राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
संसारामध्ये परमार्थ रुपी रसायन कच्चे ठेवू नये. अग्नीच्या संपर्कात सोने शुध्द होते. त्यातील तांबे वेगळे होते. त्याप्रमाणे भक्तीच्या आणि हरिनामाच्या भट्टीत तावून सुलाखून निघालेले मानवी मन देखील प्रवृत्ती निवृत्तीच्या पलिकडे जावून शुध्द व समाधानी बनते, असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.
एकादशीच्या किर्तनात महाराजांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा प्रवृतिनिवृत्तीचे आटुनिया भाग। उतरिलें चांग रसायण॥ हा अभंग निरुपणास घेत त्यावर दोन तास कीर्तन केले. ते म्हणाले, तुकाराम महाराज या अभंगात असे एक रसायन सांगतात, औषध सांगतात, ते घेतल्यानंतर सर्वात मोठा रोग या जिवाला जडलेला आहे, तो म्हणजे भवरोग! अनंत जन्मापासून भोगावा लागणारा हा रोग आहे. हा भवरोग नष्ट करण्यासाठी अनेक रसायनांचा प्रयोग या अभंगात सांगितला आहे. काही रोग सामान्य, काही मोठे तर साध्य तर काही असाध्य असतात.
साधारण रोगाला बरे करायचे असेल तर औषधे तयार करावी लागतात. विविध प्रकारचे रोग सांगत महाराज म्हणाले, संसर्गजन्य रोज निर्माण होवू शकतो का? तर करोनाचे उदाहरण देत महाराज म्हणाले, हा रोग चीनने निर्माण केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. पुर्वी प्लेग रोग व्हायचा. लोक घरदार सोडून जंगलात राहायला जायचे. उंदरापासून संसर्ग होत असे, संसर्गामुळे लोक त्या काळी मरत असे. एक अशाच प्रकारचा रोग आचार्य चाणक्याने निर्माण केला होता. सिकंदर जेव्हा जग जिंकण्याच्या मानसिकतेने भारतात येत होता. त्याला रोखण्याकरिता आचार्य चाणक्यांनी एक प्रयोग केला होता. नवरात्रीचा काळ होता. काही भारतीय सैनिक सिकंदराच्या सेनेत होते. शत्रु जर बलवान असेल, त्याच्याशी लढता येत नसेल तर त्यावेळी चाणक्य निती वापरली जात होती. चाणक्यांनी चंद्रगुप्त मौर्यांना त्या सेनेत पाठविले. गुप्त रितीने सैनिक बनून, मौर्यांनी तेथे भारतीय सैनिकांना जावुन सांगितले आता नवरात्र चालु आहे.
तुम्ही भारतीय आहात. भारतीयांनी नवरात्रात उपवास केला पाहिजे. नऊ दिवस शक्य नसेल तर तीन दिवस करा, अष्टमी, नवमी आणि दशमी! चाणक्यांनी काय केले, प्लेग ची साथ ज्या ठिकाणी होती, तेथील बाधित उंदीर धरुन आणले. सिंकंदराच्या किचनमध्ये सोडले. भारतीय सैनिकांना उपवास करायला लावला. भारतीय सैनिक जेवायला गेलेच नाही. युध्द न करता सिकंदराचे सैनिक मेले. हीच चाणक्य निती 2 हजार वर्षापूर्वी वापरली. असे संसर्गजन्य निर्माणही केले जातात.
आयुर्वेदाला अजुनही खूप महत्व आहे. सराला बेटावर सरकारच्या परवानगीने आयुर्वेद औषधालय सुरु केल्याचे सांगत महाराज म्हणाले, कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर, मुळव्याध, किडनीस्टोन आदींवर उपचारासाठी औषध तयार केले जाते. गोळ्या औषधांच्या माध्यमातून तसेच शेतीला औषधे, खते वापरली जातात त्यातून आपण रासायनिक विष शरीरात घेतो. आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर नैसर्गिक शेतीकडे आपल्याला वळायला पाहिजे. टेंभुर्णी (पंढरपूर) येथे पुढील सप्ताहाची मागणी तेथील भाविकांनी केली. मागणीचा धागा पकडून महाराज म्हणाले, या सप्ताहात पंढरीचा पांडूरंग उपस्थित आहे. ज्या ठिकाणी माझे भक्त माझ्यासाठी गातात तेथे मी असतो! पांडूरंगाचे भजन या ठिकाणी सुरु आहे. पांडूरंगाला पंढरपुरात करमणार नाही.
इंद्रदेवाला काम नावाचा रोग जडला होता. गौतम ॠषींचा वेश करुन ते गौतम ॠषींची पत्नी अहिल्याकडे गेले होते. गौतम ॠषींनी इंद्राला शाप दिला होता. चंद्रालाही हा रोग झाला होता. ब्रम्हदेवाला संशयाचा रोग झाल्याचे सांगत महाराज म्हणाले, कृष्णाने गोपाळांचे उच्चिष्ट खाल्ले हे ब्रम्हदेवाने पाहिले. उच्चिष्ट खाणारा कृष्ण देव असु शकत नाही, ब्रम्हदेवाला शंका आली. त्यांनी गोपाळांची वासरे चोरली. भगवंताने चमत्कार केला, सर्व वासरे नवीन निर्माण केली. नारदही संशयाच्या रोगातून सुटले नाही. संशयाचा रोग फार घातक असतो. संशयामुळे भांडणे होतात. पण प्रत्यक्ष तसे काहीच नसते. ब्रम्हदिकांनाही संशयाचा रोग झाला म्हणजे देवही त्यातून सुटले नाहीत.
शरीराचे रोग नष्ट करण्यासाठी अनेक कठोरऔषधे घ्यावी लागतात. मनाचे, बुध्दीचे काही रोग आहेत. स्थूल देहाचे रोग घालवण्यासाठी अनेक डॉक्टर आहेत. पण मनबुध्दीचे,वै चारिक रोग घालवण्यासाठी साधुसंतांची गरज आहे. सदगुरु हे सुध्दा वैद्य आहेत.भव रोग नष्ट करण्याचे डॉ. गंगागिरी महाराज होते! स्थुल रोग एकाच जन्माचे असतात. सुक्ष्मदेहाचे रोग हे जन्मोजन्मीचे असतात. स्थूल रोगामुळे जास्तीत जास्त मृत्यु होईल, शास्त्र म्हणते मृत्यु म्हणजे पुन्हा जन्म आहे. स्थूल देहासाठी अनेक डॉक्टर तर सुक्ष्म देहाच्या रोगासाठी गंगागिरी महाराजांचा सप्ताह आहे.
काही वनस्पती विषारी असल्या तरी त्या औषध म्हणून वापरल्या जातात. रसायन चुकलं तर रोगी मरु शकतो. पार्याचे भस्म केले जाते, ते जर कच्चे राहिले तर रोग्याचे दात पडतात.परमार्थात काहींचे रसायन कच्चे राहते. विश्वमित्र, पराशरांचे रसायन कच्चे राहिले. त्यामुळे परमार्थात सफलता ऐवजी जीवनात विफलता निर्माण झाली होती. आयुर्वेदात रसायन कच्चे राहिले तर वैद्याला असफलता आणि रोग्याचा मृत्यु होतो. म्हणून रसायन कच्चे राहु नये. काही लोक देवाची चुक काढतात. एक जण आंब्याच्या झाडाखाली बसला, डांगराची वेल भले मोठे डांगर, देवाची चुक झाली. हे मोठे फळ आंब्याला पाहिजे. डांगराला आंब्यासारखे फळ पाहिजे, असे म्हणत देवाची चुक आहे असे तो म्हणतो.काही वेळाने कैरी त्याच्या डोक्यावर पडते. त्यावर तो म्हणतो, वाचलो, डांगरा एवढी कैरी असती तर वाचलो असतो का? देवाला नावे ठेवणारांची फजिती होते.
जो पुरुष ज्ञानवान होतो, तो वाईट मार्गाला जात नाही.ज्या प्रमाणे अग्निच्या संपर्कात सोने शुध्द होते. त्यातील तांबे वेगळे होते. त्याप्रमाणे भक्तीच्या आणि हरिनामाच्या भट्टीत तावुन सुलाखून निघालेले मानवी मन देखील प्रवृत्ती निवृत्तीच्या पलिकडे जावुन शुध्द व समाधानी बनते.
कालच्या कीर्तन सोहळ्यास विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार हेमंत ओगले, श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, डॉ.वंदना मुरकुटे, निरज मुरकूटे, डॉ. राजेंद्र पिपाडा, नानासाहेब शिंदे, सर्जेराव मुंढे, गणेशचे संचालक नानासाहेब नळे, बाळासाहेब चोळके, बाबासाहेब दिघे, भोला उदावंत, शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन औताडे, अशोकराव नवले, प्रकाश रोहोमारे, भारत लोखंडे, बंडोपंत खापटे, अंकुश निमसे, रोहित कापसे, प्रकाश पुंड, राजेंद्र कुदळे, श्रीकांत पुंड, संजय निमसे, गोपिनाथ सोनवणे, अमोल खजिनदार, सराला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज, बाबासाहेब चिडे, अस्तगावकर सराफचे अशोकराव बोर्हाडे, मधुसूदन महाराज, संदिप महाराज, नवनाथ महाराज म्हस्के, बाळासाहेब महाराज रंजाळे, चंद्रकांत महाराज सावंत, रामभाऊ महाराज नादीकर, विक्रम महाराज, दत्तात्रय महाराज बहिरट, लक्ष्मण रक्टे, डमाळे महाराज, संतोष महाराज दिक्षीत, भारत महाराज, नवनाथ महाराज आंधळे, दादासाहेब रंजाळे महाराज, साई महाराज, चांदगुडे महाराज, मनोज महाराज कांदळकर, सचिन बोरकर आदींसह लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.
सप्ताहाची आज सांगता
या सप्ताहाची आज मंगळवार 25 रोजी सकाळी 10 वाजता सांगता होत आहे. या सांगतेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेसह जिल्ह्यातील आमदार, खासदार, माजी आमदार उपस्थित राहणार आहेत. मंत्र्याचा दौरा होत असल्याने कालपासून पोलीस यंत्रणेने सप्ताहस्थळ ताब्यात घेतले आहे. बंदोबस्तासाठी 750 पोलीस अंमलदार, अतिरिक्त पोलीस अधिक्षक, सहा पोलीस उपअधिक्षक, तसेच पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक असे 40 अधिकारी तैनात असणार आहेत.




