माळवाडगाव |वार्ताहर| Malvadgav
भारत देश स्वातंत्र्य होण्यापूर्वी 100 वर्षं अगोदर मुघलांच्या हैद्राबाद स्टेट राजवटीपासून सद्गुरू गंगागिरी महाराज यांनी अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ केला. या सप्ताहात राजकीय नेते मंडळी, भाविक भक्त, महाराज मंडळींपासून तर 10 हजार भजनी टाळकर्यांपर्यंत कुणाला निमंत्रण नसते. चालत आलेल्या परंपरेनुसार, सप्ताह काळात आठ दिवसांत 20 ते 25 लाखांवर समाज येऊन जातो. ही परंपरा वारकरी संप्रदायात कुठेही पाहायला मिळणार नाही, असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी सप्ताहाच्या सांगता काळात कीर्तनातून लाखोंच्या जनसमुदायासमोर उपदेश करताना केले.
शनिदेवगाव सप्तक्रोशीतील बाजाठान, चेंडुफळ, हमरापूर, अवलगाव, कमालपूर, भामाठान या गावांनी घेतलेल्या सद्गुरु गंगागिरी महाराज सप्ताहाची सांगता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, आ. रमेश बोरनारे, आ. विठ्ठलराव लंघे, आ. अमोल खताळ आदी प्रमुखांसह लाखो भाविकांच्या मांदियाळीत उत्साहात झाली.
याप्रसंगी महंत रामगिरी महाराज यांनी काल्याच्या कीर्तनातून संत ज्ञानोबारायांच्या अभंगातील कृष्णे वेधीयेली विरहीनी बोले, या श्रीकृष्ण चरित्रपर गौळणीतून उपदेश करताना सांगितले की, योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज यांच्या आशीर्वादाने सद्गुरू नाथगिरी महाराज, हरिगिरी महाराज, सोमेश्वरगिरी, नारायणगिरी महाराज यांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या 178 व्या सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात पार पडत आहे. मुघल शासनाच्या पारतंत्र्यात देश स्वातंत्र्य होण्याच्या 100 वर्षे अगोदर सद्गुरू गंगागिरी महाराज यांनी सप्ताह सुरू केला. त्या कालखंडात गंगागिरी महाराज यांच्या चरित्रातील एक उदाहरण सांगताना महाराज म्हणाले की, लासूर येथील देवीदाक्षायणी यात्रेत गंगागिरी महाराज दर्शनासाठी गेले, तिथे नाथपंथी माधवनाथ महाराज भेटले. सर्व लोक तमाशा फडाकडे गेले होते.
माधवनाथ महाराज पट्टीचे पखवाज वादक होते, तर गंगागिरी महाराज भजन म्हणताना पहाडी सुमधुर स्वरात होते. त्या कालखंडात आधुनिक स्पिकर्स यंत्रणा नसतानाही दोघांनी भजनास सुरूवात केली. देवी मंदिरातील त्या भजनाचे स्वर तमाशा फडातील रसिकांच्या कानावर गेले. तमाशातील सर्व लोक भजनाकडे आल्याचा दैवी चमत्कार 200 वर्षांपूर्वी सद्गुरू गंगागिरी महाराज यांनी केला. सप्ताहाची परंपरा 178 वर्षांची असताना, त्या अगोदर महाराजांची समाज हरिनामाकडे वळविण्याची वाणीची ताकद सुरू होती.
या सप्ताहात 7 दिवस आठ ते दहा हजार टाळकरी यांच्याकडून अखंड 24 तास भजनाचा 168 तासांचा विक्रम झालेला आहे. ही महाराजांच्या भजनाची ताकद आहे. दोन वर्षांपूर्वी वैजापूर सप्ताहात सहा दिवसांत 56 लाख भाकर्या, दररोज एक लाख लीटर आमटी, एक लिटरमध्ये चार माणसे म्हणजे दिवसाला चार लाख भाविक प्रसाद घेतात. हा विश्वविक्रम आहे. येथे कोणत्याही भजन, किर्तनकाराला निमंत्रण नसते. आज किर्तन कुणाच होणार हे त्यांना ऐनवेळी सांगितले जाते. आपण एवढे भाविक उपस्थित आहात, आपणास कुणी निमंत्रण दिले का? ही तर गंगागिरी महाराज यांच्या भक्तीची ताकद होय, असे महाराज शेवटी म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रामगिरी महाराज, विखे पाटील, गिरीश महाजन तसेच सुरेश चव्हाणके, स्नेहलता कोल्हे, आ. रमेश बोरनारे, विठ्ठलराव लंघे, अमोल खताळ यांच्या फुगड्या चांगल्याच रंगल्याने उपस्थित लाखो भाविकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. राधाकृष्ण विखे पाटील, ना. गिरीष महाजन यांच्यासह सर्व आमदार, माजी आमदार आणि अन्य पदाधिकारी यांचे महाराजांनी स्वागत केले.
या सप्ताहास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत हेलिकॉप्टरमधून जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांचे आगमन झाले. व्यासपीठावर आ. रमेश बोरनारे, आ. अमोल खताळ, आ. विठ्ठलराव लंघे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे, बाळासाहेब मुरकुटे, स्नेहलता कोल्हे यांच्यासह सुरेश चव्हाणके, डॉ. राजेंद्र पिपाडा, शिल्पा परदेशी, अविनाश गलांडे, कडुभाऊ काळे, कापसे पैठणीचे बाळासाहेब कापसे, बाबासाहेब चिडे, दीपक पटारे, गिरीधर आसने, डॉ. शंकर मुठे, निरज मुरकुटे, भाजपा अध्यात्मिक आघाडीचे अक्षय महाराज भोसले, ब्रम्हकुमारी ऊषा दीदी, धनजंय धोर्डे, डॉ. वंदनाताई मुरकुटे, शिंदे सेनेच्या शिर्डी संपर्क प्रमुख सुरेखा गव्हाणे, अहिल्यानगर महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सुनिता शेळके, संतोष डहाळे, डॉ. प्रकाश शेळके, सिद्धार्थ मुरकुटे, राजेंद्र साळुंके, भोला ऊदावंत, प्राचार्य एस. आर. बखळे, अस्तगांवकर सराफचे अशोक बोर्हाडे, शिवाजीराव काळे, दत्तू खपके, डॉ. विजय कोते, किशोर थोरात, अशोकचे व्हा. चेअरमन बाबासाहेब आदिक, बाबासाहेब काळे, सप्ताह समितीचे उपाध्यक्ष हरिशरणगिरी महाराज, संदिपान महाराज, योगेंद्रगिरी महाराज यांच्यासह सराला बेटाचे सर्व शिष्यगण महाराज उपस्थित होते. मधू महाराज यांनी सर्वांचे स्वागत करत आभार मानले.





