प्रश्न : नातेसंबंध, विशेषतः मित्र आणि मैत्रीण, पती व पत्नीमधील इतके गुंतागुंतीचे का असतात?
सद्गुरु : नातेसंबंध जर शारीरिक पातळीवर आधारित असतील, तर एकमेकांबद्दल असणारे शारीरिक आकर्षण काही काळानंतर संपून जाते. ज्याना तुम्ही अदभूत समजत होतात, ते काही काळानंतर अगदी साधारण वाटू लागतात. ज्या गोष्टींनी त्यांना एकत्र आणले होते त्या गोष्टीचे अप्रूप वाटेनासे झाल्यावर लोक साहजिकच त्यापासून दूर जाऊ लागतात. अकारणपणे त्यांना एकमेकांचा कंटाळा वाटू लागतो, कारण असे नातेसंबंध हे एकमेकातून सुख आणि आनंद पिळून काढण्याबद्दल असतात. तुम्ही जर दुसर्या व्यक्तीतून आनंद पिळून काढायचा प्रयत्न केलात, तर कालांतराने जेंव्हा त्याचे परिणाम आधीसारखे दिसून येत नाहीत, तेव्हा संबंधांमध्ये थोडाफार कडवटपणा येणार हे स्वाभाविक आहे.
आपण जसे प्रौढ होत जातो, तेव्हा वयोमानानुसार काही विशिष्ट गोष्टी घडू शकतात. कालपासून आजपर्यंत तुम्ही थोडे वयस्क झालेले आहात. म्हणून, आज जेव्हा तुम्ही तरुण आहात, तुमच्या आयुष्यातील सर्व नातेसंबंध – केवळ शारीरिक नातेसंबंध नव्हे – आनंदाची अभिव्यक्ती असणारे झाले पाहिजेत, दुसर्यातून आनंद पिळून काढू पाहणारे नव्हे. तसे घडण्यासाठी, सर्वप्रथम तुम्ही तुमच्या सहज स्वभावाने आनंदी बनले पाहिजे. तुम्ही जर अत्यानंदाने ओतप्रोत बनण्याकडे लक्ष केंद्रित केलेत, आणि तुमचे नाते संबंध हा आनंद एकमेकांबरोबर वाटून घेण्याबद्दल असेल, तर सर्वसामान्य लोक त्यांचे नातेसंबंध टिकविण्यासाठी जी काही कसरत करतात ते करण्याची तुम्हाला काळजी करावी लागणार नाही.
आयुष्यात नातेसंबंध केवळ एकाच क्षेत्राशी निगडीत राहणार नाहीत. जेव्हा व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्यांना अनेक गोष्टी एकत्र वाटून घ्यावी लागतात. मग साहजिकच छोट्या मोठ्या गोष्टींसाठी एकमेकांबरोबर तक्रारी होतील. यामुळे, अनेक वादविवाद होतील – किंवा तुम्ही त्याला भांडणे सुद्धा म्हणू शकता – हे असं घडणारच.
या सार्या गोष्टी तुम्ही दररोज हाताळू शकणार नाही. म्हणूनच, सर्वोत्तम गोष्ट ही आहे, की स्वतःला अशा पद्धतीने घडवा, की तुम्ही सहज स्वाभाविकपणे आनंदी आणि उल्हासी राहाल. तसे जर घडले, तर तुमचे नातेसंबंध गरजांवर आधारित राहणार नाहीत.
नातेसंबंध जेव्हा गरजांवर आधारित असतात, तेंव्हा आपल्याला ज्याची गरज असते ती जर भागली नाही तर तुम्ही नाराजीचा सूर लावता. तुम्हाला जे मिळणे अपेक्षित होते ते न मिळाल्याबद्दल तक्रार करता आणि संबंधांमध्ये कडवटपणा निर्माण होतो. तुमच्यामधील ही गरज जर तुम्ही नाहीशी केलीत, आणि जर तुम्ही सहज स्वभावाने आनंदाने ओतप्रोत असाल, तर तुम्ही सर्व प्रकारच्या व्यक्तिंसोबत चांगले नातेसंबंध निर्माण करू शकता, मग ते कोणीही असो. त्यांनी तुमच्यासारखेच असणे गरजेचे नाही. माझा आशीर्वाद आहे तुम्ही तुमच्या जीवनात सर्वांग सुंदर नातेसंबंध अनुभवावेत.