अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शिर्डीतील गुन्हेगारीसंदर्भात अधिकारी-अवैध धंदेवाले यांचे हितसंबंध तर होतेच, पण या अवैध व्यावसायिकांना आश्रय देणारेही शिर्डीतीलच आहेत. गेल्या काही दिवसांपासून घडणार्या घटनांमुळे याचे गांभीर्य आश्रय देणार्यांना कळले असून, आता आम्ही शिर्डी सुरक्षीत करण्याचा संकल्प केला असून त्याला सगळ्यांनी पाठबळ देणे आवश्यक असल्याचे मत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. मंत्री विखे पाटील यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्ह्यात सुरू असलेली अतिक्रमण कारवाई, गुन्हेगारी, शिर्डीतील घटना यावर भाष्य केले. मंत्री विखे पाटील म्हणाले, शिर्डीसह जिल्ह्यात कुठेही गुन्हेगारी सहन केली जाणार आहे.
कठोर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिर्डीतील गुन्हेगारीबाबत अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र तेथील गुन्हेगारी संपुष्टात आणणे याला प्राधान्य आहे. शिर्डीत गुन्हेगार, अवैध व्यावसायिक यांचे तेथील अधिकार्यांसमवेत हितसंबंध असल्याच्या आरोपाकडे लक्ष वेधले असता, केवळ हितसंबंधच नव्हे तर त्यांना आश्रय देणारेही शिर्डीतीलच आहेत. गेल्या काही दिवसांतील शिर्डीतील घटना पाहिल्यानंतर आता या सर्वांचेच डोळे उघडले आहेत. आश्रय देणार्यांसह शिर्डीतील ग्रामस्थांनाही या घटनांनंतर एकूण गांभिर्य लक्षात आले आहे. त्यामुळे गुन्हेगारी नष्ट करण्याची मानसिकता आता शिर्डीतील प्रत्येकाची झाली आहे. कोणत्याही प्रकारचा अवैध प्रकार, गुन्हेगारी सहन केली जाणार नाही.
फक्त शिर्डीच नव्हे तर जिल्ह्यात कुठेच हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. शिर्डीत आता सर्वांनी एकत्रित प्रयत्न करून तेथील गुन्हेगारी समूळ नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील अतिक्रमण मोहिमेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर मंत्री विखे पाटील म्हणाले, या संदर्भात मी आढावा घेणार आहे. जिल्ह्यात कुठे मोहीम राबवली गेली, कुठे अतिक्रमण आहेत याची माहिती घेण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी सरकारी जागा बळकावून तेथे इमारती बांधल्या गेल्या आहेत. हा प्रश्न फक्त नगर जिल्ह्यापुरता मर्यादित नसून, राज्याचा आहे. त्यासाठी एक वेगळे धोरण ठरवावे लागेल, असे मंत्री विखे पाटील म्हणाले.
रेल्वेबाबत आधी जिल्हास्तरावर आढावा
नगर पुणे इंटरसिटी रेल्वे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानग ते पुणे रेल्वे, माळशेज रेल्वे आणि नाशिक पुणे रेल्वे याबाबत जिल्हा पातळीवर माहिती घेवून या विषयावर एकत्रित रेल्वे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून नव्याने सुरू होणार्या वंदे भारतसह अन्य रेल्वे गाड्यांना नगर येथे थांबा मिळावा, यासाठी मागणी करणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
सत्तेच्या विकेंद्रीकरणाला ते घाबरतात
संगमनेर येथील अपर तहसील कार्यालय निर्मितीचा प्रश्न सध्या गाजत आहे. त्यावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या संदर्भात मंत्री विखे पाटील म्हणाले, संगमनेर तालुक्यातील आश्वी, घारगाव येथे अपर तहसील कार्यालय करण्याची मागणी आहे. लोकांच्या सोयीनुसार निर्णय घेतला जाईल. मात्र त्यापूर्वी महसूल मंडळांची पूनर्रचना करण्यात येणार आहे. यातून सत्तेचे विकेंद्रीकरण होईल अशी भीती काहींना आहे, असा टोलाही त्यांनी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना नाव न घेता लगावला.
अतिक्रमण निघणारच
अतिक्रमण हे अतिक्रमण असते. ते लहानाचे आहे की मोठ्याचे आहे, हा विषय नाही. जेथे जेथे अतिक्रमण असतील, ते काढण्यात येईल. तेथे कारवाई करताना कोणाचाही विचार केला जाणार नाही, असे मंत्री विखे पाटील एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.