Thursday, August 27, 2026
HomeनगरRahata : साधूच्या वेषात आले अन् संमोहित करून लुटले

Rahata : साधूच्या वेषात आले अन् संमोहित करून लुटले

गिफ्ट गॅलरीतील महिला व्यावसायिकाला गंडा

राहाता |वार्ताहर| Rahata

साधूचा वेष परिधान करून आलेल्या दोन भामट्यांनी संमोहित करून एका महिला व्यावसायिकाला लुटल्याची धक्कादायक घटना राहाता शहरातील नगर-मनमाड रोडवर बुधवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. या चाणाक्ष भामट्यांनी दुकानाच्या गल्ल्यातील रोख रकमेसह महिलेच्या बोटातील सोन्याच्या दोन अंगठ्या लांबवून पोबारा केला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे
बुधवारी दुपारी नगर-मनमाड रोडवरील साई दर्शन कॉम्प्लेक्समधील एका गिफ्ट गॅलरीत ही घटना घडली.

- Advertisement -

दुकानात महिला व्यावसायिक एकटीच असल्याचा फायदा घेत साधूच्या वेषातील दोन व्यक्ती तिथे आल्या. त्यांनी सुमारे 5 ते 10 मिनिटे विविध विषयांवर बोलून महिलेला संभाषणात पूर्णपणे गुंतवून ठेवले. बोलता बोलता त्यांनी महिलेवर संमोहन केले. संमोहनाच्या प्रभावाखाली आलेल्या या महिलेने स्वतःहून हातातील सोन्याच्या दोन अंगठ्या काढून दिल्या व गल्ल्यातील रोख रक्कमही त्यांच्या स्वाधीन केली. पैसे आणि दागिने हाती लागताच दोन्ही भामटे तत्काळ पसार झाले.

हा प्रकार समोर आल्यानंतर परिसरातील व्यापार्‍यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, महिला व्यावसायिक स्वतःहून अंगठ्या आणि पैसे काढून भामट्यांच्या हातात देताना स्पष्ट दिसत आहे. संमोहनाचा हा प्रकार पाहून नागरिकांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. दरम्यान रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झाली नव्हती. त्यामुळे चोरीस गेलेली रोख रक्कम आणि दागिन्यांची नेमकी किंमत समजून शकली नाही.

राहाता शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरी, लुटमार आणि घरफोडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच एकरुखे शिवारात वारकर्‍यांच्या वेषात आलेल्या चार तरुणांनी एका सरकारी वकिलाच्या घरात घुसून महिलेला चाकूचा धाक दाखवत 2 लाख रुपयांचा ऐवज लुटला होता. या पाठोपाठ आता साधूच्या वेषात झालेली ही लूट पाहता नागरिकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण आहे. पोलीस प्रशासनाने या घटनांची गंभीर दखल घेऊन रात्रीची गस्त वाढवावी आणि अशा भामट्यांचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : तरुणाचा गळा आवळून खून

0
ओझर | प्रतिनिधी Ozar ओझर शहरातील मध्यवर्ती असलेल्या संभाजी चौक परिसरात एका तरुणाची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. भरवस्तीत घडलेल्या...