाराज यांनी त्यांचे कौतुक केले.





