नाशिक । प्रतिनिधी Nashik
नदीवरील धरणे बांधण्याचा मुळ हेतू त्या परिसरातील शेती व्यवसायाच्या विकासासाठी पाणी उपलब्ध करुन देण्याचा होता. कालांतराने उद्योग व नागरी विकास होत गेल्याने त्या उद्देशाला दुय्यम स्थान आले.मात्र मुळात खळाळून वाहणार्या नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे आता आपण सर्वांनी हे प्रदूषण संपवण्यासाठी प्रयत्नशिल न राहिल्यास कालांतराने नदीचा प्रवाहच नामशेष होऊन वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही. त्यासाठी आजच जलसंवर्धन करण्यासोबतच प्रदूषण मुक्त गोदावरी करण्याचा संकल्प सफर गोदावरीच्या कार्यक्रमात करण्यात आला.
दैनिक ‘देशदूत’च्या माध्यमातून काठे गल्लीतील रंगुबाई जुन्नरे विद्यालयात ‘सफर गोदावरीची’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात के.के.वाघ महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ.सुनिल कुटे, महाअभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनीचे प्रपाठक व कार्यकारी अभियंता प्रमोद कुलकर्णी, आर्किटेक्ट महाविद्यालयाच्या प्राचार्य प्राजक्ता बस्ते, चित्रपट अभिनेता चिन्मय उद्गीरकर, गोदावरी प्रेमी देवांग जानी, व्हिसल मॅन व सफर गोदावरीचे समन्वयक चंद्रकिशोर पाटील, दैनिक. ‘देशदूत’च्या संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले, सामाजीक कार्यकर्तेे संदिप भानोसे, रंगुबाई जुन्नरे विद्यालयाच्या प्राचार्य नंदा पेटकर हे होते.
यावेळी धरणांची माहिती देताना डॉ. कुटे यांनी गोदावरीच्या त्र्यंबकेश्वर ते राजमुंद्री दरम्यानच्या प्रवासात येणार्या विविध धरणांची माहिती विषद केली. राजमुंद्री येथे समुद्रात मिसळताना गोदावरीचे पात्र हे प्रचंड मोठे होत असल्याचे सांगितले.यावेळी गंंगापूर धरणाचा इतिहास, त्यांच्या बांधणीतील बारकावे विषद करताना चित्रफितीद्वारे माहिती दिली.गोदावरीचा उपयोग हा शेती, उद्योग, निवासी वापरासह विविध उपक्रमांसाठी केला जातो. आशियातील मातीचे एकमेव मोठे धरण असल्याचे त्यांनी नमुद केले.गोदावरी ही हरिद्वारच्या गंगेनंतरची देशातील दुसरी मोठी नदी असून, ती देशाची जीवनवाहिनीही असल्याचे सांगितले. गोदावरी खळाळती राहण्यासाठी तिच्या जिवंत स्त्रोंतांना वाहते करण्यासोबतच प्रदूषण मुक्त करण्याची गरज असल्याचे डॉ. कुटे यांनी सांगितले.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
यावेळी डॉ. कुलकर्णी यांनी चित्रफितीद्वारे गोदावरीवरील धरणांचा इतिहास विषद केला. धरणातील पाणी, त्यांत मिसळणार्या उपनद्या, कालवे त्यातून धरणात पाण्यासोबत येणारा गाळ, पाण्याच्या ठरावीक टप्प्यानंतर करावे लागणारे विसर्ग, कालव्यांतून शेतीला सोडले जाणारे आवर्तने याबद्दल सविस्तर माहिती दिली. पाणी वापरण्याबद्दल मुलांशी संवाद साधताना त्यांनी मुलांना जागरुक राहण्याचे आवाहन केले. घरातील बेसिन, शौचालयातील फ्लश, कपडे धुताना निघणारे साबणाचे पाणी यावर नियंत्रण ठेवल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होण्यास मदत होईल असे सांगितले.
‘देशदूत’च्या संपादक डॉ.वैशाली बालाजीवाले यांनी ‘सफर गोदावरीची’ या उपक्रमाचे उद्दिष्ट विषद करुन त्याच्या वाटचालीचा आढावा घेतला. तसेच या माध्यमातून जनसामान्यांमध्ये गोदावरीबद्दलचे प्रेम जागृत करुन नदीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी समाजात चेतना निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य नंदा पेटकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सुत्रसंचलन उपप्राचार्य मधुवंंती देशपांडे यांनी केले. शेवटी आभार मानताना समन्वयक चंद्रकिशोर पाटील यांनी व्हिसल मॅनची भूमिका समजावून सांगताना प्रत्येक विद्यार्थ्याने व्हिसलमॅन बनण्याचे सांगितले. आपण स्वत: कचरा फेकू नये , इतरांना कचरा फेकू न देण्यावर काम करण्याचे आवाहन केले.
हिरव्या विकासासाठी पुढाकार घ्या – चिन्मय उदगीरकर
‘ब्रम्हगिरीकी हरीयाली गोदावरीकी पवित्रता’ या संकल्पनेवर जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी चळवळ उभारलेली आहे. त्या माध्यमातून गोदावरीला प्रदुषण मुक्त करण्यासाठी आपण सर्वांनी पुढे यावे असे अभिनेता चिन्मय उदगीरकर यांनी सांगितले. सद्यस्थितीत होणारा विकास नदीला भकास करणारा ठरत आहे. राजेंद्र सिंह यांच्यानुसार विकास करताना ङ्गसाझा विकासफ करावयाचे संकल्पीत केले आहे. आपल्याला हिरवा विकास करावयाचा आहे. गोदावरीचे उगमस्थान असलेल्या ब्रम्हगिरीला हिरवे करण्यासाठी सर्वांनी पुढे येणे गरजेचे आहेत. निसर्गाचे मोठेपण मान्य करुन आपण त्याना पुनर्जिवीत करण्यासाठी काम करण्याची गरज आहे. त्यासाठी ग्रीन सोल्जर्सची भूमिका बजावण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन चिन्मय यांनी विद्यार्थ्यांना केले. या संकल्पनेला मुलांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत सहभाग घेण्याची तयारी दर्शविली. ब्रम्हगिरी पासून गोदावरीचा नाशिक शहराचा 24 किलोमिटरचा हिरवळीसह प्रदुषण मुक्त असा समृध्द प्रवास करायचा असल्याचे चिन्मय उदगिरकर यांनी सांगितले.